वेलीसारखा दिसणारा हरणटोळ साप

तो नाही का हिरवा साप, जो झाडावर राहतो आणि खालून जाणाऱ्या माणसाचा टाळू फोडतो!

‘हरणटोळ’ सापासंदर्भात हमखास कानावर पडणारं हे वाक्य. लांब, निमुळता, हिरव्या चमकदार शरीराचा, आडव्या डोळ्याच्या बाहुलीचा हा साप मुख्यतः झाडावर किंवा अगदी दाट झुडुपात दिसून येतो, पण तो सुद्धा त्यालाच ज्याची नजर सरावलेली असते!

दाट झुडुपात हरणटोळ साप हिरव्या वेलीसारखा भासत असल्यामुळे त्याला दिलेलं ‘ग्रीन वाइन स्नेक’ (green vine snake) हे इंग्रजी नाव चपखल बसतं. हा साप भारताबरोबरच श्रीलंका, बांग्लादेश, थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार आणि कंबोडिया ह्या देशात आढळून येतो. हरणटोळाचं वैज्ञानिक नाव ‘अहेतुला नासुटा’ (Ahaetulla nasuta) असून, ‘अहेतुला’ हा शब्द सिंहली भाषेतून आला आहे. सिंहली भाषेत ‘अहेतुला’ ह्या शब्दाचा अर्थ ‘नजरेचा वेध घेणारा’ असा होतो. ‘कुणाकडून डिवचला गेला असता, हा साप आपल्या टोकेरी तोंडाचा वापर करून त्या व्यक्तीचे डोळे फोडतो’ असा खोटा समज श्रीलंकेत पूर्वापार चालत आल्याने त्यांनी ह्या सापाला ठेवलेलं नाव किती साहजिक आहे ते त्याच्या तोंडाच्या आकारावरून कळतं.

हरणटोळ सापाचं टोकेरी डोकं

आपल्याकडे आढळणाऱ्या हरणटोळ सापाचा एक बऱ्याच प्रमाणात सारखा दिसणारा लांबचा नातेवाईक मेक्सिको देशात मिळतो. इंग्रजीत त्यालाही ‘ग्रीन वाइन स्नेक’ असं संबोधलं जात असले तरी त्याचं वैज्ञानिक नाव ‘ऑक्सिबेलीस फलगीडस’ (Oxybelis fulgidus) आहे. ह्या दोन सापांमधला पाहताच क्षणी लक्षात येणारा फरक म्हणजे त्यांचे डोळे! आपल्याकडे मिळणाऱ्या हरणटोळ सापाच्या डोळ्याची बाहुली आडवी असते, तर मेक्सिकोमध्ये मिळणाऱ्या सापाच्या डोळ्याची बाहुली गोल असते.

हरणटोळ सापाच्या डोळ्याची बाहुली आडवी असते

हरणटोळ सापाची गणना ‘निमविषारी’ सापांमध्ये होते. म्हणजेच ह्या सापाचा आपल्याला दंश झाल्यास हाताला सूज येणं, ताप येणं अशी लक्षणं दिसून येतात. पण हे विष जरी आपल्यासाठी घातक नसलं तरी हरणटोळ सापाच्या भक्ष्यासाठी म्हणजेच छोट्या प्राण्यांसाठी ते जीवघेणं ठरतं.

हरणटोळ साप मुख्यतः दिनचर असून त्याच्या आहारात पाली, बेडूक, सरडे, लहान पक्षी आणि क्वचित इतर लहान सापांचा समावेश होतो. हरणटोळ सापाची मादी अंडी देत नाही, तिच्या पिल्लांची वाढ तिच्या पोटात असलेल्या अंड्यांसारख्या पिशवीत होते आणि एकदा का पिल्लांची वाढ पूर्ण झाली की मादी एकेक करून पिल्लांना जन्म देते. बहुतेक सापांप्रमाणे हरणटोळ सापाची पिल्लंही जन्माला आल्या आल्या स्वावलंबी आयुष्य जगायला सुरुवात करतात. पूर्ण वाढ झालेल्या हरणटोळ सापाची सरासरी लांबी तीन फूट आणि अधिकतम लांबी सहा फूट इतकी नोंदवली गेली आहे.

रात्रीच्या वेळी झाडावर विश्रांती घेणारा हरणटोळ साप

समोरून एखादी व्यक्ती किंवा मोठं जनावर आल्यावर हरणटोळ आहे त्या स्थितीत स्तब्ध राहतो आणि शक्य तितकी कमी हालचाल करतो. सभोवतालचा अंदाज घेण्याकरता काही सेकंदांसाठी जीभ बाहेर काढून ती तशीच ठेवतो. जर ती व्यक्ती अगदीच त्या सापाच्या जवळ गेली तर मात्र स्वतःला लपवण्यासाठी हरणटोळ पालपाचोळ्यात पळ काढतो. मात्र डिवचला गेला असता हरणटोळ साप, त्याचं शरीर चपटं करून तोंड उघडून हिरव्या रंगाखाली लपलेले काळे पांढरे खवले दाखवतो आणि त्याच स्थितीत दंश करतो!

हरणटोळ साप डिवचला गेला की दंश करतो

अगदी शहरातही हमखास आढळणारा हा साप आपण माणसांनी रचलेल्या भाकडकथांचा बळी पडतो ह्यात काही नवल नाही. लेखाच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे, ‘हरणटोळ टाळू फोडतो’ ही त्यातल्या त्यात सर्वांत जास्त जागलेली भाकडकथा! एक तर हा साप झाडावर राहतो. त्यात कळत-नकळत कोणी त्याला डिवचला, तर माणसाचं डोकं हा एकच भाग हल्ला करण्यासाठी त्याच्या सगळ्यात जवळ असतो. खरं तर माणसाच्या कवटीचं हाड इतकं कठीण असतं की त्यावर शस्त्रक्रिया करताना ते फोडण्याकरता डॉक्टर छिन्नी हातोड्याचा वापर करतात! ह्याउलट हरणटोळ सापाचं डोकं निमुळतं आणि टोकदार असलं तरी ते इतकं नाजूक असतं की त्याला बसलेल्या थोड्याशा झटक्यानंही ते वाकतं!

हा बारीकसा लांबलचक आणि गरीब बिच्चारा साप कोणाच्या अध्यातमध्यात नसतो. चुकून संपर्कात आलाच कोणाच्या. तर तिथूनही तो सटकायचाच प्रयत्न करतो. त्यामुळे शहाण्या सूज्ञ माणसांनी हा साप दिसलाच तर घाबरून न जाता आपल्या वाटेनं पुढे जात राहावं, आणि त्यालाही जाऊ द्यावं.

(सापांबद्दल माहिती देणारी पुस्तकं)

हा लेख इतरांना पाठवा

गौरव पाटील

सागरी जीव अभ्यासक, छायाचित्रकार आणि चित्रकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *