जास्वंद : गणपतीच्या लाडक्या फुलाबद्दलच्या काही रंजक गोष्टी

जास्वंदाचं फूल म्हणजे आपल्या वस्तीतल्या आजी आजोबांचा अगदी जीव की प्राण.

एरवी अंगात अजिबात ताकद नसल्याचा आव आणणारी ही मंडळी जरा उंचावर लटकत असलेली जास्वंदाची फुलं दिसली, की कसली स्टंटबाजी करतात ते काही वेगळं सांगायला नको.

देठापासून निमुळती सुरुवात करून मोराच्या पिसाऱ्यासारखी मस्त फुलणारी जास्वंदाची पाकळी चित्रकारांना नेहमीच भुलवत असते. जास्वंदाचा लालबुंद फुलोरा आणि त्यातून डोकावणारा जास्वंदाचा तो देखणा तुरा पक्ष्यांना, फुलपाखरांना आणि मधमाश्यांना सतत खुणावत असतो.

या जास्वंदानं अवघ्या जगाला अशीच मोहिनी घातलेली आहे. आणि जगभरात या जास्वंदाला स्वत:चं अनोखं महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं.

चला तर मग, गणपतीच्या या लाडक्या पुष्पाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊ.

 

जगात जास्वंदाच्या तीनशेहून अधिक जाती आहेत.

विकिपीडियावर यातल्या बहुतेक जातींची यादी पाहायला मिळते.

साहजिकच विविध रंगांची आणि आकारांची जास्वंदी फुलं आपल्याला पाहायला मिळतात.

जास्वंदाची फुलं पांढरी, पिवळी, गुलाबी, जांभळी, लाल किंवा निळी असू शकतात.

 

चीन आणि थायलँड हे जास्वंदाच्या फुलाचे आघाडीचे उत्पादक आहेत.

संख्येने चीन आणि थायलँड हे जगात सर्वाधिक प्रमाणात जास्वंदाच्या फुलांचं उत्पादन करतात.

पण गुणवत्तेच्या बाबतीत दोघांच्या उत्पादनात खूप तफावत असते.

थायलँडमधील जास्वंदाची फुलं सहसा उत्तम दर्जाची असतात.

तीच चीनमधली फुलं तुलनेनं तेवढी काही खास नसतात.

गुणवत्तेच्या बाबतीत सुदानमधलं जास्वंद अतिशय प्रसिद्ध आहे, पण त्यांच्या उत्पादनाचं प्रमाण कमी आहे. आणि तिथे घेतली जाणारी बहुतेक फुलं जर्मनीमध्येच पाठवली जातात.

 

जास्वंदाच्या फुलांचा चहा करतात.

जास्वंदाच्या फुलाच्या सुकलेल्या पाकळ्यांचा किंवा देठांचा चहा हे एक जगभरात अनेक ठिकाणी लोकप्रिय असलेलं एक पेय आहे.

या पाकळ्या गरम पाण्यात घालून आठ दहा मिनिटं उकळवतात. पाणी लाल झालं की त्यात साखर घालतात.

मग हा जास्वंदी चहा थंडगार करून पितात.

मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील देशांमध्ये हा जास्वंदी चहा खूप लोकप्रिय आहे.

आफ्रिकेत पुदिन्याची पानं घालून हा चहा पितात.

हा चहा करण्यासाठी तिथे Hibiscus sabdariffa ही जास्वंदाची जात प्रामुख्याने वापरली जाते.

 

जास्वंदी चहाचे अनेक फायदे आहेत.

हा चहा अँटिऑक्सिडंट्सनी संपन्न असतो. .

जास्वंदाच्या चहात अँथोसायनिन्स आणि पॉलिफेनॉल्स असतात, जे आपल्या हृदयासाठी चांगले घटक असतात.

या चहामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होऊ शकते.

 

हवाईमध्ये जास्वंदाच्या फुलाला अनोखं सांस्कृतिक महत्त्व आहे.

पिवळ्या रंगाचं जास्वंद हे हवाईचं राज्यपुष्प आहे.

एकेकाळी हवाईमध्ये जास्वंदाचं फूल नष्ट होण्याच्या मार्गावर होतं. पण आता हवाईमध्ये अनेक ठिकाणी ते पाहायला मिळतं.

हवाईत जास्वंदाच्या तीसहून अधिक जाती पाहायला मिळतात.

तहिती आणि हवाईमध्ये जर एखाद्या स्त्रीने तिच्या कानात जास्वंद माळलेलं असेल, तर त्यावरून तिचं लग्न झालंय की नाही हे पाहणाऱ्याला समजू शकतं.

जर एखाद्या स्त्रीने तिच्या उजव्या कानाजवळ फूल माळलं असेल, तर ती स्त्री अविवाहित आहे असा त्याचा अर्थ होतो.

आणि जर त्या स्त्रीने डाव्या कानाशी फूल खोचलं असेल, तर त्याचा अर्थ त्या स्त्रीचं लग्न झालेलं असतं.

अर्थात हे फूल जास्वंदाचंच असायला हवं असा नियम नाही. पण एकच फूल कानाशी खोचायचं असेल तर बहुतेक स्त्रिया जास्वंदाच्याच फुलाला पसंती देतात.

 

भारतात जास्वंद हे देवांचं आवडतं फूल आहे.

हे अर्थातच अतिशय सामान्य ज्ञान आहे.

लहानपणापासून सगळेच पाहतो, की गणपतीला आणि देवीला आपण नेहमी जास्वंदाची फुलं वाहतो.

बंगालमध्ये काली मातेला लाल जास्वंदाच्या १०८ फुलांचा हार वाहतात.


तुम्हाला माहितीये, तुम्ही ब्रह्मकमळ समजून ज्या फुलाची पूजा करता ते खरं ब्रह्मकमळ नाहीच्चे. हा लेख वाचा आणि नीट समजून घ्या


चीनमध्ये जास्वंदाचं फूल बूट पॉलिश करण्यासाठी वापरतात.

चीनमध्ये Rosa sinensis जातीच्या जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्यांचा काळा रस काढून तो केसांना आणि भुवयांना कलप म्हणून लावतात.

या फुलाचा रस काढून तो बूट पॉलिश करण्यासाठीसुद्धा वापरला जातो.

या कारणास्तव जास्वंदाच्या फुलाला ‘शू फ्लॉवर’ असंही नाव आहे.

एवढं सुंदर फूल आणि त्याचा असा वापर होतो याची खरं तर कल्पनाच करावीशी वाटत नाही.

शेवटी चीनी मंडळींकडून आणखी काय अपेक्षा ठेवावी!

 

जास्वंदाच्या पानाफुलांचा लेप करून तो शाम्पूसारखा वापरता येतो.

जास्वंदाची ताजी फुलं आणि कोवळी पानं घेऊन ती स्वच्छ धुतात.

मग फुलाच्या पाकळ्या वेगळ्या करून ती आणि पानं पाण्यात १० – १५ मिनिटं भिजवून ठेवतात.

यामुळे ती आणखीन मऊ होतात. मग त्यांना छानपैकी वाटून घेतात.

यातून जो लेप तयार होतो तो केसांना शाम्पूसारखा लावतात.

अर्थात हा बाजारातल्या शाम्पूसारखा फेसाळ नसतो.

 

जास्वंदाच्या जातीनुसार ते किती जगेल हे ठरतं.

जास्वंदाच्या काही जाती फक्त वर्षभरच टिकतात.

तर Hibiscus rosa-sinensis सारख्या काही जाती खूप काळ टिकू शकतात आणि बारामाही फुलूही शकतात.

जास्वंद दिवसभरासाठी फुलून मग कोमेजून जातं. त्याची हिरवी पानं पिकून पिवळी होतात. पण पिकून गळून गेलेली ही पानंसुद्धा खूप सुंदर दिसतात.

सर्वांगानं सुंदर असलेलं हे फूल आपल्या सर्वांच्याच आयुष्यात तजेला आणत राहतं.

म्हणूनच खिडकीतल्या कुंडीत नाहीतर अंगणात जास्वंदाचं एखादं झाड तरी असावंच. म्हणजे त्याच्या फुलासारखं आपलं आयुष्यसुद्धा अगदी टवटवीत आणि प्रसन्न होतं.

 

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *