फाईट क्लब – एक घातक प्रयोग (अभिप्राय)

निव्वळ खोड म्हणून आपल्या विचारांना अगम्य स्वरूपात मांडावं; किंवा मुळात स्वतःच्या विचारांच्या, कल्पनांच्या पुरेशा खोलात न शिरताच वरवरच्या गुंतागुंतीला एखाद्या माध्यमातून जसंच्या तसं व्यक्त करावं, आणि मग जगाला सांगावं की पाहा हा आहे माझा कलाविष्कार! मग जगाला प्रश्न पडतो की बाबा नेमकं आहे काय हे? काही आगाऊ लोक काहीतरी म्हणायचं म्हणून त्यांना सुचेल तो अर्थ लावतात. काहीजण चांगला, काहीजण वाईट. आविष्कार जेवढा जास्त अगम्य, तेवढी जास्त त्यावर चर्चा. आविष्काराला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो त्यानुसार तो कोणत्या वैचारिक अभिनिवेशाशी अनुकूल आहे हे ठरवण्यासाठी बुद्धिभेदी मंडळीत चढाओढ सुरु होते.

पण अर्थ कितीही टोकाचे लागले तरी मूळ आविष्काराला नावं ठेवायची हिंमत कोणाला होत नाही. जे आपल्याला धड कळत नाही, त्याची चिकित्सा कशी करावी? सगळे भितात, गप्प बसतात. कोणी विचारलं तर जोराजोरात माना हलवून “सुंदर! अप्रतिम!” असं म्हणतात. त्यांना विचारा, की तुम्हाला काय एवढं सुंदर वाटलं? आणि मग त्या आविष्कारातला जो एकुलता एक घटक त्यांना कोणीतरी सांगितला म्हणून कळलाय असं वाटत असतं त्याकडे ते बोट दाखवून म्हणतात, “अख्खंच चांगलंय, पण हा भाग मला विशेष आवडला.”

कलाकार मजा घेत असतो. जे अर्थ त्याच्या स्वतःच्या डोक्यातही नसतात, ते अर्थ लोक लावत असतात. “कला प्रत्येकाला वेगळ्या कारणासाठी भावते. मी फक्त ती लोकांपुढे सादर करायचं काम करतो. म्हणूनच, कलेतून काय अर्थ घ्यायचा हे ज्याने त्याने ठरवायचं. कोणी चांगला बोध घेतं, कोणी वाईट.” किती तो नम्रपणा, नाही का? लोक टाळ्या पिटत राहतात. आविष्कार अजरामर होत राहतो.

समजा, एखाद्या माणसाने शेकडो लोकांच्या हातात दगड नेऊन दिले, आणि मग आपल्याला म्हणाला, “त्या दगडांचं छानसं एखादं शिल्प घडवायचं, की त्या दगडांनी एकमेकांना ठेचून मारायचं, हे आता लोकांच्या हातात आहे. मी फक्त दगड वाटायचं काम केलं.” काय म्हणाल अशा माणसाला?

कलेचे मला माहिती असलेले दोन उपयोग – सौंदर्याची अनुभूती देणं, आणि/किंवा आपण स्वतः व्यक्त होणं. सौंदर्याचं आकलन कसं करावं हे लोकांवर सोडून देणं योग्य; पण व्यक्त व्हायचं माध्यम म्हणून कलेचा वापर करायचा, तर स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवं. ते जमलं नाही तर तो आविष्कार अपयशी ठरतो.

मी अलिकडे फाईट क्लब नावाचा चित्रपट पाहिला. तो पाहून आपल्याला वाटणारी प्रत्येक भीती ही आपली सुप्त इच्छाच असते की काय, अशी कल्पना मनाला चाटून गेली. कारण शेवटी माणूस हा अनुभवासाठी भुकेलेला असतो, आणि अनुभवाच्या शक्यता अमर्याद असतात.

एका माणसात दोन माणसं दडलेली असतात. एक शहाणा, एक मूर्ख. काही विचार, काही कल्पना आणि काही ‘आविष्कार’ एवढे बलाढ्य असतात की ते आपलं संतुलन बिघडवून आपल्यातल्या मूर्खाला पूर्ण बाहेर येण्यास वाव देतात.

माणसाला ‘जिवंतपणा’ची चटकन जाणीव करून देणाऱ्या भावना सहसा नकारात्मक असतात. एखादा आविष्कार अनुभवून ‘जिवंत’ झाल्यासारखं वाटत असेल तर लगेच त्या आविष्काराचा उदो-उदो करायची घाई करू नका.

जरा विचार करा, स्वतःची स्वप्नं सोडून दिलेल्या अनोळखी माणसाला बंदुकीच्या धाकावर त्याची तीच स्वप्नं पूर्ण करायला लावणारा परोपकारी इसम – समाजात अनागोंदी माजवणारं सैन्य का उभारेल? स्वत्वाचा शोध घेताना पार रसातळाला जायची तयारी असलेला माणूस मुद्दामहून आंधळे अनुयायी का जमा करेल?

फाईट क्लब हा चित्रपट एक घातक प्रयोग आहे. दोन परस्परविरोधी थर आपापसांत बेमालूमपणे मिसळून तो तयार केलाय. पाहायचा तर जपून पाहावा.

चित्रपटाचा दुवा

चित्रपटातील दृश्यांच्या सर्व प्रतिमांचा वापर अभिप्राय देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला आहे.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *