१४ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर चालत होता – चार पायांचा साप !

वाटेतनं चालताना बाजूच्या गवतातनं किंवा झाडीतनं सरपटण्याचा आवाज आला, की मग तो सरपटणारा प्राणी प्रत्यक्षात कोणीही असला तरी आपल्या डोक्यात पहिल्यांदा, ‘साप तर नाही ना?’ अशी भीती उत्पन्न होते. माणसाच्या आजच्या मेंदूची जडणघडण तो सापाला घाबरेल अशीच झालेली दिसते. सापच कशाला, भिंतीवरनं भली मोठाली पाल जरीही झरझर जाताना दिसली तरी कित्येकांच्या अंगावर काटा उभा राहतो!

Tetrapodophis amplectus 3483

‘सरपटणार तो साप’ आणि ‘साप म्हटला की घाबरायचं’ ही समीकरणं डोक्यात फिट्ट बसलेल्या लोकांची पळता भुई थोडी झाली असती, असाही एक कालखंड होता, ज्यामध्ये साप हा चार पाय असणारा प्राणी होता. या हटके सापाचं नाव होतं, ‘टेट्रापोडोफिस’.

 

टेट्रापोडोफिस या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘चार पायांचा’ असाच होतो. या सापाला दोन पुढचे आणि दोन मागचे असे व्यवस्थित विकसित झालेले एकूण चार पाय होते. या पायांचा उपयोग चालण्यासाठी तितकासा होत नसावा (म्हणूनच भविष्यात त्यांचा पत्ता कट झाला असणार); पण त्या पायांना असलेल्या लांब बोटांवरनं समजतं की शिकार पकडण्यासाठी हे पाय नक्कीच उपयुक्त होते. या सापाचं हे वैशिष्ट्य सापाच्या इतर कोणत्याही नष्ट झालेल्या किंवा अजूनही अस्तित्वात असलेल्या (हुश्श) जातीमध्ये आढळलेलं नाही. असं असलं तरी या सापाची इतर वैशिष्ट्यं साध्या-सामान्य, गरीब बिचाऱ्या सरपटणाऱ्या सापासारखीच आहेत. आता हा साप आगही ओकत असता, तर त्याला २० सेंटीमीटरचा ड्रॅगन म्हणायला आपण मोकळे झालो असतो.

Tetrapodophis hindlimbs

या सापाच्या सांगाड्याचा अख्खा अवशेष जर्मनीतल्या म्युलर म्युझियमात एका चुनखडकात जतन केलेला आहे. तिथे तो बराच काळ बेवारशी पडून होता, आणि त्याला ‘अज्ञात अवशेष’ अशी पट्टी जोडलेली होती. डेव्हिड मार्टिल नावाच्या पुराजीवशास्त्रज्ञाने हा अवशेष कशाचा आहे हे शोधायचंच असं ठरवून त्याचं निरखून निरीक्षण केलं. आणि या प्राण्याला चार पाय आहेत हे पाहून तो उडालाच. गंमत म्हणजे त्याच्या आतड्यात इतर प्राण्यांच्या हाडांचेही अवशेष मिळालेले आहेत. त्यावरून कळतं की इतर अनेक सापांसारखा हा सापसुद्धा मांसाहारीच होता.

२०१५ साली या सापाला टेट्रापोडोफिस ॲम्प्लिक्टस असं नाव देण्यात आलं.

 

टेट्रापोडोफिसचा कणा छोटा असल्यावरून हा साप बिळं खोदू शकायचा असं दिसून येतं. आजच्या सापांची उत्क्रांती कशी झाली याबाबतचे दोन सिद्धांत आहेत. एक सिद्धांत असा की हे प्राणी पाण्यामध्ये उत्क्रांत होऊन मग त्यातले काही जमिनीवर आले, तर दुसरा सिद्धांत असा की सापांचं आजचं रूप जमिनीवरच उत्क्रांत झालं. टेट्रापोडोफिसच्या जमीन खोदण्याच्या क्षमतेमुळे आज नको तिथे वळवळताना दिसणारे साप जमिनीवरच उत्क्रांत झाल्याच्या सिद्धांताला बळकटी मिळते.

 

(समुद्री सापांबद्दल सविस्तार प्राथमिक माहिती वाचा)

 

पण हा चार पायांचा साप नक्की ‘साप’च होता की एखादी पाल होती, यावरनं संशोधकांमध्ये झकाझकी चालू आहे. कारण १४ कोटी वर्षांपूर्वी क्रिटेशियस कालखंडातल्या टेट्रापोडोफिसच्या आधीही बिनपायाचे साप जमिनीवर अवतरले होते. तसंच साप आणि पालींचा नेमका काय संबंध आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधताना हा अवशेष महत्त्वाचा ठरू शकतो.

मुख्य प्रतिमेचं श्रेय [CC BY 4.0 (https://creativecommons.org/licenses/by/4.0)]

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *