सीतेची वेणी : वनदेवतेचा आवडता गजरा । वनी वसे ते

आजकाल सगळे घरी बसून जुन्या काळात हरवले आहेत. पूर्वी प्रसारित झालेल्या रामायण, महाभारतासारख्या मालिका बघत आहेत.

त्या काळातील संदर्भ असलेल्या सीतेची वेणी, द्रौपदीमाला या फुलाबद्दल थोडं जाणून घेऊया.

सीतेची वेणी हे ऑर्किड प्रकारातील झाड असून हे आंबा, फणस अशा वृक्षांवर वाढतं.

तशी या वनस्पतीला बरीच नावं आहेत.

याची फुलं कोणा इंग्रज निरीक्षकाला कोल्ह्याच्या शेपटासारखी दिसली, म्हणून या फुलांचं इंग्रजी सामान्य नाव कोल्हयाच्या शेपटाची अमरी (Foxtail Orchid) असं आहे.

माझ्या मते हे काहीसं बोजड नाव आहे.

मराठीत तर या फुलाला सीतेची वेणी, गजरा, फणस केळी अशी वेगवेगळी नावं आहेत.

बऱ्याच वेळा वापरण्याच्या पद्धतीवरून नावं योजली जातात.

या फुलांचा गुच्छ केसांत गजऱ्यासारखा माळत असावेत, म्हणून याला मराठीत गजरा म्हणत असावेत असं मानायला वाव आहे.

हिंदीमध्ये या फुलाला द्रौपदीमाला म्हणतात.

आता सीता आणि द्रौपदी दोघींनीही काही काळ रानात व्यतीत केल्याने आणि या फुलांचा तुरा गजऱ्याप्रमाणे दिसत असल्याने या दोघींची नावं या फुलांशी जोडली गेली असं मानायला हरकत नाही.

सीतेची वेणी अतिशीत प्रदेश वगळता जवळपास सर्व ठिकाणी आढळते.

सीतेची वेणी

पण मुख्यत: समशीतोष्ण वातावरणात याची वाढ चांगल्या प्रकारे होते.

ही वनस्पती प्रामुख्याने पानगळी आणि शुष्क वन प्रदेशात आढळते.

या झाडाला उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजे एप्रिल – मे दरम्यान फुलं येतात आणि फळं साधारणत: जुलै – डिसेंबर या काळात येतात.

याचं वनस्पती शास्त्रीय नाव (Rhynchostylisretusa (L.)Blume) असून वर उल्लेखल्याप्रमाणे ऑर्किड कुळातली ही वनस्पती आहे.

भारतात ऑर्किड प्रजातीचे जवळपास १४० प्रकारचे १३०० वेगवेगळे उपप्रकार आढळतात, तर जगभरात ७६३ प्रकारचे २५०००-३०००० उपप्रकार आहेत.

यातल्या काही वनस्पती मोठ्या झाडांवर वाढतात, काही जमिनीवर वाढतात, काही तर कुजलेल्या ओंडक्यांवर सुद्धा वाढतात.

आसाम या राज्याने सीतेच्या वेणीला राज्यपुष्पाचा दर्जा दिलेला आहे.

सीतेची वेणी फुलोरा

ही वनस्पती भारताबाहेरही भरपूर देशांमध्ये आढळून येते.

सीतेची वेणी मोठ्या वृक्षांवर वाढते.

पण मोठ्या वृक्षांवर वाढत असली तरी ही काही परपोषी वनस्पती नाही.

तिला असणाऱ्या पानं आणि मुळांपासून ही वनस्पती स्वत:चं अन्न स्वत: तयार करते.

सीतेच्या वेणीची मुळं हवेतील बाष्प शोषून घेतात आणि हरितद्रव्यांच्या साहाय्याने स्वत:चं अन्न स्वत: तयार करतात.

फक्त आधारासाठी या वनस्पती मोठ्या वृक्षांवर अवलंबून असतात.

याची पानं जाड असून मध्ये दुमडलेली असल्यामुळे पानांना पन्हळीसारखा आकार येतो.

आंबा, फणस, ऐन, शिसम, मोह इत्यादी वृक्षांवर सीतेची वेणी बऱ्याच वेळा दृष्टीस पडते, म्हणूनच या वनस्पतीला कोकणी भाषेत फणस केळी म्हणत असावेत.

सीतेची वेणी बहरली की मोठ्या वृक्षांवरून लोंबकळणारे फुलांचे तुरे बघून मन प्रसन्न होतं.

वसंत ऋतूच्या सुरुवातीला आसाममध्ये मुली आणि स्त्रिया ‘रोंगाली बिहू’ या लोकनृत्य प्रकारात तसेच लग्न समारंभात सीतेची वेणी केसात माळतात.

आसामी तरुणांमध्ये ही वनस्पती प्रेम, प्रजनन आणि आनंद याचं प्रतीक म्हणून नावाजली जाते.

या वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख सुश्रुत संहितेत आणि चरक ग्रंथात आढळतो.

याच्या खोडाचा उपयोग कापल्यामुळे होणाऱ्या घावांवर होतो.

याबरोबरच अस्थमा, त्वचा रोग, मलेरिया, मुतखडा यावरसुद्धा या वनस्पतीचा उपयोग होतो.

सीतेची वेणी जवळून

 

 

सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, त्याचप्रमाणे नष्ट होणारे अधिवास, प्रदूषण, हवामान बदल या सर्व घटकांमुळे या वनस्पतीची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

या सर्वांमुळे या वनस्पतीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

वरील कारणं लक्षात घेऊन या वनस्पतीचं धोक्यात असलेली प्रजाती म्हणून वर्गीकरण केलेलं आहे.

त्याचप्रमाणे CITES (Convention on International Trade in Endangered Species) नुसार या वनस्पतीचं वर्गीकरण सूची क्र. II मध्ये करण्यात आलेलं आहे.

आपल्याला जर ही फुलं दिसली, तर त्यांना न दुखावता फक्त फोटो टिपून किंवा नुसते डोळ्यांनी त्यांचं सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध होऊया.

हिरव्या धाग्यात बांधलेला गुलाबी, पांढरा, जांभळा अशा रंगांची सरमिसळ असणारा हा गजरा पाहायला मिळणं मोठं भाग्याचंच नाही का?

मग हे भाग्य असंच सर्वांना लाभत राहो  यासाठी आपण प्रयत्नशील राहूया.


धनंजय राऊळ यांचे इतर रंजक लेख वाचा :

स्थलपद्म : जमिनीवर उगवणारं कमळ

ऑर्किडची गोष्ट : मोहक फुलाची रंजक माहिती

खंडाळ्याची राणी : अर्थात वाघचौरा

एक नवीन आणि लक्षवेधी ऑर्किड


 

हा लेख इतरांना पाठवा

धनंजय राऊळ

नमस्कार, मी धनंजय द. राऊळ. मी वनस्पती शास्त्रातून माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून मला निसर्गातील जैवविविधता अभ्यासणे आवडते. निसर्गातील विविध घटकांचे छायाचित्रण करण्याचा मला छंद आहे. त्याचप्रमाणे नवनवीन जागी भटकंती करण्याचीही आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *