इतिहास ‘फेरारी’चा

१८९८ साली इटलीमधील मॉडेना प्रांतामध्ये धातूकाम-सुतारकाम करणाऱ्या अल्फ्रेडो फेरारीला दुसरा मुलगा झाला. लहानगा एंझो दहा वर्षांचा झाला तेव्हा त्याचे बाबा त्याला बोलोना शहरात १९०८ सालची बोलोना सर्किट मोटर कारची शर्यत पाहायला घेऊन गेले. ही शर्यत फेलिस नझारो नावाच्या रेसरने एका फियाट कारमध्ये बसून ताशी १२० किमी च्या वेगाने जिंकली. ही शर्यत पाहून एंझो कमालीचा प्रभावित झाला. आपणही मोठं होऊन कार रेसर व्हायचं, असं एंझोनं मनोमन ठरवून टाकलं.

अकाली प्रौढत्व

१९१४ मध्ये पहिलं महायुद्ध भडकलं. आणि महायुद्धाबरोबरच पसरली रोगराईची साथ. या साथीची व्याप्ती एवढी मोठी होती, की आकडेवारीनुसार पश्चिमेकडे अमेरिकेत आणि पूर्वेला भारतातही या सुमारास फ्लुचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो. १९१६ साली इटलीत फ्लुची साथ पसरली. एंझोच्या वडिलांना आणि भावालाही फ्लु जडला. दोघेही वारले. वयाच्या अठराव्या वर्षीच अंगावर घराची जबाबदारी आलेल्या एंझोला स्वप्नांच्या जगातून खाडकन् बाहेर यावं लागलं. त्याला आपलं शिक्षणही सोडून द्यावं लागलं. एंझो अग्निशमन दलात रुजू झाला.

रेसिंगची कारकीर्द

अल्फा रोमियो कंपनीची कार । स्रोत : pixabay.com

१९१७ साली एंझोने महायुद्धात भाग घेतला. वर्षभरात त्यालाही फ्लु झाला. त्यातून बरा झाल्यानंतर त्याला लष्करातून रजा दिली गेली. बाहेर पडल्यानंतर इटलीच्या एकवीस वर्षांच्या या तरुणाने ऑटो रेसिंगमध्ये आपली कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली. आधी ‘सी.एम.एन.’, आणि पुढे ‘अल्फा रोमियो’ या लक्झरी कार उत्पादक कंपनीच्या वतीने अशी जवळपास तेरा वर्षं रेसिंग केल्यानंतर एंझो अल्फा रोमियो कंपनीतच रेसिंग कार्सचं व्यवस्थापन आणि विकास करण्याच्या कामाला लागला. इथे जन्म झाला ‘फेरारी’चा. अल्फा रोमियोच्या रेसिंग विभागात १९२९ साली स्कुडेरिया फेरारी ही रेसटीम एंझोने तयार केली. त्यावेळी तो स्वत:सुद्धा रेसिंग करायचा. रेसिंगपेक्षा गाड्यांवर एंझोचा जीव जास्त होता. शर्यत जिंकायची म्हणून इंजिनवर त्याच्या क्षमतेपलिकडे भार टाकायला तो तयार होत नसे. तरीही एंझोने काही शर्यती जिंकल्या. १९३२ साली मुलाचा जन्म झाल्यावर त्याने रेसिंगमधून निवृत्ती घेतली होती.

उसळणारा घोडा

इटालियन लढाऊ वैमानिक फ्रान्सेस्को बराक्का हा एंझोचा मित्र होता. १९१८ साली ऑस्ट्रिया विरोधात चढाई करायला जाण्यापूर्वी आपल्या गळ्यातून त्याने एक हार काढला आणि एंझोला दिला. त्यावर त्याने कोरलेला उसळता घोडा होता. असाच घोडा त्याने त्याच्या विमानावरही चितारलेला होता. फ्रान्सेस्को त्या मोहिमेतच मारला गेला. एंझो १९२३ साली त्याच्या आईवडिलांना भेटायला गेला. त्यांनी सुचवल्यानुसार त्याची आठवण म्हणून एंझोने आपल्या गाड्यांवर उसळत्या घोड्याचं चिह्न वापरायला सुरुवात केली. आज फेरारी गाड्यांवरच्या ढालीवर दिसणारा घोडा तो हाच.

फेरारी स्वतंत्र

एंझो फेरारी । स्रोत : इंटरनेट

अल्फा रोमियोसाठी त्याचा भागीदार म्हणून १९३९ पर्यंत एंझोनं काम केलं. मग त्याचं त्या कंपनीशी पटेनासं झालं आणि तो वेगळा झाला. पण वेगळा होताना त्याने एक करार केला होता. त्यानुसार चार वर्षं फेरारी नाव वापरून कार उत्पादन करता येणार नव्हतं. मग एंझोनं इतर कार उत्पादक कंपन्यांना गाड्यांचे पार्ट्स पुरवण्याचा धंदा काढला. आणि काहीतरी जुगाड करून १९४० सालच्या एका शर्यतीत स्वत: तयार केलेल्या दोन गाड्याही उतरवल्या. मग आलं दुसरं महायुद्ध! टकल्या मुसोलिनी हिटलरच्या जोडीनं महायुद्धात घुसला होता. त्याने फेरारीला युद्धाची उपकरणं तयार करायला लावली. बिचाऱ्या एंझोला आपल्या स्वप्नांना ब्रेक द्यावा लागला. दोस्त राष्ट्रांनी केलेल्या बाँबहल्ल्यात एंझोचा मॉडेनामधला कारखानाच जमीनदोस्त झाला. मग एंझो मारानेल्लोला गेला. महायुद्ध संपेपर्यंत अल्फा रोमियोशी केलेला करारही संपलेला होता. आता एंझोने स्वत:च्या नावाने कार उत्पादन करायचा निर्णय घेतला. १९४७ साली फेरारी सोशेता पर ॲझिओनी (मर्यादित कंपनी) ची स्थापना झाली. त्याच वर्षी १२५ एस ही पहिली फेरारी कार रस्त्यावर उतरली. त्यावर्षीच्या रोम ग्रँड प्रिक्स शर्यतीत फेरारी कार विजयी ठरली. त्यानंतर फेरारीने विजयाचा सपाटाच लावला. काही वर्षांतच श्रीमंतांसाठी रस्त्यावर चालवता येतील अशा गाड्या घडवायला फेरारीने सुरुवात केली.

सर्वशक्तिशाली ब्रँड

एंझो फेरारी तब्बल ९० वर्षं जगला. त्याच्या आयुष्यात फेरारीने ४,००० हून अधिक शर्यती जिंकल्या, आणि १३ विश्वचषक पटकावले. अनेक खस्ता खाऊन, धडपडत, खडतर परिस्थितींतून मार्ग काढत, अपयशांचा सामना करत अखेर यशोशिखर गाठलेला फेरारी हा आज जगातील सगळ्यांत ताकदवान ब्रँड आहे. आज भारतात उद्योजकतेचं महत्त्व वाढीस लागलेलं आहे. उद्यमशील तरुणांसाठी एंझो फेरारीची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशी आम्हाला खातरी आहे.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

One thought on “इतिहास ‘फेरारी’चा

  • June 29, 2020 at 4:18 pm
    Permalink

    Beautifully done!
    LeMans addition would have been icing on the cake!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *