चीनचा पिवळा सम्राट आणि चीनी इतिहासात नोंदवलेलं पहिलं युद्ध

‘पिवळा सम्राट’ म्हणून नावाजला जाणारा ‘हुआङ्ग दी’ आणि ‘ज्वाला सम्राट’ म्हणून नावाजला जाणारा ‘यान दी’ या दोन राजांमध्ये चीनी इतिहासाने नोंदवलेली पहिली लढाई झाली.

चीनी ऐतिहासिक नोंदींनुसार ख्रिस्तपूर्व २६व्या शतकात (म्हणजेच इसपूर्व २५०० च्या जवळपास) ही लढाई झाली असावी. त्याकाळी चीनमध्ये छोट्यामोठ्या टोळक्यांची राज्यं होती.

१२,००० वर्षांपूर्वी नवाश्म युगाची सुरुवात झाली होती. याकाळात प्राथमिक स्वरूपातली शेती उदयाला आली. साधारण ७००० वर्षांपूर्वी (इसपूर्व ५०००) ताम्रपाषाण युगाची सुरुवात झाली. मानवाला त्याच्या जीवनात तांब्याचा उपयोग करता येऊ लागला होता, पण अजून कथिलाबरोबर मिश्रण करून कास्याची निर्मिती करता येत नव्हती. त्यासाठी आणखी एक सहस्रक वाट पाहावी लागणार होती. कालांतरानं, शेनाँग नावाच्या एका विद्वान माणसानं चीनी लोकांना शेती शिकवली. शेतीबरोबरच कुऱ्हाड, फावडं, नांगर, विहिरी यांची ओळखही शेनाँगनेच चीनी लोकांना करून दिली. हा शेनाँग विविध झाडपाले स्वत: खाऊन औषधी वनस्पतींचा आणि विषांचाही शोध लावायचा. हुआइनांझी या प्राचीन चीनी ग्रंथामध्ये अशी आख्यायिका आहे की शेनाँगने एका दिवसात सत्तर विषांचं सेवन केलं होतं. अशी अचाट प्रयोगशीलता अंगाशी आली नाही तर नवलच. शेनाँगचा मृत्यु एक पिवळं विषारी फूल खाऊन झाला. त्या विषावरचा उतारा तो वेळेत घेऊ शकला नाही आणि त्याची आतडी फाटून तो मरण पावला.

Shennong3
यान दी – ज्वाला सम्राट

शेनाँग टोळ्या वर नमूद केलेल्या नवाश्मयुगातल्या टोळ्यांपासून उगमाला आल्या होत्या. त्यांनी आपला विस्तार चीनच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे तैहांग पर्वतापलिकडे नेला होता. शेनाँग टोळीचा शासक यान दी महत्त्वाकांक्षी आणि विस्तारवादी होता. हा यान दी म्हणजे स्वत: शेनाँगच होता, असाही एक प्रवाद चीनमध्ये अस्तित्वात आहे. २००४ साली चीनमध्ये आयोजित केलेल्या एका शैक्षणिक परिषदेमध्ये यान दी आणि शेनाँग दोघेही एकच व्यक्ती होते यावर सार्वमत झालं. दुसरी अशी शक्यता मानली जाते की यान राजांमधला पहिला शासक शेनाँग होता, त्याच्या मृत्युपश्चात त्याला यान दी म्हणजेच ज्वाला सम्राट म्हणून नावाजण्यात आलं, आणि त्याच्यानंतर आलेल्या सर्व शासकांनी साधारण पाचशे वर्षं तेच नाव मिरवलं. बँक्वॉनच्या लढाईनंतर मात्र त्यांना हे नाव मिरवता आलं नाही. का बरं?

Yellowemperor
हुआंग दी – पिवळा सम्राट!

इसपूर्व २५००० च्या आसपासचा काळ! जिउली टोळ्यांचा शासक चियु याने यान दीशी युद्ध करून त्याला हरवलं. युद्धात मार खाऊन माघारी परतणाऱ्या यान दीच्या सैन्यापुढ्यात आणखी मोठा शत्रु येऊन उभा ठाकला – हुआंग दी, अर्थात् पिवळा सम्राट! हुआंग दी युशिआँग टोळ्यांचा सम्राट होता. हा माणूस आजही चीनी राष्ट्रवादाचं अतिमहत्त्वाचं प्रतीक मानला जातो. हुआंग दीने बँक्वॉनच्या लढाईमध्ये यान दीला धूळ चारली. ज्वालेच्या निशाणाखाली आक्रमकपणे धावून येणाऱ्या यान दीच्या फौजांना हरवण्याचं आव्हान हुआंग दी पुढ्यात होतं. पण यान दीचं सैन्य नुकतंच एका युद्धात हार पत्करून परतत होतं. त्याचे सैनिक दमलेले होते, उत्साह कमी होता. हुआंगने या परिस्थितीचाच फायदा उचलला. हुआंगच्या नेतृत्वाखाली पाच निशाण्यांच्या टोळ्या एकत्र आल्या – काळं अस्वल, तपकिरी अस्वल, पिशिओ (पंख आणि शिंग असणारा सिंह), बिबट्या आणि वाघ. चीनच्या इतिहासात नोंदवलेली ही सर्वांत मोठी लढाई होती. तुंबळ युद्ध घडलं, आणि अखेरीस यान दी हुआंग दीला शरण आला.


जाहिरात

Sterlomax
Chi You
जिउली टोळ्यांचा शासक ‘चियु’ याचं हान साम्राज्यकालीन भित्तीचित्र

यानंतर यान दीची शेनाँग टोळी, आणि हुआंग दीची युशिआँग टोळी यांमध्ये तह झाला. दोघांनी मिळून ‘यानहुआंग’ टोळी जन्माला घातली, जिच्यामध्ये त्यांनी आजुबाजूच्या बऱ्याच लहानसहान टोळ्यांनाही ओढून घेतलं.

दोन प्रबळ शासक एकमेकांचे मित्र होऊन एकत्र आलेले पाहून चियु चवताळला. आपण ज्या यान दीला सळो की पळो करून सोडलं, तो पुन्हा शक्तिशाली होत असलेला त्याला पाहवेना. त्याने मोर्चेबांधणी करून शेनाँगच्या प्रदेशांवर पुन्हा चढाई केली. मात्र यावेळी यान दीला हुआंग दीच्या टोळ्यांची साथ लाभली. झुओलुला झालेल्या लढाईमध्ये यानहुआंग टोळ्यांनी चियुचा दणदणीत पराभव केला, आणि युद्धाखेरीस चियुला कंठस्नान घातलं. यानंतर यानहुआंगला कोणताही मोठा प्रतिस्पर्धी उरला नाही. त्यांनी आपलं साम्राज्य पूर्वेकडे पसरवलं. चीनच्या प्रसिद्ध हान साम्राज्याची पाळंमुळं यानहुआंग टोळीमध्येच दडलेली आहेत. आजही चीनमधील लोक स्वत:ला अभिमानाने यान आणि हुआंगचे वंशज म्हणवून घेतात.

या युद्धाच्या गाथेमधला तथ्यांश किती, आणि कल्पनेचा भाग किती, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, चीनी जनतेमध्ये राष्ट्रवादाच्या भावनांचं संस्करण करण्यासाठी हुआंग दीच्या पराक्रमांच्या गोष्टी ऐकवण्याचा आजवर खूप उपयोग होत आला आहे.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *