अर्जेंटिनामधलं गिटाराच्या आकाराचं जंगल

आपल्या जिव्हाळ्याचा माणूस अनपेक्षितपणे दुरावला तर त्याच्या वियोगाने वेडेपिसे होऊन काहीतरी भन्नाट करून दाखवणारं एक उदाहरण भारताकडे आहे, ते दशरथ मांझी यांचं. या माणसाने एकट्याने अख्खा डोंगर पोखरून काढला, आणि लोकांना ये-जा करण्यासाठी एक सुरक्षित वाट तयार करून दिली.

ब्रह्मपुत्रेच्या पुरात वाहून मेलेले प्राणी पाहावले नाहीत म्हणून गेली जवळ जवळ चाळीसेक वर्षं एकहाती जंगल उभं करणारे जादव पाएंगसुद्धा या देशाला लाभलेले आहेत. अशी अतिअचाट माणसं मोजकीच असली, तरी ती जगात सर्वत्र विखुरलेली आहेत आणि त्यांच्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या कथा आपण सतत ऐकत आणि वाचत राहायला हव्यात.

अर्जेंटिना देशातल्या कोर्दोबा प्रांतातल्या लॅबूलश शहरामध्ये राहणारी ग्रेशिएला एक दिवस विमानातून उडता उडता खाली पसरलेल्या आपल्या विस्तीर्ण शेतांकडे पाहात होती. तिला एका शेताच्या एका तुकड्यावर दुधाच्या बादलीच्या आकाराचा एक उंचवटा दिसला. त्याच्यावर एखादी नक्षी असायला हवी, जी आकाशातून पाहिली की मन प्रसन्न होईल, अशी कल्पना तिला सुचली. खाली उतरल्यावर तिने आपला नवरा पेड्रो मार्टिन उरेटा याला आपली कल्पना बोलून दाखवली. गिटार हे वाद्य ग्रेशिएलाच्या आवडीचं. आपण गिटाराच्या आकाराची नक्षी तयार करूया असं ती पेड्रोला म्हणाली. पेड्रो एकतर नेहमी आपल्या कामात गर्क असायचा. दुसरं म्हणजे त्याला विमानात बसायची भीती, मग तो ती नक्षी पाहणार तरी कसा? त्यामुळे तेव्हा त्याने काही फारसा उत्साह दाखवला नाही. ग्रेशिएलाचं स्वप्न तात्पुरतं तरी अर्धवटच राहिलं.

पेड्रो आणि ग्रेशिएला यांना चार मुलं होती. वयाच्या २५व्या वर्षी ग्रेशिएला पुन्हा एकदा गरोदर राहिली. पाचवं बाळ पोटात वाढत असताना ग्रेशिएलाच्या मेंदूमधली नस फुगली आणि बाळासकट ग्रेशिएलाचा मृत्यु झाला. पेड्रो कमालीचा व्यथित झाला. बायको जिवंत असताना तिची इच्छा पूर्ण केली नाही, याबद्दल तो सतत पश्चात्ताप करायचा.

शेवटी एक दिवस त्याच्या मनाने निर्धार केला. ग्रेशिएला वारल्यानंतर दोन वर्षांनी, म्हणजे १९७९ साली पेड्रोने आपल्या चारही मुलांना मदतीला घेऊन गिटाराच्या आकाराचं जंगल उभारायला सुरुवात केली. आठच्या आकाराचा गिटारचा खोका दाखवण्यासाठी सायप्रसची, आणि गिटारच्या तारा दाखवण्यासाठी निळ्या रंगांची नीलगिरीची झाडं त्यानं लावली.

झाडं लावायला सुरुवात केल्यावर त्याचे मुलगे एझेकिएल आणि इग्नाशिओ, आणि मुली सोलेदाद आणि मारिया ज्युलिया या एकमेकांपासून तीन-तीन मीटरच्या अंतरावर उभ्या राहायच्या आणि रोपटी लावायच्या. त्यांना ही रोपटी पुन्हा पुन्हा लावावी लागायची कारण ससे आणि डुकरं बरीच नासधूस करत असत. पण या कुटुंबाने आपला निर्धार कायम ठेवला आणि हे जंगल उभारून दाखवलं.

फोटो स्रोत : इंटरनेट

आज पेड्रो सत्त्याहत्तर वर्षांचा आहे. तरीही तो हे जंगल जपतोय. गंमत म्हणजे, अजूनही विमानातून उडायची भीती वाटत असल्याने पेड्रोने आजवर आपलं हे जंगल प्रत्यक्ष आकाशातून पाहिलेलंच नाहीये. त्याने फक्त इतरांनी काढलेले फोटो पाहिलेत आणि तेवढ्यावर समाधान मानलंय.

पेड्रोच्या एक किलोमीटरहून जास्त लांब पसरलेल्या या गिटारच्या जंगलात आज जवळपास ७००० झाडं आहेत. हे जंगल गूगलच्या नकाशावर 33°52’04.4″S 63°59’13.2″W या अक्षांश-रेखांशांवर पाहता येऊ शकतं.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *