हिडन फिगर्स – व्यक्ती तितक्या प्रकृती. (चित्रपट अभिप्राय)

जगात एवढ्या प्रवृत्तींची माणसं असतात. त्यांचे प्रकार आणि उपप्रकार मोजायचे म्हटलं, तर कदाचित अख्खं आयुष्य सुद्धा पुरणार नाही. पण प्रवृत्तीचा विकास कसा होत असतो बरं? ठरावीक परिस्थितींत, ठरावीक आविर्भाव मनाशी बाळगून वागलं की कालौघात निरीक्षकाला आपली प्रवृत्ती लक्षात येते. काही जणांच्या वागणुकीत सातत्य असतं, काही जणांच्या बाबतींत सतत बदल होत असतात. कोणी जास्त तर कोणी कमी सोशिक, कोणी फार बोलणारा तर कोणी कृतीतून स्वत:ला सिद्ध करून दाखवणारा, कोणाचा प्रतिक्रियात्मक मार्ग तर कोणी अभिनवतेतून पुढे वाट काढणारा, पण या सगळ्या मंडळींची, गोष्टी सहन करण्याची आपापली मर्यादा असते. एखादी गोष्ट सहनशक्तीच्या पलिकडे गेली, की अशा त्रासिक परिस्थितीतून पूर्णपणे स्वत:ला बाहेर काढून पळ घेणारे व्हायचं, की स्वत:ची बाजू ठामपणे मांडायचा निर्भीडपणे प्रयत्न करायचा, हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. या प्रयत्नावरून आपली प्रवृत्ती दिसून येते.

हिडन फिगर्स नावाच्या चित्रपटात, तीन भिन्न प्रवृत्तींच्या काळ्या स्त्रियांची खरी कहाणी मांडलेली आहे. १९६० च्या दशकात अमेरिकेतील नासा संस्थेत काम करणाऱ्या या स्त्रिया एकमेकींच्या मैत्रिणी असतात. त्यांची स्वत:ची काही गुणकौशल्यं असतात; पण तिघी काळ्या रंगाच्या असल्याने तत्कालीन अमेरिकन समाजव्यवस्थेत या गुणकौशल्यांचा आधार घेऊन प्रगती करण्यास त्यांना वाव मिळत नाही. तरी त्या झटत राहतात आणि तिघीही यशस्वी होतात अशी ही गोष्ट आहे.

इथे वाखाणण्याजोगी गोष्ट अशी, की या तिघींपैकी कोणतीही बाई तिच्या स्वत:च्या प्रवृत्तीच्या चौकटीपलिकडे जात नाही. सडेतोडपणे स्वत:ची मतं मांडणारी मेरी शेवटपर्यंत सडेतोडच राहते. तिला फटकळ समजणाऱ्या तिच्या मैत्रिणींनी तिला प्रसंगी कितीही गप्प बसवायचा प्रयत्न केला, तरी आपल्या सडेतोड वागण्यानेच ती स्वत:ची भूमिका आधी जोडीदाराला आणि मग तिच्या उच्च शिक्षणाबाबतचा निर्णय घेण्याची शक्ती असलेल्या न्यायाधीशाला पटवून देते. अडलेली कामं पूर्ण व्हावीत, यासाठी इतर कोणीही नेमलेलं नसतानासुद्धा, आपणहून पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारणारी डोरोथी, तंत्रज्ञानाच्या आव्हानामुळे नोकरी धोक्यात असताना व्यवस्थेला नावं ठेवत बसण्याऐवजी तंत्रज्ञानाबद्दल स्वत: शिकून घेते आणि इतरांनाही शिकायला लावते. तिच्या या स्वभावामुळेच स्वत:सोबत इतर अनेक काळ्या स्त्रियांच्या नोकऱ्या वाचवते, आणि नोकरीत बढतीही मिळवते. आणि मुख्य भूमिका असणारी कॅथरीन, इतर दोघींच्या मानाने जास्त सहनशील असणारी कॅथरीन जिथे तोंड उघडून आपली बाजू मांडायला हवी तिथे ती मांडायला कधीच चुकत नाही. यातून बोध असा मिळतो की तुमची प्रवृत्ती कशीही असली, आणि तुम्ही आव्हानांनी कितीही वेढलेले असलात, तरी तुम्ही तुमच्या मूलभूत वर्तनात सातत्य ठेवायला हवं. असं केलं तर तुमच्या सभोवतालची परिस्थिती हळूहळू का होईना, पण तुमच्याशी जुळवून घेतेच.

या चित्रपटातून आणखी एक गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे ठरावीक समाजव्यवस्थेचा परिणाम सर्वांच्या मानसिकतेवर होतोच असं नाही, आणि तो झाला तरी त्याचा प्रभाव टिकून राहतोच असंही नाही. प्रथम दर्शनी कोणत्याही व्यवस्थेचे कोणीतरी ‘बळी’ असतात आणि कोणीतरी ‘लाभार्थी’ असतात. पण ही व्यवस्था सुधारण्यासाठी बळी आणि लाभार्थींमध्ये त्यांच्या अवस्थेच्या निकषांवरून संघर्षच व्हायला हवा असं नाही. परिस्थिती ओळखून वागणारे आपसूक विवेकाकडे वळत असतात. आणि असा विवेक जागा ठेवणारी माणसं नेहमीच आपल्या आजुबाजूला असतात. व्यवस्थेचे लाभार्थी आणि बळी जेव्हा परस्पर सहकार्यानं काम करू लागतात, तेव्हा आपोआप दोघांमधली दरी नाहीशी व्हायला सुरुवात होते. ती पूर्णपणे मिटतेच असं नाही. वेळ लागतो, पण अंतिमत: दोघांचाही फायदाच होतो. कॅथरीन, मेरी आणि डोरोथी या तिघींनाही, त्यांनी आपापलं गुणप्रदर्शन केल्यावर, तत्कालीन व्यवस्थेचे त्यांच्या तुलनेत लाभार्थी असणारे लोक संधी आणि प्रोत्साहन देऊ करतात. सुरुवातीला हे लोक मोजकेच असतात, पण स्वत:चं मूल्य सिद्ध करत गेल्यावर त्यांच्याशी अतिशय तुसडेपणाने वागणाऱ्यांचाही त्यांना आदर मिळू लागतो.

इतरांविषयी आपण सगळेच अनेक समज गैरसमज करून घेत असतो. तसं केल्याने आपण चुकीचे ठरत असू, पण लगेच वाईट ठरत नाही. मतपरिवर्तन प्रत्येकाच्या बाबतीत शक्य असतं. आणि असं मतपरिवर्तन झालंय, हे शब्दबद्ध करायचीही गरज भासत नसते. चित्रपटाच्या अखेरीस हे अगदी सहज दाखवून दिलेलं आहे.

परिस्थितीला शत्रु मानून तिच्याशी झगडा करत राहाल, लढा देत राहाल, संघर्ष करत राहाल, तर कायम हरतच राहाल. जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल, तर मात्र नक्की जिंकू शकाल. झगडा, संघर्ष हा आपला आपल्याशीच असतो. तो एकदा सर केला, की परिस्थितीही तुम्हाला हतबल होऊ देत नाही. हिडन फिगर्स ही वास्तवावर आधारित बोधपर कथा आहे. रसिकांनी अवश्य आनंद घ्यायला हवा.

चित्रपटाचा दुवा

(सर्व प्रतिमा केवळ अभिप्राय देण्याच्या हेतुकरिता वापरलेल्या आहेत. प्रतिमा श्रेय : Hopper Stone/Hopper Stone, SMPSP – © TM & © 2016 Twentieth Century Fox Film Corporation.)

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *