सिलिकॉन व्हॅली आणि सुपीक डोक्याचे भारतीय

१९५३ मध्ये विल्यम शॉकली ट्रान्सिस्टरच्या माहितीच्या वापरावरून झालेल्या भांडणामुळे बेल लॅब्स मधून बाहेर पडला. नंतर त्याने स्वतःच्या नावाने लॅब सुरु करून ट्रान्सिस्टरवर संशोधन सुरु केलं. त्याकाळात बहुतांश उत्पादक ट्रान्सिस्टर बनवण्यासाठी जर्मेनियम या अर्धवाहकाचा (सेमी-कंडक्टर) उपयोग करत असत. पण या शॉकलीने अर्धवाहक म्हणून सिलिकॉनचा वापर करायला सुरुवात केली. सिलिकॉनचे सहसंयुज बंध (Covalent Bonds) चांगले असल्यामुळे सिलिकॉन जर्मेनियमपेक्षा जास्त फायद्याचा ठरतो. तसंच सिलिकॉन वाळूचा प्रमुख घटक असल्यामुळे तो मुबलक प्रमाणात आढळतो आणि म्हणून तो स्वस्तही आहे. या सगळ्या फायद्यांमुळे सिलिकॉन प्रचलित झाला आणि जर्मेनियम मागे पडत गेला.

सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक – विनोद खोसला

७० च्या दशकात रेडिओचं शहर असलेलं कॅलिफोर्निया हळूहळू सिलिकॉनच्या प्रेमात पडत चाललं होतं. स्टार्ट-अप पद्धत, जी आज भारतात बऱ्यापैकी रुजत चालली आहे ती ७०च्या दशकात कॅलिफोर्नियात रुजू पाहात होती. ट्रान्सिस्टरच्या शोधामुळे कम्प्युटरच्या क्षेत्रात बऱ्याच सुधारणांना वाव मिळाला होता. ऍपल आणि मायक्रोसॉफ्टप्रमाणेच कितीतरी अनेक स्टार्ट-अप तयार होत होते. त्यामुळे एकूणच या भागात या स्टार्ट-अपना अनुकूल अशी समाज व्यवस्था तयार होत गेली. कालांतराने या भागाला सिलिकॉन व्हॅली असं नाव पडलं. या स्टार्ट-अपच्या क्रांतीमुळे अमेरिकेत कम्पुयटर आणि दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध झाल्या. त्यादरम्यान IIT मधून अमेरिकेत जाणाऱ्या अभियंत्यांची संख्या वाढत चालली होती. तल्लख बुद्धीच्या उद्यमशील लोकांना या व्हॅलीने जवळ केलं. भल्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या. त्यामुळे भारतातले हे तरुण व्हॅलीकडे आकर्षित झाले. काहींनी तिकडे जाऊन स्वतःचे धंदे चालू केले तर काहींनी बड्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी वगैरे स्थानापर्यंत झेप घेतली. यांपैकी सत्या नडेला, सुंदर पिचई वगैरे मंडळींबद्दल आपण परिचित आहोतच; त्याव्यतिरिक्त काही जणांची माहिती आपण या लेखात पाहू.

विनोद खोसला: सेना अधिकाऱ्याचा हा मुलगा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं जर्नल वाचत असताना इंटेल कंपनीबद्दल वाचून अभियांत्रिकी क्षेत्रात काम करण्यास प्रेरित झाला. त्याने नंतर IIT दिल्लीतून इलेक्ट्रिल इंजिनिअरिंग विषयातून पदवी घेतली. अमेरिकेत येऊन स्टॅनफर्ड विद्यापीठातून बायोमेडिकल या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. १९८० मध्ये MBA पूर्ण करून डेसी सिस्टिम्स नावाच्या कंपनीत काम केलं. २ वर्षांनंतर स्टॅनफर्डमधल्या मित्रांसोबत त्याने सन मायक्रोसिस्टिम्स ही कंपनी सुरु केली. जावा ही कोडिंगची भाषा घडवण्याचं श्रेय विनोद खोसलालाच जातं. जावा भाषेवर आज बहुतांश सॉफ्टवेअर उत्पादनं चालतात. त्यामुळे विनोद खोसला हे सॉफ्टवेअर क्षेत्रातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मानलं जातं. सन मायक्रोसिस्टिम्सनंतर विनोद खोसलाने स्वतःची खोसला व्हेंचर्स ही कंपनी सुरु केली. ‘फोर्ब्स’ने जगातील ४०० सर्वांत श्रीमंत माणसांमध्ये विनोद खोसलाला स्थान दिलेलं आहे. २.७ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी संपत्ती आज खोसलाच्या नावावर आहे.

पेंटियमचा जनक – विनोद धाम

विनोद धाम: हा दुसरा विनोद! हाही एका सैन्यातल्या कामगाराचा मुलगा. वडील फाळणीनंतर रावळपिंडीहून पुण्याला आले. दिल्ली इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात पदवी घेतल्यानंतर त्याने दिल्लीच्या कॉन्टिनेन्टल डिव्हायसेस कंपनीमध्ये नोकरी केली. त्याकाळात सेमी कंडक्टर साधनं बनवणारी ती दिल्लीतली एकमेव भारतीय कंपनी होती. याच कंपनीत त्याला अर्धवाहकांबद्दल ओढ निर्माण झाली. १९७५ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी शिक्षणासाठी त्याने घर सोडलं. अमेरिकेतल्या सिनसिनाटी विद्यापीठात भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तिकडेच NCR नावाच्या कंपनीत त्याने आपल्या कामगिरीची छाप पाडली. त्यानंतर विनोदला इंटेल कंपनीने नोकरीवर ठेवलं. तिथेही त्याने असामान्य काम करत सिलिकॉन व्हॅलीत आपलं नाव कमावलं. इंटेलची जगप्रसिद्ध मायक्रोप्रोसेसर चिप “पेन्टियम” हिचा तो जनक मानला जातो. इंटेलमध्ये कारकीर्द गाजवल्यानंतर १९९५ साली तो बाहेर पडला आणि नेक्सजेन नावाच्या स्टार्ट-अप मध्ये COO म्हणून रुजू झाला. इकडेही त्याने आपली चमक दाखवली. पेन्टियम प्रोसेसरलाच शह देणारी नवी चिप काढून पुन्हा एकदा आपलं कसब दाखवलं. नंतरच्या काळात यानेही वेन्चर कॅपिटॅलिस्ट म्हणून काम केलं. १०० सर्वांत प्रभावी आशियाई-अमेरिकी व्यक्तींमध्ये त्याचा समावेश झालेला आहे.

USB चा जनक – अजय भट

अजय भट : वडोदऱ्यात जन्माला आलेला, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून पदवीधर झालेला अजय भट “युनिवर्सल सीरिअल बस” चा म्हणजेच USB चा जनक मानला जातो. वडोदऱ्यात पदवी घेतल्यानंतर त्याने सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. १९९० मध्ये अजय इंटेल कंपनीत कामाला लागला. त्यानंतर त्याने इंटेल कंपनीत आणि एकूणच संगणक विश्वात मोठी कामगिरी केली. संगणक आर्किटेक्चर या विषयात जवळ जवळ ३१ पेटंट त्याच्या नावावर आहेत, तर वेगवेगळ्या विषयांवरची एकूण १३२ पेटंट त्याच्या नावावर आहेत. आज अजय इंटेल कंपनीत चीफ ऑफ क्लाएन्ट प्लॅटफॉर्म आर्किटेक्चर या पदावर आपली भूमिका निभावत आहे. अजयच्या या विषयातील अतुल्य कामगिरीबद्दल आजवर अनेक पुरस्कारांनी त्याला नावाजलं गेलेलं आहे. GQ इंडिया तर्फे ५० सर्वांत प्रभावी भारतीयांमध्ये त्याचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे तर एशियन अवॉर्ड्सतर्फे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अद्वितीय कामगिरीचा पुरस्कार देण्यात आला आहे.

अशी अनेक रत्नं भारताने जन्माला घातली जी सिलिकॉन व्हॅलीत जाऊन चमकली. आता भारतात अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याची वेळ आलेली आहे, ज्याने भारतातही अशा सिलिकॉन व्हॅली तयार होतील जेणेकरून भारतीयांना स्टार्ट-अप सुरु करून ती यशस्वी करता येतील. यादिशेने सरकार प्रयत्न करतंच आहे, चला आपणही प्रयत्न करूया !

हा लेख इतरांना पाठवा

ओमकार बर्डे

संपादक, बरणी.इन

2 thoughts on “सिलिकॉन व्हॅली आणि सुपीक डोक्याचे भारतीय

  • May 9, 2019 at 3:04 pm
   Permalink

   ‘संदर्भसूची’ जोडायची राहिली होती. आता बघा.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *