इस्टरच्या अंड्यात कोणती कथा दडली आहे?

रविवारी पाव आणायला जवळच्याच बेकरीत गेलो आणि सजवलेल्या चॉकलेटच्या अंड्यांनी लक्ष वेधून घेतलं. सुबक, छोटुकली, छान सजवलेली, त्यावर चमकणारे सोनेरी, चंदेरी चमकीचे कागद वा पातळ फॉईल लावलेली, काही तर छान छान स्वादांची – कॅरेमल, बटरस्कॉच, मिंट, रोझ, स्ट्रॉबेरी. अगदी तल्लीन झालो मी. बेकरीवाला माझ्याकडे बघून हसत होता…

“इट्स इस्टर टुडे. दे आर इस्टर एग्ज”.
हा काय मला अडाणी वगैरे समजत होता की काय! कळतं की रे मला ते…
“यू वॉन्ट टू ट्राय एनी, सर”?

एकूण अवतारातच होतो म्हणा मी. पाव विकत घेण्यासाठी काय नटून जायचं असतं का? चला, किमानपक्षी मला ‘सर’ तरी म्हणाला. घरी कोण खाणार इतकं चॉकलेट. मी त्याला नकार देऊन जे घ्यायचं ते घेऊन परतलो. परतीच्या वाटेवर ही अंड्याची भानगड इस्टरच्या सणाबरोबर का जोडली गेली असेल हा प्रश्न सतवायला लागला.

एकूणच अंडी वा त्याची कवचं रंगवणं ही काय कुणा एका धर्माची मक्तेदारी नाही. आफ्रिकेमध्ये तर चक्क साठ हजार वर्षं जुनी रंगवलेली शहामृगांची अंडी सापडलेली आहेत. त्यावेळी तरी कुठलेही धर्म अस्तित्वात नव्हते. ख्रि.पू. ३१०० च्या सुमारास इजिप्तच्या प्रागैतिहासिक युगात म्हणजेच राजवंशपूर्व काळामध्ये, प्राचीन क्रेट म्हणजे आत्ताच्या ग्रीसमध्ये, मेसोपोटॅमिया म्हणजे हल्लीच्या इराकच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये अंडं म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्माचं प्रतीक समजलं जायचं. ते राजपदाचं लक्षण म्हणूनही ओळखलं जायचं. छानपैकी रंगवलेलं आणि कलाकुसरीने मढवलेलं शहामृगी अंडं त्याचंच प्रतिनिधित्व करतं. पाचेक हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन आणि सुमेरीयन थडग्यांमध्ये अशी मढवलेली अंडी वा त्याची कवचं संशोधकांना मिळालेली आहेत.

तर ही अंड्यांची गोष्ट ख्रिश्चन लोकांपर्यंत कशी गेली? इस्टर सारख्या महत्वाच्या सणाशी कशी काय जोडली गेली? याचं उत्तर कदाचित एकमेकांवरची सांस्कृतिक आक्रमणं, व्यापारी उलाढाली, राजकीय लागेबांधे, एकमेकांमध्ये होणाऱ्या राजकीय वा धार्मिक देवाणघेवाणी याच्यात लपलेलं असावं. अगदी सुरुवातीच्या मेसोपोटॅमियन ख्रिश्चनांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात ही इस्टरच्या अंड्यांची परंपरा सुरु केली. ग्रीक ख्रिश्चन चर्चकडे इस्टरमध्ये अंड्यांचा असा अभिनव वापर करण्याची कल्पना पर्शियामार्गे आली होती. छोटी मुलं इस्टरच्या चाळीस दिवसांत अंडी गोळा करायची. क्रूसावर गेलेल्या येशूच्या रक्ताचं प्रतीक म्हणून ती अंडी लाल रंगाने रंगवली जायची आणि बाजारात विक्रीसाठी ठेवली जायची. काही अंडी मुलांच्या आवडत्या पिवळ्या व हिरव्या रंगात रंगवली जायची आणि एकमेकांना भेट म्हणून दिली जायची. ही पद्धत रूढिवादी ख्रिश्चनांनी पुढे रशियापर्यंत नेली. रोमन कॅथलिक वा प्रोटेस्टंट्सनी ही पद्धत मेसोपोटॅमियाहून युरोपात नेली आणि ती लवकरच लोकप्रिय झाली.

या लोकप्रियतेमागचं कारण म्हणजे अंडं हे ख्रिस्ताच्या पुनर्जन्माचं आणि त्याच बरोबर त्याच्या त्या दफन केलेल्या थडग्याचं प्रतीक म्हणून स्वीकारलं गेलं होतं. ज्या थडग्यातून येशू ख्रिस्ताने पुनर्जन्म घेतला होता त्या रिकाम्या जागेची निशाणी म्हणजे उघडलेल्या अंड्याचं मोकळं कवच असा समज जनमानसात रूढ झाला होता. तसं बघायला गेलं तर अंडं पहिल्यांदा जन्म घेतं आणि मग त्यातून जीव जन्म घेतो. म्हणजेच तो त्या जीवाचा पुनर्जन्म असतो अशी काहीतरी संकल्पना लोकांना खूप आवडली होती. मध्ययुगापर्यंत अंडी भेट द्यायची कल्पना इतकी मोठ्या प्रमाणात पसरली होती की काही ठिकाणी लोक उत्सवाच्या दिवसाला ‘इस्टर संडे’ म्हणायचं सोडून ‘एग संडे’ म्हणायला लागले होते.

सन १६१० मध्ये ‘ख्रिश्चन चर्च’ने येशूच्या पुनर्जन्माचं चिन्ह म्हणून या परंपरेला अधिकृत मान्यता दिली. त्या साली प्रकाशित झालेल्या ‘Roman Ritual’ च्या पहिल्या आवृत्तीमध्ये इस्टरच्या अंड्याचा समावेश झाला. असं असलं तरीही त्यात उल्लेखलेले सगळे मूळ विधी जुनेच होते. त्या विधींच्या वर्णनामध्ये, त्या ओळींमध्ये, इस्टरचे खास आशीर्वाद नमूद केलेले होते. पण अंड्यासंबंधीच्या ओळी त्याच्या सजावटीबद्दल न बोलता त्याचा अन्न म्हणून वापर कसा होतो यावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. कित्येक शतकांनतरही टिकून राहात, पुरातनतेमध्ये न हरवता या पद्धतीचाही अशा तऱ्हेने जणू एक पुनर्जन्मच झालेला दिसून येतो.

आजच्या जगात या कोंबडीच्या अंड्याची जागा त्याच आकाराच्या चॉकलेटने घेतलेली आहे. बरेचदा पोकळ असलेलं हे चॉकलेटी अंडं उघडलं की आतमध्ये बराच गोड खाऊ ठासून भरलेला दिसतो. चॉकलेटच्या कवचामधल्या जेलीबिन्स, जेम्स, जेली स्विट्स, बडिशेपेच्या गोळ्या वगैरे मस्त खाऊ छोटी मुलं मिटक्या मारत, तोंडं बरबटवत फस्त करतात. अनेक चर्चेसही इस्टरची प्रार्थना संपल्यावर मुलांसाठी अंडी शोधायचा खेळ ठेवतात. इस्टरचा ससा ही अंडी जिकडे तिकडे टाकत जातो असं गंमत म्हणून मुलांना सांगितलेलं असतं. मुलांच्या हातात छोट्या गवत भरलेल्या टोपल्या देऊन त्यांना चर्चच्या अवतीभवती पिटाळलं की बायाबापडे एकमेकांना इस्टरच्या शुभेच्छा द्यायला मोकळे होतात.

या वर उल्लेखलेल्या सर्व गोष्टींना छेद देणारी, अंड्यांचा आणि इस्टरचा संबंध लावणारी अजून एक शक्यता अस्तित्वात आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठामधले मध्ययुगीन कालाचे अभ्यासक, संशोधक व प्राध्यापक हेन्री केली यांनी ही प्रथा लेन्टेन पद्धतीतून आली असण्याची शक्यता वर्तवली आहे. लेन्ट हा इस्टर संडेच्या आधीचा काळ – जवळजवळ सर्व ख्रिस्ती धर्माच्या शाखा-उपशाखांमध्ये उपवासाचे दिवस म्हणून पाळला जायचा व आजही कटाक्षाने पाळला जातो. स्वतःतल्या दुर्गुणांना काबूत आणण्याचा हा काळ. बहुतांशी धर्मपालक या चाळीस दिवसांत शाकाहार घ्यायचे. सर्व दुग्धजन्य पदार्थ, मांस व अंडी आणि इतर तत्सम तमोगुण जागृत करणारं खाणं निषिद्ध समजलं जायचं. आता आपण काहीही परंपरा पाळली तरी निसर्गचक्र काही थांबत नसतं. घरच्या कोंबड्या अंडी घालतच असायच्या आणि ती अंडी सगळ्या अंगणभर पसरलेली असायची.

मग घरातली मुलं सगळीकडे हिंडून ती गोळा करायची. आता इस्टर येईपर्यंत ती तशीच कशी ठेवता येणार!? वाया नाही का जाणार अन्न! मग ती पक्की उकडून ठेवली जायची. गार झाली की ती फुटू नयेत म्हणून त्यावर रंगलेपन करण्यात यायचं. चाळीस दिवसांत अशी बरीच अंडी साठवली जायची. इस्टर संडेची प्रार्थना संपली की चर्चचे फादर त्या अंड्यांनाही ‘ब्लेस्’ करायचे. म्हणजे ती खाल्ल्याने कुणाला काही त्रास होऊ नये अशी प्रभूची प्रार्थना करायचे. मग लोक ती अंडी घेऊन दफनभूमीकडे जायचे. आपल्या दफन झालेल्या नातेवाईकाच्या कबरीसमोर उभे राहून “येशूचा पुनर्जन्म झाला आहे” अशा घोषणा देऊन घरी जायचे आणि इस्टरच्या मेजवानीचा समाचार घ्यायचे. त्या मेजवानीत ही उकडून ठेवलेली रंगीत कवचाची अंडी हा मुख्य घटक असायचा. शिल्लक राहिलेली अंडी गरीबांना भेट म्हणून दिली जायची. म्हणजेच अशा घटना वर्षातल्या ठरावीक दिवसांत वर्षानुवर्षं घडत गेल्या की त्यांचं परंपरेत रुपांतरण होतं असं म्हणायला या जागी पुष्कळ वाव आहे.

Eástre by Jacques Reich

अनेक विद्वान व संशोधकांचं असंही मत आहे की इस्टरचं मूळ एका जुन्या मूर्तीपूजक लोकांच्या उत्सवात दडलेलं आहे. हा उत्सव नेमका कुठला हे ज्ञात नसलं तरी त्या उत्सवदेवतेचं नाव होतं इस्त्रे (Ēostre) आणि ती देवता भीषण थंडीनंतर निसर्गाचा पुनर्जन्म घडवत असते अशी त्या मूर्तीपूजकांची श्रद्धा होती. नेब्रास्का विद्यापीठामधल्या इतिहासाच्या ख्यातनाम प्राध्यापिका कॅरोल लेव्हिन यांनी नमूद केलंय – “सुरुवातीच्या ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी याच उत्सव दिवसाच्या आसपास एखादा ख्रिश्चन उत्सव साजरा केल्याने धर्मांतरणाच्या घटना अतिशय सहज पार पाडल्या जाऊ शकतील असा विचार केला होता. त्यांची प्रतीकं जशीच्या तशी उचलली गेली तर लोकांच्या मनात ख्रिश्चन धर्माप्रती ओढ निर्माण होईल, असंही त्या धर्मप्रसारकांना वाटत होतं. इस्त्रे उत्सवाच्या मेजवानीमध्ये अंड्यांचा मुबलक वापर केला जायचा आणि काही अंडी जमिनीचा पोत अधिक सुधारावा म्हणून सुपीक जमिनीत पुरली जायची”.

ही अंडी रंगवण्याचा हल्लीच्या ब्रिटीश काळातला लिखित पुरावा इ.स. १२९० मधला आहे. इस्टरच्या आसपास पहिल्या एडवर्ड राजाच्या पाकगृहातून ४५० अंड्यांची मागणी नोंदवली गेली होती. ही अंडी सोन्याच्या वर्खाने आकर्षकरीत्या रंगवून इस्टरच्या दिवशी भेटायला आलेल्या शाही पाहुण्यांना भेट म्हणून दिली गेली होती. दोन शतकांनंतर व्हॅटिकनने आठव्या हेन्री राजाला चांदीच्या पेटीमधून एक अंडं भेट म्हणून पाठवलं होतं. त्याचा उल्लेख ‘हंगामी भेटवस्तू’ असा केलेला आढळतो. तेराव्या शतकातले ब्रिटीश गावकरी आपल्या जमीनदारांना इस्टरची अंडी भेट द्यायचे. लेव्हिन बाई सांगतात की सोळा आणि सतराव्या शतकामध्ये चर्चला भेट दिली जाणारी अंडी लाल रंगाने रंगवलेली असायची. मात्र या काळी लाल रंग हा आनंदाचं प्रतीक असा समजला जायचा.

अगदी अलीकडच्या एकोणिसाव्या शतकात ही अंडी मुलांना द्यायची इस्टरची भेटवस्तू म्हणून मान्यता पावली. व्हिक्टोरियन काळामध्ये ब्रिटीश समाजात अनेक चांगले बदल झाले आणि ‘कुटुंब पहिलं’ या विचाराचा चांगलाच पाठपुरावा केला जाऊ लागला. इस्टरची अंडी चर्चला वा गरीबांना देण्याऐवजी प्रथमतः घरातल्या लहान मुलांना दिली जाऊ लागली. व्हिक्टोरियन मध्यम वर्ग जुन्या परंपरांबद्दल कुतूहल बाळगून असला तरी नव्या व जुन्याचा योग्य मिलाफ कसा घडवता येईल या विचारांनी प्रेरित असायचा. सशाने लपवलेली इस्टरची अंडी शोधून काढायचा खेळही याच सुमारास अस्तित्वात आला आणि सन १८७६ मध्ये अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधल्या हिरवळीवरचा सुप्रसिद्ध “White House Easter Egg Roll” हा खेळ पहिल्यांदा खेळला गेला.

इस्टर हा सण म्हणजे एका अर्थाने तिकडच्या वसंत ऋतूच्या आगमनाचं कौतुक करणारा, स्वागत करणारा उत्सव आहे. गोठवून टाकणारी थंडी संपलेली असते. काळे करडे बर्फाळलेले दिवस मागे पडलेले असतात. सूर्यकिरणांच्या उबदार सहवासाने सृष्टी विविध रंगात न्हाऊ पाहात असते. गवताची इवलुशी कोवळी हिरवीगार पाती डोकी वर काढत असतात. फुलझाडं रंगीबेरंगी फुलांचं मनमोहक प्रदर्शन मांडून असतात. मुंग्यांसारखे कीटक वारूळातून बाहेर पडून पुढची बेगमी करू पाहात असतात. बिळांमध्ये झोपून राहिलेले ससे जागे होऊन बाहेर हिरवळीवर यथेच्छ बागडत असतात. छोट्या झुडुपांवर फुललेल्या रानफुलांवर मधमाश्या आणि फुलपाखरं नाचत असतात. पक्षी फिरून एकवार निळ्या अवकाशात भराऱ्या घेऊ लागलेले असतात. येणाऱ्या काळात कित्येक प्राणी व पक्ष्यांची नवी पिढी या जगात येणार असते. समस्त आसमंत, सजीव व निर्जीवांसह, एक उबदार वातावरण अनुभवायच्या तयारीत असतो. सृष्टीचा हा सृजन सोहळा साजरा करण्यात मग मानवप्राण्याने तरी का मागे राहावं, नाही का?

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *