दूध देणारा मासा – देवमासा

जवळपास साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झालेली पृथ्वीची उत्पत्ती, त्यानंतर काही हजार वर्षांनी पृथ्वीवर जन्माला आलेले एकपेशीय सजीव आणि त्यांची झालेली उत्क्रांती आजही आपल्याला तोंडात बोट घालायला लावते. पृथ्वीवर जन्माला आलेले सुरुवातीचे जीव हे जलचर होते. कालांतराने उत्क्रांतीच्या ओघात त्यातले बरेचसे प्राणी भूचर झाले तर काही माशांसारखे जीव आणि मृदुकाय प्राणी हे जलचरच राहिले. पण ह्या सगळ्या प्रकारात असेही काही प्राणी आहेत जे ‘अर्रर्र चुकीच्या ठिकाणी आलो, आता परत जावं लागणार’ असा विचार केल्यासारखे आधी जमिनीवर येऊन मग पुन्हा पाण्यात गेले.

अशाच पाण्यात परतलेल्या प्राण्यांमधला एक प्रकार म्हणजे ‘देवमासा’. ह्याच्या आकारामुळे ह्याची देवाशी तुलना केली गेली असावी, पण त्याच्या नावाप्रमाणे हा मासा मात्र नाही. देवमाशांची गणना ही सस्तन म्हणजेच दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये केली जाते. तसेच त्यांना श्वास घेण्याकरता हवेची आवश्यकता असते, खऱ्या माशांप्रमाणे देवमाशाला श्वास घेण्याकरता कल्ले मात्र नसतात.

नेमकी देवमाशांची उत्क्रांती झाली तरी कशी?

साधारण चार कोटी ऐंशी लाख वर्षांपूर्वी देवमाशांचे पूर्वज हे इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे चार पायाचे, कुत्र्याच्या असतात तशा कवटीच्या टोकाशी असलेल्या नाकपुड्यांचे आणि पातळ निमुळती शेपूट असलेले ६ फूट लांबीचे भूचर होते. त्यांचा मुख्य अधिवास हा नदीचा काठ होता आणि लगेच पुढच्या दहा लाख वर्षांत ते नदीत शिकार करून खायला लागले. आता मात्र त्यांचं शरीर १४ फुटांचं आणि मगरीसारखं झालेलं, पण तरीही ते जास्तीत जास्त वेळ जमिनीवर घालवायचे. चार कोटी साठ लाख वर्षांपूर्वी म्हणजेच आणखीन १० लाख वर्षांनी मात्र हे जीव त्यांचा जास्तीत जास्त वेळ पाण्यात घालवू लागले. आता त्यांच्या शरीराची लांबी १० फूट झाली आणि पोहायला सोयीचं म्हणून त्यांचे मागचे पाय मोठे आणि चपटे झाले.

WhaleEvolutionPisa
देवमाशांची झालेली उत्क्रांती

त्यानंतरच्या ९० लाख वर्षांच्या उत्क्रांती नंतर हे जीव लांब शरीर असलेले जलचर झाले. आता त्यांचे मागील पाय अगदीच छोटे, जवळजवळ निकामी झालेले आणि त्याबदल्यात त्यांची निमुळती शेपूट जाऊन तिच्या जागी दोन पाती असलेली शेपूट (अगदी आज आपण डॉल्फिन किंवा देवमाशाची बघतो तशी) विकसित झाली. जवळपास ३० लाख वर्षांनंतर हे ३० ते ३३ फुटी जलचर जीव समुद्रावर राज्य करू लागले. त्यांच्या नाकपुड्या त्यांना पूर्ण शरीर पाण्याबाहेर काढून श्वास घ्यायला लागू नये म्हणून त्यांच्या कवटीवर बऱ्याच मागे (अगदीच डोक्यावर) आल्या होत्या. ह्या प्राण्याचे मागचे पाय गायब झाले होते आणि पुढच्या पायांना चपटा आकार (ज्याला इंग्रजीत ‘flipper’ असं म्हणतात) आला होता. त्यांच्या खाण्याच्या सवयीनुसार त्यातल्या काही जातींचे दात जाऊन त्याबदल्यात केस असलेल्या पट्ट्या आल्या आणि ह्या पद्धतीने आज आपण जे डॉल्फिन आणि व्हेल किंवा देवमासे बघतो त्यांचा उगम झाला (Infraorder: Cetacea).

देवमाशांचे प्रकार

खाण्याच्या सवयीनुसार देवमाशांचे दोन प्रकार पडतात, त्यातला एक म्हणजे दात असलेले देवमासे (toothed whales) आणि दुसरा म्हणजे बलीन देवमासे (baleen whales).

त्यापैकी बलीन देवमाशांना दात नसतात. त्याबदल्यात त्यांच्या वरच्या जबड्याला लागून २०० ते ३०० पट्ट्या असतात ज्यावर केसांसारखी रचना असते, जी खाताना चाळणीसारखं काम करते. बलीन देवमाशांचं मुख्य अन्न लहान झिंगे आणि मासे हे असतं, ज्यांच्या झुंडीच्या झुंडी हे देवमासे एका फटक्यात तोंडाचा आ वासून गिळतात. पण अशा पूर्णच्या पूर्ण झुंडी गिळताना कितीतरी दशलक्ष लीटर पाणीही तोंडात जातं. हे पाणी पुन्हा बाहेर काढण्यासाठी देवमासे आपल्या जिभेच्या साहाय्याने ते ढकलून तोंडातून किंवा नाकपुड्यातून बाहेर काढतात. हा सगळा प्रकार करताना तोंडत पकडलेल्या माशांच्या आणि झिंग्यांच्या झुंडी पुन्हा बाहेर पळून जाण्याची शक्यता असते. त्या वेळी तोंडात असलेल्या केसाळ पट्ट्या बाहेर ढकललं जाणारं पाणी गाळून, केवळ खाद्य अडकवून ठेवतात.

Baleen-graywhale
बलीन देवमाशांच्या तोंडात असलेल्या केसाळ पट्ट्या

भारताच्या किनाऱ्याजवळ बलीन देवमाशांच्या प्रकारात ब्रुडीज व्हेल, हम्पबॅक व्हेल आणि ब्लु व्हेल हे देवमासे सामान्यतः आढळून येतात. त्यापैकी ब्लु व्हेल हा सगळ्यात मोठा जलचरच नव्हे तर पृथ्वीवर राहिलेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा जीव आहे. पूर्ण वाढ झालेल्या ब्लु व्हेलची लांबी ९८ फूट इतकी असते, तर त्याच्या नवजात पिल्लाची लांबी २३ फूट इतकी असते! जवळ जवळ सगळेच देवमासे (माणसाप्रमाणे) एका वेळी एकाच पिल्लाला जन्म देतात. ब्लु व्हेलचं पिल्लू दिवसाला ३८० ते ५०० लीटर ह्या दराने पहिले सहा महिने त्याच्या आईच्या दुधावर जगतं आणि ह्याच सहा महिन्यांत त्याची लांबी जन्माच्यावेळी असलेल्या लांबीच्या दुप्पट होते!

Anim1754 - Flickr - NOAA Photo Library
आतापर्यंत पृथ्वीवर राहिलेला सगळ्यात मोठा प्राणी: ब्लु व्हेल (Blue whale)

बलीन देवमाशांमधली हम्पबॅक व्हेल ही जात पाण्याबाहेर उंचच उंच सूर मारण्यासाठी आणि त्यांच्या गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हो तुम्ही बरोबर वाचलंत, हम्पबॅक जातीचे देवमासे गातात. हम्पबॅक देवमाशांची गाणी साधारण आठ ते वीस मिनिटांची असतात, जी विविध घटकांची उदाहरणार्थ शिट्टी, कण्हणं, क्लिक्स आणि असे अनेक आवाज मिळून बनलेली असतात. हे घटक एका गाण्यात पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या अनुक्रमाने गायले जातात. ही गाणी ३२ किलोमीटर लांबूनही ऐकू येतात. सागरी जीवशास्त्रज्ञ फिलिप क्लॅपहम यांच्यामते ही गाणी म्हणजे प्राणी जगताबद्दलचं माणसाला पडलेलं सगळ्यांत जटिल कोडं आहे.

Humpback stellwagen edit
आपल्याच धुंदीत पाण्याबाहेर सूर मारणारा हम्पबॅक व्हेल (Humpback whale)

आता राहिला देवमाशांचा दुसरा प्रकार, म्हणजेच दात असलेले देवमासे. हे देवमासे आकाराने ब्लु व्हेल इतके नसले तरी त्यांच्याहून बरेच भक्कम असतात. ह्या देवमाशांचा वरचा जबडा बराच मोठा असतो पण त्यात क्वचितच दात असतात (बहुतेकदा नसतात) पण त्या बदल्यात खालच्या जबड्यातले दात बसावेत म्हणून वरच्या जबड्याच्या हिरड्यांमध्ये खाचा असतात. दात असलेल्या देवमाशांना बलीन देवमाशांपासून वेगळं करणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांच्या नाकपुड्या. दात असलेल्या देवमाशांना एकच नाकपुडी असते तर बलीन देवमाशांच्या नाकपुडीला दोन खाचा असतात.

ह्या प्रकारातली बहुतेक जणांनी चित्रात किंवा कार्टूनमध्ये पाहिलेली जात म्हणजे स्पर्म व्हेल. ह्या देवमाशाचं डोकंच त्याच्या शरीराच्या एक तृतीयांश असतं. त्याचं नाव स्पर्म व्हेल असण्याचं कारण म्हणजे त्याच्या डोक्यात असलेला वीर्यासारखा द्रव पदार्थ. बलीन जातीचे देवमासे समुद्रात ९१ ते ४५७ मीटर इतक्या खोलीपर्यंत आढळून येतात, पण हा आकडा स्पर्म व्हेलच्या तुलनेत काहीच नाहीये. स्पर्म व्हेल हे त्याहून खोल पाण्यात (२,२०० मीटर किंवा त्याहून जास्त) शिकार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. इतक्या खोल पाण्यात बुडी मारताना त्यांच्या हृदयाचे ठोके मिनिटाला ३० हून सरळ १६ वर घसरतात. इतक्या खोल पाण्यात स्थिर राहण्याकरता हा प्राणी एक वेगळीच शक्कल लढवतो. समुद्रात जितकं खोल जाऊ तितकं पाण्याचा दाब वाढतो आणि तापमान कमी होतं. स्पर्म व्हेल जसा खोल जातो तसा तो थोडं थोडं पाणी तोंडात घेतो, हे थंड पाणी त्याच्या डोक्यात असलेल्या वीर्यासारख्या द्रव्याला मेणासारखं हळू हळू घट्ट करायला सुरुवात करतं ज्याने देवमाशाच्या शरीराची घनता वाढून तो स्थिर राहतो.

Mother and baby sperm whale
मादी स्पर्म व्हेल (Sperm whale) आणि तिचं पिल्लू

स्पर्म व्हेल हे मुख्यतः मोठ्या माकुळाची (Giant squid) शिकार करतात, जे अगदीच खोल समुद्रात आढळतात. ह्या माकुळाचा आकार ३० ते ४५ मीटर लांब इतका असू शकतो. इतक्या मोठ्या प्राण्यांसोबत होणाऱ्या झटापटीत बऱ्याचदा देवमाशाला इजा होते आणि त्यातून झालेल्या जखमा त्यांच्या शरीरावर दिसून येतात.

हम्पबॅक देवमाशांसारखं स्पर्म व्हेलला गाता येत नसलं तरी ते आवाज मात्र काढतात. ह्या आवाजात प्रामुख्याने ‘क्लिक्स’ म्हणजेच खटके असतात. स्पर्म व्हेल हे क्लिक्स त्यांच्या डोक्यातून निर्माण करतात. ह्याचा वापर इतर देवमाशांशी संपर्क करण्यासाठी तर होतोच पण त्याच बरोबर हा आवाज ‘सोनार’ (SONAR: Sound Navigation Ranging) सारखंही काम करतो. स्पर्म व्हेलच्या डोक्यातून निर्माण झालेला आवाज त्याच्या वरच्या जबड्यातून परावर्तित होऊन पाण्यात सोडला जातो. जोपर्यंत त्याच्या वाटेत कुठलीही वस्तू किंवा मासा येत नाही, तोवर हा आवाज सरळ रेषेत प्रवास करत राहतो. वाटेत आलेल्या वस्तूला आदळून हा आवाज पुन्हा सरळ रेषेत देवमाशाकडे परततो, ज्याची जाणीव देवमाशाला त्याच्या खालच्या जबड्यातून होते. आवाजाला जायला आणि परत यायला लागलेल्या वेळेवरून देवमाशाला ती वस्तू त्याच्यापासून किती लांब आहे ते समजते (म्हणजे हा दादा पोहता पोहता गणितही करतो!). सोनार म्हणजेच पाण्याखालचं रडार, ज्याचा उपयोग करून स्पर्म व्हेल खोल समुद्रात अन्नाचा म्हणजेच मोठ्या राक्षसी माकुळाचा शोध घेऊन शिकार करतो.

Sperm whale and squid
आवाजाचा वापर करून स्पर्म व्हेल अशा पद्धतीने भक्ष्य शोधतात.

ह्या खोल समुद्रात पोहणाऱ्या जीवांवर त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याकरता कमीत कमी ३० सेंटीमीटर जाड एक मेदाचा थर असतो. ज्याच्याकडे आपलं लक्ष गेलं नसतं तर नवलंच. ह्या मेदाच्या साठ्याकडे माणसाने गेली कित्येक वर्ष तेलाचा एक स्रोत म्हणूनच पाहिलं, ज्यातून देवमाशांच्या शिकारीला जगभरात सुरुवात झाली. अगोदर भाल्यांनी आणि आता मोठमोठाली जाळी टाकून बरेच देश बेकायदेशीररीत्या ह्या पृथ्वीवर राहिलेल्या आतापर्यंतच्या सगळ्यात महाकाय जीवांची शिकार करत असतात. ह्याच मानवी हव्यासापायी हे देवमासे आज धोकाग्रस्त स्थितीत पोहोचले आहेत.

हा लेख इतरांना पाठवा

गौरव पाटील

सागरी जीव अभ्यासक, छायाचित्रकार आणि चित्रकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *