चीनमधली डुकरं मेल्याने हेपॅरिन औषधाचा तुटवडा; पर्याय म्हणून गुरांचा विचार

चीनच्या लायोनिंग प्रांतामधील शेनबे जिल्ह्यामध्ये १ जुलै ते १ ऑगस्ट २०१८ या एका महिन्याच्या काळात एका शेतकऱ्याकडची ४७ डुकरं मेली. दुसऱ्या एका संशोधन निबंधात उल्लेख असा येतो, की जून २०१८ पासून त्याच भागातली ४०० डुकरं महिन्याभरात मेली. स्थानिक पशुवैद्यांनी शवचिकित्सा केल्यावर लक्षात आलं की या डुकरांच्या प्लीहा खूप सुजल्या होत्या; चिकित्सकांनी २ मृत डुकरांबरोबरच ६ जिवंत डुकरांचेही नमुने घेतले आणि त्यांच्यावर जागतिक आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून चाचण्या केल्या. निष्कर्षातून पुढे आलं की चीनमधल्या या डुकरांना आफ्रिकन स्वाइन फीव्हर (ASF) झाला होता.

आफ्रिकन स्वाइन फीव्हर या आजारामुळे पाळीव डुकराला खूप ताप येतो, शरीरात रक्तस्राव होतो, गतिविभ्रम होतो आणि भयंकर नैराश्य येतं. हा आजार जडलेल्या पशुंचा मृत्युदर जवळपास १००% पर्यंत असतो.

आफ्रिकन स्वाइन फीव्हर सर्वप्रथम केनियामध्ये १९२१ साली नोंदवला गेला. २००७ साली तो जॉर्जिया देशात अवतरला. तिथून तो शेजारच्या रशियात गेला. पुढे २०१२ साली युक्रेनमध्ये, २०१३ साली बेलारुसमध्ये, २०१४ साली लिथुआनिया, एस्टोनिया, पोलंड, लाटविया या देशांमध्ये पसरला. २०१७ साली रोमानिया, झेक रीपब्लिक आणि २०१८ साली तो हंगेरीमध्ये पोहोचला.

तो चीनमध्ये कसा पोहोचला हे निश्चित नाही. काही अभ्यासकांच्या मते तो रशियामधून आला असावा, पण रशियातले अभ्यासक हे मानायला तयार नाहीत. अधिकृतपणे रशिया चीनमध्ये पोर्क निर्यात करत नाही. पण अभ्यासकांचा अंदाज असा आहे की रशियातून चीनमध्ये होणाऱ्या पोर्कच्या तस्करीमार्फत किंवा युरोपातून निर्यात झालेल्या बाधित पोर्कमार्फत हा रोग चीनमध्ये अवतरला असावा.

पण चीनमध्ये अवतरल्यावर या विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली एवढं मात्र खरं. इतका, की पाळीव डुकरांबरोबरच १६ नोव्हेंबर २०१८ रोजी एका रानडुकरालाही याची लागण झाल्याची बातमी आली. चीनपुरतं सांगायचं तर हा रोग आटोक्यात आलेला नाही. ऑगस्ट २०१९ च्या अखेरीपर्यंत, लायोनिंग प्रांतातून तो देशातल्या ३१ प्रांतांमधील १०७ शहरांमध्ये फोफावला होता. २०१९ सालीच चीनमधून हा रोग दक्षिण कोरियातही पसरला. या एका वर्षात चीनमधली जवळपास अर्धी डुकरं मरण पावली (जगाच्या तुलनेत सुमारे एक चतुर्थांश).

या विषाणूची बाधा मनुष्याला होत नसली, तरी डुकराच्या मांसाच्या बाजारावर जागतिक पातळीवर याचे परिणाम होऊ लागले. एकट्या चीनमध्येच डुकराच्या मांसाच्या किंमती खूप वाढल्या. पोर्कच्या आयातीत २०१९ च्या पहिल्या सात महिन्यांत ३६% नी वाढ झाली, आणि स्थानिक पोर्कच्या किंमतीत २७% नी वाढ झाली. वर्षाच्या अखेरीपर्यंत हा रोग आटोक्यात येण्याची चिह्नं दिसू लागली होती, चीनी नूतन वर्ष येऊ घातलं होतं. या सुमारास ग्राहक पोर्क साठवायला सुरुवात करतात, आणि पोर्कच्या किंमती वाढू लागतात. पोर्कचा पुरवठा कमी होऊन किंमती आणखी वाढाव्यात, या उद्देशाने निरोगी डुकरांच्या कळपात ASF चा संसर्ग मुद्दामहून पसरवण्याचे उद्योग काही अतिहावरट माणसांनी केले. हे पसरवण्यासाठी या दिवट्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर केला. या उचापत्या अधून मधून अशाच सुरु राहिल्या तर पोर्कचा पुरवठा अखंडपणे सुरु राहणं भविष्यातही कठीण होऊन बसेल. पोर्क खाणाऱ्यांबरोबरच, औषध उद्योगालाही याची झळ बसेल.

हेपॅरिनच्या उत्पादनावर परिणाम

हेपॅरिन हे औषध विविध रोगांवर इलाज करण्याच्या उद्देशाने वापरतात, विशेषत: हृदयविकारासाठी या औषधाचा उपयोग होतो. कारण हे औषध रक्त पातळ करतं, थोडक्यात रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही.

Heparin
हेपॅरिनचे रासायनिक संघटन

 

हेपॅरिनमधील एक महत्त्वाचा घटक डुकराच्या आतड्यातून मिळवला जातो. चीनमधील लक्षावधी डुकरं आफ्रिकन स्वाइन फीव्हरने मेल्यामुळे हेपॅरिनच्या उत्पादनावर परिणाम झाला, आणि जागतिक बाजारपेठेत त्याचा तुटवडा भासू लागला. यावर उपाय म्हणून मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटल या अमेरिकन वैद्यकीय संस्थेने हेपॅरिनच्या संवर्धनावर भर द्यायला सुरुवात केली. या औषधाचा अपव्यय होणार नाही याकडे ही संस्था कसोशीनं लक्ष देऊ लागली. त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत हेपॅरिनचा वापर ८०% नी कमी करून दाखवला.

Heparin Sodium sample

डुकरांव्यतिरिक्त गुरांच्या फुफ्फुसांपासूनही हेपॅरिनसाठी मिळणारे आवश्यक घटक मिळवण्याची प्रथा आधी अस्तित्वात होती. मात्र यामुळे बोवाइन स्पॉन्जिफॉर्म एन्सीफॅलोपाथी (BSE) – यालाच मॅड काऊ डिसीझ म्हणतात – आणि रुट्झफेल्ट जेकब्स डिसीझ हा मेंदूचा विकार होण्याचा धोका संभावतो. म्हणून १९९० च्या दशकात ही प्रथा कमी कमी होत गेली. यासाठी इंग्लंडमध्ये झालेला मॅड काऊ डिसीझचा प्रादुर्भाव कारणीभूत ठरला. (तरी ब्राझिलसारख्या देशांमध्ये गुरांचं प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने २००८ पर्यंत गुरांपासून मिळवलेल्या हेपॅरिनचा वापर होत होता.)

Bse-cattle-250
BSE ची लागण झालेली गाय, वजनात घट.

युनायटेड किंग्डममध्ये वासरांना मृत पशुंच्या मांसापासून आणि हाडांपासून तयार केलेला आहार खायला दिला जायचा (MBM). याचा परिणाम असा झाला की यामुळे इथल्या बहुतेक गुरांना संसर्ग होऊन मॅड काऊ डिसीझची लागण झाली. हा रोग जडल्यानंतर गुरांच्या वर्तनात बदल होतो, त्यांना चालताना त्रास होतो आणि त्यांच्या वजनातही घट होते. जसजसा हा रोग बळावत जातो, तसं गुरांना जागेवरून हलणंही कठीण होऊन बसतं. संसर्गाची लागण झाल्यानंतर ही लक्षणं दिसायला सहसा चार ते पाच वर्षांचा अवधी जातो. या रोगाचा नायनाट करण्याच्या प्रक्रियेत ४४ लाख गायी मारल्या गेल्या. रोगाचा प्रादुर्भाव झालेला असताना मॅड काऊ डिसीझने ग्रस्त असलेली काही लाख गुरं तरी मानवी खाद्याच्या पुरवठ्यात पाठवली गेली असा अंदाज वर्तवला जातो.

हा रोग झालेल्या गुराचं मांस खाल्लं की माणसाला रुट्झफेल्ट जेकब्स डिसीझ हा मेंदूचा विकार जडतो. या विकाराची लागण झाल्यावर सहसा माणूस सरासरी १३ महिने जगतो. २०१२ साली झालेल्या एका अभ्यासातून असं निदर्शनास आलं, की युकेमधल्या दर २००० पैकी एका व्यक्तीमध्ये या विकारासाठी जबाबदार असणाऱ्या प्रिऑन प्रथिनाचा असामान्य प्रमाणात संचय झालेला आढळून येतो.

म्हणूनच आजही युरोपात ३० महिन्यांहून जास्त वयाच्या गुरांना मानवी खाद्य होऊ देत नाहीत किंवा पशुखाद्यासाठीही त्यांचा वापर होऊ देत नाहीत. ३० महिन्यांहून जास्त वयाच्या गुराला खायचं असेल किंवा खाद्य म्हणून विकायचं असेल, तर आधी त्याची चाचणी करावी लागते.

आज जगातल्या बहुतांश देशांमध्ये आता रवंथ करणाऱ्या प्राण्यांना MBM खाऊ घालण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. अजूनही अमेरिकेत कुत्र्या-मांजरांच्या खाद्यात घालायला MBM चा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. युरोपात MBM चा वापर जैव-इंधन म्हणून जास्त होतो.

वर सांगितल्याप्रमाणे, डुकरांमध्ये रोगाची साथ अधूनमधून पसरत असल्याने, आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेचं नुकसान होत असल्याने, पुन्हा गुरांकडून हेपॅरिनसाठी लागणारा घटक मिळवण्याचा विचार होऊ लागलाय. त्यासाठीचे प्रयोगही सुरु झालेले आहेत. गुरांपासून मिळणारं हेपॅरिन किती सुरक्षित आहे, ब्राझिल आणि अर्जेंटिनासारखे देश अजूनही त्यांचा कसा वापर करतायत, याचे दाखले देत अमेरिकेचं अन्न आणि औषध प्रशासन (FDA) त्याच्या वापरास उत्तेजन देऊ पाहतंय. यासंबंधाने होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे, कारण हेपॅरिन हे बऱ्यापैकी सुरक्षित औषध मानलं जातं.

चीनवरील बरणीतील सर्व लेख वाचा

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *