पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये घुसणाऱ्या पहिल्या स्त्रिया

इसवी सनपूर्व ४९० साली पर्शियाचा राजा पहिला डारियस याने त्याच्या सरदारांकरवी ग्रीकांवर आक्रमण केलं. ग्रीस देशातल्या ‘मॅरेथॉन’ या छोट्या शहरात ॲथेन्सच्या सैन्याने पर्शियन सैन्याचा धुव्वा उडवला. पर्शियन साम्राज्याविरोधातला ग्रीकांचा हा पहिला विजय होता. या विजयाची माहिती देण्यासाठी फायडिपिडीस हा मॅरेथॉन शहरापासून ॲथेन्स पर्यंत सुमारे २५ मैलाचं अंतर धावून गेला आणि माहिती दिल्या दिल्या कोसळून मेला, अशी कथा आहे. काहींच्या मते प्रत्यक्षात फायडिपिडीस ॲथेन्सपासून स्पार्टापर्यंत पर्शियाविरोधात मदत मागण्यासाठी १५० मैल धावला; आणि धार्मिक सणांत गुंतलेले असल्याने स्पार्टन्सनी मदत करायला उशीर होईल असं म्हटल्यावर तो संदेश द्यायला लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा १५० मैल ॲथेन्सपर्यंत धावला. असा एकूण ३०० मैलांचा प्रवास फायडिपिडीसने धावत केला. मॅरेथॉनचं युद्ध जिंकण्यासाठी हा संदेश मिळणं खूप महत्त्वाचं ठरलं. मॅरेथॉनवरून ॲथेन्सपर्यंत विजयाची वार्ता देण्यासाठी येणारा माणूस वेगळाच होता असा एक प्रवाद आहे. खरं जे असेल ते, पण धावत धावत लांबचा पल्ला गाठण्याच्या क्रीडाप्रकाराला ‘मॅरेथॉन’ हे नाव पडलं आणि फायडिपिडीस हा यामध्ये भाग घेणाऱ्यांसाठी स्फूर्तीस्थान ठरला.

१८९६ सालच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये पहिल्यांदा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. हा क्रीडाप्रकार केवळ पुरुषांसाठी राखीव होता. स्टमाटा रेविथी ही बाई ॲथेन्सला नोकरी शोधण्याच्या निमित्ताने ९ किलोमीटरचं अंतर चालत येत होती. आदल्या वर्षीच तिचा सात वर्षांचा मुलगा वारला होता आणि तिला दुसरं लहान बाळसुद्धा होतं. ॲथेन्सच्या दिशेने येताना वाटेत तिला एक धावपटू भेटला. त्याने तिला सुचवलं की तिनं या ऑलिम्पिक मॅरेथॉनमध्ये धावायला हवं. तिला भरपूर प्रसिद्धी मिळेल आणि पुढे कामही मिळेल. त्याने तिला थोडे पैसेही देऊ केले. स्टमाटा रेविथी स्त्री असल्याने तिला मॅरेथॉनमध्ये पुरुषांबरोबर धावायला मज्जाव करण्यात आला. म्हणून ती अधिकृत मॅरेथॉन कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी धावली. ४० किलोमीटरची अख्खी मॅरेथॉन तिने सुमारे साडे पाच तासांत धावून पूर्ण केली. तिला धावताना पाहणारे आणि तिची धावण्याची वेळ पडताळून पाहणारे साक्षीदारही तिने गोळा केले, ज्यांनी लेखी साक्ष द्यायची तयारी दर्शवली. मात्र शर्यतीच्या अखेरीस तिला इतर धावपटूंप्रमाणे मैदानात उतरून सन्मान स्वीकारू दिला गेला नाही. तिचं पुढे काय झालं, हे कोणालाही कळलं नाही. स्टमाटा रेविथीला लहानपणापासूनच धावायची आवड होती, पण म्हणून ती काही सराईत धावपटू झालेली नव्हती. गरिबीत वाढणारी स्टमाटा तिच्या वयाच्या मानाने खप्पडच दिसायची. असं असूनही तिने केवळ जिद्दीच्या जोरावर ही शर्यत धावून पूर्ण केली, ही विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे.

बॉस्टन मॅरेथॉन

कॅथरीन धावत असताना तिला जॉन सेंपलने बाहेर काढायचा प्रयत्न केला. प्रतिमा स्रोत : मेकर्स.कॉम

१९६७ साली कॅथरीन स्विट्झर या स्त्रीने तोवर फक्त पुरुषांसाठी असलेल्या बॉस्टन मॅरेथॉनमध्ये स्वत:चं नाव नोंदवलं. नाव नोंदवताना तिने फक्त आद्याक्षरं नोंदवली, ज्यामुळे आयोजकांना ती पुरुष नाही हे समजू शकलं नाही. प्रत्यक्ष शर्यतीत उतरून ती धावायला लागली आणि लोकांच्या नजरेत यायला लागली, तेव्हा तिच्या बरोबर धावणाऱ्या लोकांनी उत्साहाने तिला उत्तेजन द्यायला सुरुवात केली. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये बाई धावते हे पाहिल्यावर वार्ताहरांनी टपाटप फोटो टिपायला सुरुवात केली. ‘तुला नेमकं काय सिद्ध करायचं आहे?’ अशा तऱ्हेचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. अचानक शर्यतीच्या आयोजकांमधला अधिकारी असणारा जॉन सेंपल नावाचा माणूस धावत आला आणि कॅथरीनला ‘माझ्या शर्यतीतून चालती हो’ म्हणत बाहेर खेचू लागला. त्याने तिचा बिब (ज्यावर खेळाडूचा क्रमांक छापलेला असतो तो कागद) खेचायचाही प्रयत्न केला. त्यावेळी कॅथरीनसोबत तिचा बॉयफ्रेंड थॉमस मिलरसुद्धा मॅरेथॉनमध्ये धावत होता. त्याने मध्ये पडून जॉन सेंपलला धक्का मारला. या प्रसंगाने कॅथरीनला आणखी स्फुरण चढलं आणि ती पुढे धावतच राहिली. ४ तास आणि २० मिनिटांमध्ये कॅथरीनने मॅरेथॉन धावून पूर्ण केली. पुढे तिला बाहेर काढू पाहणारा जॉन सेंपल आणि कॅथरीन यांच्यामध्ये सलोखाही निर्माण झाला.

रॉबर्टा गिब. प्रतिमा स्रोत : स्टुडिओ निकोलसन

याच शर्यतीमध्ये नाव न नोंदवताच गपचूप घुसून मॅरेथॉनमध्ये धावण्याचा पराक्रम आणखी एका बाईने केला. तिचं नाव, रॉबर्टा गिब! आपण स्त्री आहोत हे कोणाला कळू नये म्हणून रॉबर्टाने हूड घालून स्वत:चा चेहरा झाकला होता. मॅरेथॉन सुरु झाल्यानंतर अर्ध्याअधिक लोकांनी धावायला सुरुवात करेपर्यंत ती थांबली आणि मग स्वत: धावायला लागली. पण तिच्या सभोवताली धावणाऱ्या पुरुषांना ती स्त्री आहे हे चटकन लक्षात आलं. तिला कोणीच अडवलं नाही, उलट शाबासकी देत उत्तेजन देऊ लागले. ते पाहून तिने आपलं हूड काढून टाकलं आणि बिनधास्त धावत सुटली. प्रेक्षकांमध्येही एक बाई शर्यतीत धावतेय ही बातमी वणव्यागत फोफावली आणि शर्यतीच्या प्रत्येक टप्प्यावर टाळ्यांच्या कडकडाटाने आणि उत्स्फूर्त आरोळ्यांनी तिचं स्वागत होत गेलं.

रॉबर्टाने दोन वर्षं या शर्यतीसाठी प्रशिक्षण घेतलं होतं. या शर्यतीत अधिकृतपणे भाग घेता यावा म्हणून तिने अर्जही केला होता, पण बायकांना हे जमण्यासारखं नाही असं उत्तर तिला देण्यात आलं होतं. रॉबर्टाने तिला हे सहज जमण्यासारखं आहे हे सिद्ध करून तर दाखवलंच, पण शर्यतीत भाग घेतलेल्या ४१५ धावपटूंपैकी २९० जणांना मागे टाकत तिने ही शर्यत पूर्ण केली. वर उल्लेख केलेल्या कॅथरीनहून एक तास अगोदर रॉबर्टाने मॅरेथॉन पार केली.

यानंतर मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढत गेलं. १९७२ सालापासून स्त्रियांना अधिकृतपणे बॉस्टन मॅरेथॉनमध्ये धावण्याची अनुमती देण्यात आली. कॅथरीन स्विट्झर आणि रॉबर्टा गिब यांनी केवळ आपल्या जिद्दीच्या आणि क्षमतेच्या बळावर स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. आज इतर अनेक धावपटूंसाठी त्या महत्त्वाच्या प्रेरणास्थान आहेत.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *