इंग्लिश प्रीमिअर लीग – फूटबॉलच्या वारीची ओळख

प्रीमिअर लीग म्हंटलं की भारतीयांना पहिलं आठवतं ते म्हणजे IPL. पण या IPL ची मूळ कल्पना जिकडून उचलली गेली ते म्हणजे EPL – इंग्लिश प्रीमिअर लीग. १८८८ पासून खेळल्या जाणाऱ्या या क्रीडाप्रकाराला क्लब फुटबॉल असं म्हटलं जातं.

दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या या क्रीडामहोत्सवात इंग्लडमधले २० क्लब्स भाग घेतात. प्रत्येक संघ दुसऱ्या संघांबरोबर प्रत्येकी २ वेळा भिडतो. प्रत्येक संघाचे एकूण ३८ सामने होतात आणि सर्वांत शेवटी जो क्लब चांगला खेळून सर्वांधिक गुण पटकावतो त्याला विजेता घोषित केलं जातं. ऑगस्ट ते मे असा लांबलचक कालखंड असतो ज्यात सामने खेळवले जातात. याला एक सीजन म्हणतात.

१८८८ मध्ये विलियम मॅकग्रेगोर या ऍस्टन विला क्लबच्या मॅनेजरने (व्यवस्थापकाने) या खेळांची सुरुवात केली. तेव्हा फक्त १२ क्लब्स होते. १८८८ ते १९९२ या काळात फारसा काही बदल झाला नाही. या दरम्यान सर्वात यशस्वी ठरलेला क्लब म्हणजे लिव्हरपूल ज्याने एकूण १८ वेळा या चषकावर नाव कोरलं. १९९२ नंतर मात्र खेळाचा चेहरा मोहरा बदलण्यात आला. १८८८ मध्ये या खेळांना फुटबॉल लीग फर्स्ट डिव्हिजन म्हणायचे. १९९२ साली त्याचं नामकरण प्रीमिअर लीग असं करण्यात आलं. इंग्लंडच्या बाहेर या खेळांना इंग्लिश प्रीमिअर लीग म्हटलं जाऊ लागलं. या बदललेल्या स्वरूपात सर्वाधिक यशस्वी ठरलेला क्लब म्हणजे मॅन्चेस्टर युनायटेड. १९९२ ते २०१९ या काळात मॅन्चेस्टर युनायटेडने तब्बल १३ वेळा हा चषक पटकावला आहे.

मुळातच फूटबॉल हा खेळ युरोपात प्रसिद्ध आहे. त्यात वर्ल्डकप नसलेल्या वर्षांत फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जात नाहीत. त्यामुळे लीग फूटबॉल हा एकदम प्रसिद्ध क्रीडामहोत्सव असतो. इंग्लंडात तर फारच जास्त. हिरवीगार मैदानं, रंगीबेरंगी कपडे घातलेले फूटबॉलपटू, त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे चाहते असं एकूण तिकडचं वातावरण असतं. जगातील कानाकोपऱ्यातून निवडून आणलेले सगळे अफलातून खेळाडू आपलं कौशल्य दाखवत असतात. जरी तुम्ही प्रत्यक्षात तिकडे नसलात तरीही घरातल्या टीव्हीवर ही थरारक दृश्यं पाहून तुम्ही थक्क होता. दोन क्लबमधल्या चाहत्यांची एकमेकांशी इतकी जास्त ठसन असते की स्टेडियम मध्ये त्यांना बसण्यासाठी पूर्ण वेगळ्या दिशेला जागा करून द्याव्या लागतात. दोन मोठ्या हाडवैरी क्लबांमधला सामना असेल तर ज्या त्वेषाने खेळाडू खेळतात त्याहून जास्त उत्साहाने त्यांचे चाहते तो खेळ पाहात असतात. आपल्या क्लबला प्रोत्साहन देण्यात आपण कुठेही कमी पडू नये याची काळजी प्रेक्षक पुरेपूर घेत असतात.

आजकाल भारतातही हे वेड पसरत चाललेलं आहे. शहरांमध्ये फूटबॉलप्रेम वाढू लागलंय तसं EPL चे चाहतेही वाढत चाललेत. इंग्लंडमधल्या कोणत्याही भागाचा दूरदूरचा संबंध नसला तरीही आपआपला क्लब निवडून आजकालचे तरुण त्यावर तासंतास चर्चा करताना दिसतात. पण कुतूहलाची गोष्ट म्हणजे या EPL मध्ये भारतीय खेळाडू जवळजवळ नाहीतच तरीही आपल्याकडे त्याची एवढी चर्चा होते. आपल्याकडे याच धर्तीवर ISL – इंडियन सुपर लीग अशी क्लबची स्पर्धा सुरु करण्यात आलेली आहे. हा एक उत्तम प्रकल्प आहे ज्याची भारतीय फूटबॉलला लवकरच उत्तम फळं मिळणं आता अपेक्षित आहे. या सगळ्यातून उद्या जर काही कौशल्यपूर्ण फुटबॉलपटू उदयाला आले, तर भारतीय फूटबॉलसाठी नक्कीच ते चांगले दिवस आणतील.

या खेळांचं अजून एक आकर्षण म्हणजे ट्रान्सफर सीजन. ट्रान्सफर सीजनच्या काळात एखादा क्लब आणि एखादा खेळाडू यांच्यात करार होऊन तो खेळाडू एक क्लबकडून दुसऱ्या क्लबला विकला जाऊ शकतो. काहीवेळा खेळाडूला उसनंही देता येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक सीजनचा सर्वांत महागडा खेळाडू कोणता क्लब विकत घेतो याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. तसंच जे उत्कृष्ट खेळाडू असतात ते आपल्या क्लब मध्ये राहतील की सोडून जातील याच्यावरही वादविवाद रंगलेले असतात. मग काहीजण त्या सोडून गेलेल्या खेळाडूच्या समर्थनार्थ त्याच्या नवीन क्लबचं समर्थन करू लागतात तर काहीजण क्लबशी एकनिष्ठ राहून सोडून गेलेल्या खेळाडूला शिव्या देतात. या आणि अशा बऱ्याच घडामोडींनी अख्खा सीजन रंगात आलेला असतो. कधीकधी शेवटच्या सामन्यांपर्यंत विजेतेपदासाठी चुरस रंगलेली असते तर कधीकधी फार अगोदरच कळलेलं असतं की विजेता कोण असणार आहे! शेवटी एक विजेता ठरतो तर पदतालिकेतील निकृष्ट असलेल्या शेवटच्या क्लबांना पुढच्या सीजनसाठी बाहेर काढण्यात येतं आणि त्याजागी नवीन क्लब येतात.

शरीराच्या स्वास्थ्यासाठी आणि खेळाची गती पाहता फूटबॉल हा उत्तम खेळ आहे. क्रिकेटवेड्या भारताला आता फूटबॉलकडेही वळून बघण्याची वेळ आलेली आहे. भारतातूनही रोनाल्डो, मेस्सी अन एम्बाप्पेसारखे खेळाडू घडवावे लागतील. त्यासाठी शाळेतल्या लहानग्यांत हे वेड पेरणं आणि त्यांची आवड त्यांना जोपासू देणं अत्यंत आवश्यक आहे!

हा लेख इतरांना पाठवा

ओमकार बर्डे

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *