टिकटॉक : एक ॲप बारा भानगडी

एव्हाना टिकटॉक ॲप चीनमधून उगवलंय हे सर्वश्रुत झालं असलं, तरीही नेमका या ॲपपासून धोका आहे तरी काय, हे एकदा समजून घ्या.

इतर कुठे वाचायचा कंटाळा केला असेल, तर इथे वाचा.

छपरी, टपोरी आणि इतर रिकामटेकड्या लोकांचं ॲप म्हणून हे ॲप प्रसिद्ध आहे. त्यामुळे खरं तर या ॲपला नावं ठेवायला इतर निमित्तं शोधायला नको. (मुंब्रा, रेतीबंदर इथे रात्रीत टिकटॉक विडिओ करायला आलेल्या अशाच दोन दिवट्या गटांमध्ये हाणामारीही झालीये.)

तरी काही ठळक कारणं इथे मांडायचा प्रयत्न केलाय.

 

लहान मुलांसाठी धोकादायक ॲप

टिकटॉक न वापरण्यासाठी आणखी एका निमित्ताची भर म्हणजे अमेरिकेने टिकटॉकला ५७ लाख अमेरिकन डॉलर्सचा दणदणीत दंड ठोठावून झालाय.

हा दंड ठोकण्याचं कारण?

टिकटॉक ॲप १३ वर्षांहून लहान वयाच्या मुलांची माहिती सररास गोळा करत होतं.

भारतातही मद्रास उच्च न्यायालयानं काही काळ या ॲपवर बंदी आणली होती, पण मग ती उठवली.

जीवघेणे ट्रेंड्स

मध्यंतरी ‘स्कल ब्रेकर चॅलेंज’ नावाची एक टूम टिकटॉकवर निघाली होती. लहान मुलांमध्ये ती बरीच गाजत होती.

यात दोन मित्र तिसऱ्याला हवेत उडी मारायला सांगतात, त्याने तशी उडी मारली की त्याच्या पायांना लाथ मारतात, म्हणजे तोल जाऊन तो खाली जमिनीवर आदळतो.

तेरा वर्षांची कॅथलीन नावाची एक मुलगी या ट्रेंडमुळे रुग्णालयात दाखल झाली.

जोरात खाली आपटल्यावर तिची अवयवांची संवेदनाच नाहीशी झाली. तिला तिचे पाय, तळवे, काहीच जाणवत नव्हतं.

हे केवळ एक उदाहरण झालं. असे अनेक ‘ट्रेंड्स’ अधनं मधनं या ॲपवर उपटत असतात, आणि अजाण मुलांचे त्यात बळी जात राहतात.

 

चीनमधली कंपनी चीनच्या सरकारची अक्षरश: गुलाम असते.

चीनमध्ये जन्मलेल्या कंपन्यांना, त्यांचा व्यवसाय जगात कितीही कुठेही पसरला, तरी तो तसाच चालू ठेवण्यासाठी चीनच्या सरकारच्या छत्रछायेत राहूनच काम करावं लागतं.

चीनचं सरकार म्हणालं ऊठ, की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, अशी त्यांची गत असते.

म्हणूनच जर चीनच्या सरकारनं म्हटलं, की अमुक एका देशातल्या तुमच्या ग्राहकांची अथपासून इतिपर्यंत सगळी माहिती आम्हाला द्या, की या चीनी कंपन्यांकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो; झक मारत सगळी माहिती द्यावी लागते.

२०१७ साली टिकटॉक हे ॲप उदयाला आलं.

बाइटडान्स नावाच्या चीनी कंपनीचं हे पिल्लू.

म्युझिकली नावाचं ॲप ८० कोटी अमेरिकन डॉलर देऊन गिळंकृत केल्यानंतर बाइटडान्सनं दिलेली भलीमोठी ढेकर म्हणजे टिकटॉक!

या बाइटडान्सनं काढलेलं पहिलं ॲप – ‘निहान दुआंझी’ (काय नाव आहे!), चीनच्या सरकारनं २०१८ साली बंद पाडलं.

या ॲपमध्ये बंद पाडण्यासारखं काय होतं?

लोक साधे मीम्स शेअर करायचे. पण चीनच्या सरकारला ते पाहावलं नाही.

का तर म्हणे ॲपमध्ये खूप ‘अश्लील’ मजकूर येतो.

खरं कारण विनोदाच्या माध्यमातून चीन सरकारवर आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका होते तिच्यावर आळा घालण्यासाठी हे पाऊल उचललं होतं.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांना लोक ‘विनी द पू’ची उपमा देतात.

चीनचं कम्युनीच सरकार तेवढंही खपवून घेत नाही.

एक ॲप बंद पडलं, आता अख्खी कंपनी नको बंद पडायला, काय!

बाइटडान्सचा सीईओ आणि संस्थापक झांग यिमिंग गपचूप शरण आला.

आमचं ॲप समाजवादी विचारांचं नीट पालन करत नव्हतं, शी जिनपिंगच्या तत्त्वांशी निष्ठा राखण्यात अपयशी पडलं, पुन्हा असं होणार नाही आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी आपण यापुढे व्यवस्थित सहकार्य करू वगैरे वगैरे म्हणून झांग यिमिंगने माफीनामा सादर केला.

बाइटडान्सने चीनच्या सरकारच्या माध्यम संस्थांसोबत अनेक संयुक्त उपक्रम सुरु केले आहेत.

अशाच एका उपक्रमातून १० डिसेंबर २०१९ रोजी बाइटडान्सची एक उपकंपनी पेंगपाइ ऑडियोव्हिजुअल टेक्नॉलॉजी (जिनान) कं. लि. या कंपनीमध्ये ४९% ची भागीदार राहिली, तर उर्वरित ५१% वाटा शँघाई डाँगफँग न्यूजपेपर कं. लि. च्या ताब्यात आला.

शँघाई डाँगफँग न्यूजपेपर हा शँघाई युनायटेड मीडिया ग्रूपचा एक भाग आहे.

हा मीडिया ग्रूप शांघाईच्या स्थानिक सरकारच्या मालकीचा आहे.

 

भाषणस्वातंत्र्यावर गदा

द गार्डियनमध्ये छापून आलेल्या एका अहवालानुसार, ज्या व्हिडिओंमध्ये तिआनानमेन चौकाचा, तिबेटच्या स्वातंत्र्याचा, किंवा फालुन गाँग या निषिद्ध धार्मिक समूहाचा उल्लेख होतो, ते व्हिडिओ टिकटॉक सेन्सॉर करतं.

काही काही व्हिडिओ ॲपमधून थेट उडवले जातात, तर काही व्हिडिओ फक्त ते डकवणाऱ्याला दिसत राहतात, पण इतर कोणालाही दिसत नाहीत.

तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर हाँगकाँगमधील आंदोलनाविषयी शोध घेऊन बघा. बक्कळ मजकूर मिळेल.

तोच तुम्ही टिकटॉकवर शोधायला जाल, तर अगदी मोजके व्हिडिओच पाहायला मिळतात, असा अहवाल वॉशिंग्टन पोस्टच्या एका लेखात वाचायला मिळतो.

याबद्दल स्पष्टीकरण देताना बाइटडान्सचं म्हणणं काय, की आमचं ॲप तर टाइमपाससाठी आहे. लोक मजा मस्ती करायला म्हणून या ॲपवर येतात, म्हणून फारसं कोणी राजकीय प्रश्नांवर व्हिडिओ टाकतच नसेल.

कोणाचा विश्वास बसेल यावर?

 

चीनमधील शिनजिआंग प्रांतात विघर मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात टिकटॉकवर काही बोलता येत नाही.

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये १७ वर्षांची फिरोझा अझीझ नावाची एक मुलगी राहते.

फिरोझा तशी हुशार मुलगी आहे.

टिकटॉकच्या मॉडरेटरना हुलकावणी देण्यासाठी ती मेक अप ट्युटोरिअल देण्याच्या नावाखाली राजकीय भाष्य करते.

पण शेवटी तीही पकडली गेली.

तिने टिकटॉकवर चीनच्या शिनजिआंग प्रांतातील मानवी हक्कांची पायमल्ली करण्याच्या धोरणांचा निषेध करणारा व्हिडिओ डकवला.

टिकटॉकने तिचं खातंच बंद करून टाकलं.

त्यामुळे भरपूर बोंबाबोंब झाली तेव्हा शेवटी टिकटॉकने तिचं खातं पुन्हा सुरु केलं.

बाइटडान्स केवळ भाषणस्वातंत्र्यावरच नव्हे, तर भाषास्वातंत्र्यावरही गदा आणते.

चीनच्या सरकारला मँडेरिन भाषा आवडते.

चीनमध्ये सगळ्यांनी मँडेरिनच वापरावी असा त्यांचा हट्ट असतो. तसा नाही, तर किमान कँटोनीज वापरू नये, असा आग्रह असतो.

म्हणून कँटोनीज भाषेला दुय्यम वागणूक मिळते.

हा पाकिस्तानात पंजाबीला ‘हडत हुडूत’ आणि उर्दूला ‘अरे वा वा’ म्हणण्यासारखाच प्रकार आहे.

कँटोनीज ही खरं तर मँडेरिनहून जुनी भाषा आहे, आणि कदाचित तीच चीनची राष्ट्रभाषाही होऊ शकली असती. पण तसं झालं नाही.

आता ती एक स्वतंत्र भाषा नसून नुसती एक बोली आहे असा दुष्प्रचार चालतो.

बाइटडान्सचा इथे संबंध काय?

बाइटडान्स जगभरात टिकटॉक चालवतंय, पण चीनमध्ये खास चीनी लोकांसाठी या ॲपची एक वेगळी आवृत्ती काढलेली आहे. या ॲपचं नाव आहे – डाऊयिन.

असं वेगळेपण कशाला हे उघड आहे. चीनचे भाषणस्वातंत्र्याची पायमल्ली करणारे नियम आणि कायदे उर्वरित जगाला भूलवून सहज चीनी नागरिकांवर लादता यावेत यासाठी ही वेगळ्या ॲपची उठाठेव.

या डाऊयिन ॲपवर कँटोनीज भाषेत डकवलेल्या व्हिडिओंवर बंदी घातली गेली.

कँटोनीज भाषा ग्वांगझू प्रांतात आणि हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

कँटोनीज भाषा ही हाँगकाँगच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.

मँडेरिन बोलणाऱ्या लोकांना कँटोनीज भाषा समजेलच असं नाही.

सांस्कृतिक दादागिरी हा एक भाग आहेच, पण त्याबरोबरच चीनच्या कम्युनिस्ट सरकारविरोधातले मजकूर कँटोनीज भाषेत पसरू नयेत असाही उद्देश या बंदीमागे असू शकतो.

 

भाषणस्वातंत्र्यावर अशा प्रकारे गदा आणणाऱ्या या ॲपबद्दल खुद्द फेसबुकच्या झुक्याने चिंता व्यक्त केलीये.

जॉर्जटाऊन विद्यापीठात भाषण ठोकताना मार्क झुकरबर्ग म्हणाला,

एकीकडे आमच्या व्हॉट्सॲपसारख्या सेवा त्यांच्या सशक्त एन्क्रिप्शनमुळे आणि गुप्तता सुरक्षेमुळे सगळीकडच्या आंदोलकांद्वारे आणि कार्यकर्त्यांद्वारे वापरल्या जातात, तर जगभरात पटापट फोफावणाऱ्या टिकटॉक या चीनी ॲपवर या आंदोलनांचे उल्लेख सेन्सॉर केले जातात, अगदी अमेरिकेमध्येही. असं इंटरनेट हवंय का आपल्याला?

झुक्याची हे म्हणण्यामागची प्रेरणा व्यावसायिक हितसंबंधातून आली असणार याबद्दल दुमत नको, पण म्हणून तो जे म्हणतोय त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

त्याच्या मते, चीन इंटरनेटबद्दलची त्यांची कल्पना जगावर थोपवू पाहतोय, आणि त्यात तथ्य आहे.

एकेकाळी चीनच्या सरकारला खुश करण्यासाठी मँडेरिन शिकणाऱ्या मार्क झुकरबर्गनं अशी वक्तव्यं करणं हे नक्कीच उल्लेखनीय आहे.

 

युट्युबने कॅरी मिनातीचा व्हिडिओ डिलीट केला आणि त्याचा प्रभाव टिकटॉकच्या रेटिंगवर पडला.

कॅरी मिनाती हा एक लोकप्रिय युट्युबर आहे.

आपल्या व्हिडिओमध्ये अनेकदा तो विशिष्ट लोकांना उद्देशून शिव्याशाप वापरतो. या प्रकाराला रोस्टिंग म्हणतात.

एका ‘यशस्वी टिकटॉकर’ला उत्तर म्हणून कॅरी मिनातीने युट्युबवर एक व्हिडिओ डकवला. या व्हिडिओला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ७ कोटीवेळा हा व्हिडिओ पाहण्यात आला, आणि त्याला ६४ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले.

पण युट्युबने हा व्हिडिओ काढून टाकला. म्हणून लोकांनी संतापून टिकटॉकचं गूगल प्लेवरचं रेटिंग पाडायला सुरुवात केली.

अवघ्या काही दिवसांत ४.६ वरून टिकटॉकचं रेटिंग २ पेक्षा खाली घसरलं होतं.  

भारतभरातून टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली.

टिकटॉक लाइट या टिकटॉकच्या हलक्या आवृत्तीचं रेटिंग तर १.१ पर्यंत खाली गेलं.

गूगलने ही सगळी घाऊक रेटिंग्ज उडवून लावली, आणि टिकटॉकचं रेटिंग पुन्हा ४ वर आलं.

आश्चर्य म्हणजे, टिकटॉक सर्वाधिक संख्येने भारतातच डाऊनलोड होतं.

एप्रिल २०२० च्या अखेरीस, टिकटॉक जगभरातून २ अब्जाहून जास्त लोकांनी डाऊनलोड केलेलं असून, त्यात भारतीयांचा वाटा ६१ कोटी एवढा मोठा आहे.

मे महिन्यात डाऊनलोड्सची संख्या ५०% हून कमी झाली असली, तरी परिस्थिती टिकटॉकसाठी मोठ्या प्रमाणात सुखावहच आहे.

 

आता निर्णय आपण घ्यायचाय, चीनची अशी एकेक भयानक ॲप्स वापरत राहायचं, की इतर पर्यायांकडे वळायचं, की स्वत: जगाला भारतीय पर्याय उपलब्ध करून द्यायचं.

 

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *