भला थोरला भेर्लीमाड । वनी वसे ते…

देशभरातल्या जंगलांत (आणि काही शहरांतही) फिरताना ‘पाम’ वर्गातलं मोठ्ठं झाड नजरेस पडेल. ते काय आहे विचारताच लोक ‘माहीत नाही बा, नारळ-टाईपच दिसतंय’ ते ‘भेर्लीमाड, सूरमाड, टॉडी पाम, शुगर पाम, सागो पाम, फिशटेल पाम, इत्यादी’ सांगतात. लोक ‘ह्यापासून गूळ, देशी दारू बनवतात’ हेही सांगतात. पण हे सर्व खरं आहे का? ह्या माडाची नीट ओळख करून घेऊया.

ओळख

भेर्लीमाड त्याच्या मराठी/कोकणी नावाप्रमाणे ‘माड’ अर्थात ‘palm’ आहे. भारत, श्रीलंका आणि पूर्व आशिया खंडात त्याचा विस्तार आहे. वर्षावनांतल्या मोकळ्या मैदानांत आणि तुरळक झाडीत हा नैसर्गिकरित्या उगवतो. नारळसुपारीसारखीच उंच सरळ शरीरयष्टी, सरळसोट खोडाच्या टोकाशी भली मोठी पानं, झुपकेदार झुंबरासारखी फुलं आणि त्याला लगडणारी छोटी फळं असं त्याचं एकंदर स्वरूप आहे. ‘Caryotaurens’ ह्या त्याच्या लॅटिन नावातल्या ‘urens’ चा अर्थ ‘बोचरा’ असा होतो. फळांच्या अंमली गुणधर्मामुळे हे नाव ठेवलं गेलं आहे. माडाची फॅमिली अर्थात नारळाची, म्हणजेच ‘Arecaceae’ आहे.

भेर्लीमाडाच्या प्रत्येक नावाला कारण आहे. पानांचा आकार माशाच्या शेपटीसारखा असल्यामुळे त्याला ‘फिशटेल पाम’ म्हणतात. नव्या अंकुराच्या पानांना तर हे नाव आणखीनच पूरक आहे. ह्या माडाचा चीक आंबवून प्रचंड मादक दारू बनवली जाते, जी गावांत भरपूर लोकप्रियही असते, म्हणून त्याला ‘टॉडी पाम’; ह्याच्या मादकतेमुळे संस्कृतात ‘मोहकरीण’ असं नाव आहे; बऱ्यांच ठिकाणी ह्याच चिकापासून गूळही बनवतात, म्हणून ‘शुगर पाम’; झाडापासून खाण्याजोगी कांजी (starch) मिळते, म्हणून ‘सागो पाम’ म्हणतात.

राखाडी रंगाच्या सुबक बुंध्यावर जुन्या पानांची रिंगणं दिसतात. बुंध्याच्या वरच्या टोकाशी असलेल्या ह्या रिंगणातूनच फुलं उगवतात. कोवळी असताना ही फुलं साधारण पानाच्या आकाराच्या पटलांमध्ये बंद असतात आणि फुलायला तयार होतात तशी ती पानं उलगडून फुलांच्या ह्या लांब शेपटीसारख्या छड्या बाहेर येतात. असे फुलांचे तुरे लटकलेला हा माड खूप मोहक दिसतो. नारळाची फुलं लक्षपूर्वक पाहिली आहेत? भेर्लीमाडाची फुलंही तशीच असतात. ६ गडद लाल पाकळ्या आणि स्त्रीकेसर आणि पुंकेसर वेगवेगळ्या फुलांत. पुंकेसराच्या पिवळ्याधमक गुच्छामुळे ह्या फुलांच्या छड्या पिवळ्याच दिसतात. एकाच लांब छडीवर असंख्य फुलं, त्यात वरच्या आणि खालच्या बाजूला फक्त पुंकेसर असलेली फुलं तर मध्यात फक्त स्त्रीकेसर असलेली फुलं. स्त्रीकेसर असलेल्या फुलांच्या जागी परागीभवनानंतर गडद लाल-जांभळ्या रंगाची गोल टपोरी, एका फळात एकच बी असलेली फळं तयार होतात. एकानंतर एक अशी काही फुलं- फळं येऊन गेल्यावर हे झाड मरण पावतं.

उपयोग

काही प्राण्यांसाठी भेर्लीमाड उपयोगी आहे – वटवाघुळं आणि कांडेचोर (Palm civets) फळं खाऊन बीजप्रसारण करतात. मधमाश्या फुलांतल्या मधासाठी येऊन परागीकरण करतात. झाडाचा पाला केरळमध्ये पाळीव हत्तींना दिला जातो.

माणसांसाठीही हा माड खाण्यायोग्य आहे. कोवळ्या पानांची भाजी करतात (ही शेंड्यावरची पानं तोडली तर मात्र झाड वाढ खुंटून मरून जातं.) फुलांपासून आणि झाडाच्या बुंध्यातून बहुपयोगी चीक मिळतो. ह्या चिकापासून गूळ, दारू आणि साबुदाणा बनवला जातो. फुलांचा चीक उकळून मधासारखं गोड द्रव्य बनवतात आणि हेच द्रव्य आटवून घट्ट गूळ बनतो. आंबवलेला चीक ‘देशी दारू’ म्हणून लोकप्रिय आहे. चिकापासून साबुदाणा बनवतात. ही कांजी (starch) दुष्काळाचं अन्नही आहे. फळं अंमली असल्यामुळे आपल्याला खाण्याजोगी नाहीत पण बियांचा सुपारीसारखा वापर होतो.

भेर्लीमाड औषधीही आहे. गावातले वैद्य पोटातल्या जखमा, अर्धशिशी, सर्पदंश आणि सांधेदुखीवर बियांच्या पिठाची लापशी उपचार म्हणून सांगतात. दातदुखीवर मुळं गुणकारी आहेत. बुंधा आणि बिया त्वचेवरच्या पाण्याच्या फोडांवर उपायकारक आहेत, आणि सर्वात महत्त्वाचा उपयोग – नुकतीच उमललेली फुलं केसवाढीसाठी अत्यंत उपयोगी आहेत!

उपयुक्ततेबाबत भेर्लीमाड इतर ताडमाडांपेक्षा फार काही मागे नाही. ह्यापासून मिळतात एकसंध बारीक, मऊसूत दीर्घकाळ टिकणाऱ्या दोऱ्या. पानांपासून मिळणाऱ्या दोऱ्या/ काड्या कुंचे, बुट्ट्या, चटया बनवण्यासाठी वापरतात. हे तंतू जवसाच्या तेलात मुरवल्यावर एवढ्या मऊ आणि लवचिक बनतात की त्यांचा उशा भरण्यासाठीही वापर होतो. पानाच्या देठांना घासून लोकरीसारखे तंतू मिळतात. ते होड्यांना हलक्या बनवण्यासाठी, उपकरणं साफ करण्यासाठी किंवा रंगवण्यासाठीचे कुंचले बनवण्यासाठी वापरतात. मोठ्या संबंध पानांचा घरांचे छप्पर बनवण्यात वापर होतो. खोड भक्कम आणि टिकाऊ असल्यामुळे त्याचा पारंपरिक बांधकामात वापर होतो. अर्धं कापून गाभा काढून टाकलेलं खोड नळ्यांसारखं जलनिस्सारणासाठी वापरतात. हे खोड चकचकीत गुळगुळीत करून सुशोभीकरणासाठीही वापरतात.

खेडेगावांमध्ये जेवढे उपयोग ह्या माडाचे आहेत तेवढे शहरांमध्ये दिसून येत नाहीत. शहरांमध्ये बागांमधल्या गवताने आच्छादलेल्या मैदानाच्या मधोमध लावण्यासाठी भेर्लीमाडाला पसंती आहे. त्याच्या भव्य देखण्या रुपामुळे ते अनेक झाडांमध्ये असलं तरी नजरेतून सुटत नाही. अशातच माझ्या परिसरात एका ठिकाणी भले मोठे दोन भेर्लीमाड दिसले. त्या बागेत सोनमोहर-गुलमोहर सोडून आपल्याकडच्या ह्या राजबिंड्या माडाला प्राधान्य मिळालं ह्याचा आनंद झाला!

तुमच्याही आसपास हा भेर्लीमाड आहे का, हे जरूर बघा!

विविध झा़डांविषयी माहिती देणारे सई गिरधारीचे सर्व लेख नक्की वाचा

हा लेख इतरांना पाठवा

सई गिरधारी

वनस्पतीशास्त्र पदवीधर आणि अभ्यासक.

2 thoughts on “भला थोरला भेर्लीमाड । वनी वसे ते…

 • March 19, 2019 at 9:38 pm
  Permalink

  खूपच अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती!
  असंच खूप लिहीत राहा.. आणि लिंक्स पब्लिक करत राहा!
  🙂

  Reply
  • April 9, 2019 at 6:17 pm
   Permalink

   धन्यवाद! 🙂 नक्की प्रयत्न करेन.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *