ड्रॅगन सर्व संस्कृतींमध्ये असूनही चीनमध्ये त्याला जास्त भाव का आहे?

ड्रॅगन हे दंतकथांमधील एक लोकप्रिय पशु पात्र असून ते अनेक संस्कृतींमध्ये विविध स्वरूपांत ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असलेलं दिसून येतं.

पंख आणि शिंग असलेला, चार पायांचा, आग ओकणारा ही खरी तर दुसऱ्या सहस्रकाच्या सुरुवातीच्या काळातली ड्रॅगनची युरोपीय आवृत्ती आहे.

असं असूनही ड्रॅगन म्हटला की आपण त्याचा संबंध बऱ्याचदा चीनशी जोडतो.

भारत आणि चीनमधील सीमासंघर्षाच्या निमित्ताने समाज माध्यमांवर लोकप्रिय झालेल्या चित्रातही राम एका ड्रॅगनवर प्रत्यंचा ताणून बाण मारण्यास सज्ज असल्याचं दाखवलं आहे.

त्या चित्रात चीनचा उल्लेखही नाही, तरी चित्रातून नेमकं काय म्हणायचंय ते पाहणाऱ्याच्या लगेचच लक्षात येतं.

पण मुळात चीनचा ड्रॅगनशी संबंधच काय? चीनी संस्कृतीचा ड्रॅगन या संकल्पनेवर इतरांहून जास्त हक्क आहे का?

युरोपीय संस्कृतीमधील ड्रॅगनचं महत्त्व

अलीकडच्या काळात हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्स, द हॉबिट, या ब्रिटिश महाकथांमध्ये ड्रॅगनचं पात्र रंगवलेलं दिसून येतं.

ब्रिटिशांना इतरांच्या वस्तू ढापून स्वत:च्या संग्रहालयांमध्ये ठेवायची हौस आहे, तशीच इतर संस्कृतीतील विशिष्ट प्राणी पात्रं ढापायलाही त्यांना काही वाटत नसावं, असा एखाद्याचा समज झाला तर नवल वाटायला नको.

मात्र युरोपात आणि विशेषत: इंग्लंडमध्ये ड्रॅगन या पात्राचा उगम चीनी प्रभावामुळे झालेला नाही. युरोप आणि चीनमध्ये ड्रॅगन ही संकल्पना स्वतंत्रपणे विकसित झाली असावी असंच अभ्यासकांचं मत आहे.

ड्रॅगन हा शब्द इंग्रजी भाषेत १३ व्या शतकामध्ये प्राचीन फ्रेंच भाषेतून आला. फ्रेंच भाषेत तो ड्रॅको या लॅटिन शब्दातून आला आहे, ज्याचा अर्थ मोठा साप असा होतो. हॅरी पॉटरमधील ड्रॅको मॅलफॉय या पात्राचं नाव किती चपखल आहे हे यावरून कळतं.

ख्रिस्त संस्कृतीत सेंट जॉर्ज अँड द ड्रॅगन नावाची एक आख्यायिका आहे.

यातील कथेनुसार, लिबियामधील सिलेन या नगरामध्ये एक ड्रॅगन येऊन राहिला. त्याने शहर उध्वस्त करू नये म्हणून रोज त्याच्याकडे दोन मेंढ्या पाठवल्या जायच्या.

पण या ड्रॅगनची भूक दोन मेंढ्यांनी भागेनाशी झाली. त्याला माणसाच्या मांसाची चटक लागली.

तो रोज एका कुमारीचं मांस मागायचा. अख्खं नगर जळून भस्मसात होऊ नये, म्हणून शहरातली माणसं निमुटपणे रोज एक कुमारी ड्रॅगनच्या हवाली करत असत.

असं करता करता एक दिवस राजाच्या मुलीवरच ड्रॅगनचं भक्ष्य होण्याची पाळी आली.

तिच्याऐवजी दुसरं कोणी ड्रॅगनकडे जायला उरलंच नव्हतं.

Albrecht Dürer - Saint George Killing the Dragon (NGA 1943.3.3597)
सेंट जॉर्ज ड्रॅगनचा वध करतानाचं चित्र

त्यासुमारास सेंट जॉर्ज प्रवास करता करता लिबियात आला होता. तिथे त्याला एका भिक्षुकाने सांगितलं की संपूर्ण नगरावर अवकळा पसरली आहे. मृत्युच्या छायेत भीत भीत सगळे जगत आहेत. एक ड्रॅगन संपूर्ण नगराला छळतोय, आणि आता तो राजाच्या मुलीला खाणार आहे.

हे ऐकल्यावर तिच्या मदतीसाठी सेंट जॉर्ज उभा ठाकला. त्याने भाल्याचा वार करून ड्रॅगनला ठार केलं आणि राजाच्या मुलीसकट अख्ख्या सिलेन नगराला वाचवलं.

राजाने याबद्दल देऊ केलेलं बक्षिस सेंट जॉर्जने गरिबांत वाटून टाकलं. यामुळे प्रभावित होऊन अनेक लोकांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला वगैरे वगैरे.

प्रत्यक्षात सेंट जॉर्ज हा केवळ रोमन साम्राज्यातला एक ग्रीक सैनिक होता.

Hans Süß von Kulmbach (zugeschr.) - Heiliger Georg

२३ एप्रिल ३०३ रोजी ख्रिस्त धर्म सोडण्यास नकार दिल्याबद्दल त्याला देहदंड देण्यात आला. म्हणून ख्रिस्त संस्कृतीत तो लोकप्रिय झाला. इतका की त्याला संतपद बहाल करण्यात आलं.

चौथ्या शतकाच्या अगदी सुरुवातीला मृत्यु पावलेल्या या सैनिकाने ड्रॅगनचा वध केल्याची आख्यायिका पहिल्यांदा उगवली ११व्या शतकामध्ये.

गंमत म्हणजे, हीच आख्यायिका इतर संतांच्या नावानेही अगोदरच्या शतकांमध्ये खूप खपली होती. पण नंतर ती सेंट जॉर्जच्या नावानं खपवली जाऊ लागली.

क्रुसेड्स म्हणजेच धर्मयुद्धाच्या काळात सेंट जॉर्जच्या आख्यायिका अतिशय प्रेरणादायी पात्र ठरल्या होत्या. आजही सेंट जॉर्जच्या स्मरणार्थ २३ एप्रिल हा दिवस सेंट जॉर्ज डे म्हणून युरोपात ठिकठिकाणी साजरा होतो.

या आख्यायिकेतल्या ड्रॅगनची लोकांना छळण्याची वृत्ती पाहून महाभारतातले बकासुर छाप व्हिलन लोक्स आठवतात ना?

पण भारतातही ड्रॅगन होता बरं का!

इंद्राने वृत्र नावाच्या एका असुराला मारल्याची एक आख्यायिका ऋग्वेदात आहे.

या असुराला मारल्याबद्दल वृत्रहन्‌ असं नाव इंद्राला मिळालं.

वृत्रासुर दुष्काळांचा देव मानला जातो.

Indra kills Vrttirasura (story from Rik Veda, featured in Bhagavatha)

तो नद्यांना बांध घालून नद्यांचं पाणी अडवायचा, आणि मग पुढच्या गावांमध्ये दुष्काळ यायचा.

(मानवी पातळीवर पाहिलं तर पाण्यामुळे झालेल्या युद्धांमध्ये वृत्र आणि इंद्राचं युद्ध आपण मोजू शकतो.)

जशी इंद्र ही देवांच्या राजासाठीची एक उपाधी मानली जाते, तशीच वृत्र हीसुद्धा एक उपाधीच आहे.

कश्यप हे वृत्रासुराचे वडील. वृत्राच्या आईचं नाव दनु, आणि तिच्या पोटी जन्मला म्हणून तो ‘दानव’ मानला जातो. दनु ही दानव वंशाची माता मानली जाते.

वृत्र या शब्दाचा अर्थ अडवणारा, झाकणारा असा होतो.

जे दानव किंवा दैत्य वंशाचे, त्यांना वृत्र म्हटलं जातं. इंद्राने अशा नव्याण्णव वृत्रांना मारलंय.

त्यामुळे वृत्र किंवा वृत्रासुर हे कोणा एका माणसाचं नाव नसून तीसुद्धा इंद्राच्या शत्रु नंबर वनची उपाधी असणार.

हा वृत्रासुरच आपला ड्रॅगन होता.

ऋग्वेदातील आख्यायिकेनुसार, वृत्राचं शरीर मोठ्या सापासारखं होतं. त्याला हातपाय नव्हते.

तो सापासारखा फुत्कारायचा. ढगांचा गडगडाट करणं, विजांचा कडकडाट करणं, सूर्योदय होऊ न देणं, सूर्याला झाकून टाकणं, आणि अर्थात पाण्याचे प्रवाह अडवणं, असे अचाट पराक्रम वृत्रासुर करायचा.

इंद्राने वृत्रासुराला ठार करून त्याने कैद करून ठेवलेल्या मेघांना मोकळं केलं, ज्यामुळे भरपूर पाऊस पडला.

चीनी संस्कृतीतील ड्रॅगनचं महत्त्व

चीनमध्ये ड्रॅगनला इतर संस्कृतींपेक्षा जास्त भाव असल्याचं कारण हे, की चीनमध्ये ड्रॅगनकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात.

ड्रॅगन हा पाऊस पाडणारा, पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देणारा दैवी प्राणी मानला जातो.

प्राचीन चीनी संस्कृतीत चार समुद्रांचं अस्तित्व सर्वज्ञात होतं, आणि या समुद्रांचे शासक चार ड्रॅगन राजे होते.

पण ड्रॅगनचं अस्तित्व फक्त समुद्रासारख्या पाण्याच्या मोठ्या साठ्यांपुरतं मर्यादित नाही.

जिथे जिथे छोटे मोठे जलाशय असत, तिथे तिथे ड्रॅगनचा वास आहे, असा समज लोकांमध्ये प्रचलित असायचा.

काय गंमत आहे पाहा, भारतीय ड्रॅगन बांध घालून पाणी अडवणारा, तर चीनमधला ड्रॅगन लोकांना पाणी देणारा निघाला!

चीनी ड्रॅगन अतिशय शक्तिशाली असतो. त्याला शिंगं असतात, सशासारखे लालभडक डोळे असतात. सापासारखी मान, गरुडासारखे पंजे, माशासारखे खवले, आणि बेडकासारखं भलंमोठं पोट!

तो जलाशयांत राहतो, नाहीतर ढगांत राहतो. आणि तो उडायला लागला की विजांचा कडकडाट होतो.

चीनी ड्रॅगन मायावी प्राणी आहे. तो मनाला येईल तेव्हा स्वत:चा आकार बदलू शकतो, छोटा मोठा होऊ शकतो.

मनात येईल तेव्हा गायब होऊ शकतो, मनात येईल तिथे प्रकट होऊ शकतो.

पण असं सगळं असूनही चीनमध्ये ड्रॅगन हा प्राणी अतिशय बुद्धिमान आणि न्यायी मानला जातो.

आणि म्हणूनच चीनी सम्राटांसकट सगळीकडे ठिकठिकाणी ड्रॅगनचं चिह्न मोठ्या गर्वाने वापरलेलं दिसतं.

ड्रॅगनचं चिह्न भाग्यशाली मानलं जातं.

त्याला खुश करण्यासाठी, आणि भरपूर पाऊस यावा म्हणून चीनच्या गावागावांत प्राचीन काळापासून लोकनृत्यं होतात.

चीनी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी ज्या मिरवणुका निघतात, तेव्हाही ड्रॅगनला खुश करणारं नृत्य केलं जातं.

पण मुळात ड्रॅगन या संकल्पनेचा उदय विविध संस्कृतींमध्ये झालाच कसा?

पृथ्वीवर एकेकाळी वावरलेल्या महाकाय प्राण्यांचे सापडलेले अवशेष आणि मानवाचा कल्पक मेंदू – हा मेळ साधला गेला की काहीही सहज शक्य आहे.

अतिशय स्वाभाविक प्रेरणा म्हणजे डायनासोर

प्राचीन काळात जगात कुठेही लोकांना डायनासोरांचे सांगाडे मिळाले, की एवढ्या महाकाय प्राण्याबद्दल लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधत असत.

यातून हा प्राणी आग ओकणारा, उडू शकणारा होता, अशा दंतकथा उपटणं आणि पसरणं अत्यंत स्वाभाविक आहे.

इसपूर्व ४थ्या शतकात चांग क्वू नावाच्या एक चीनी इतिहासकाराने अशीच चूक केली होती.

त्याला सापडलेला स्टेगोसॉरसचा सांगाडा ३० फूट लांब, १४ फूट उंच होता.

देवमाशाचे सांगाडे, मोठ्या मगरी

अनेक संस्कृतीत ड्रॅगन हा पाण्याशी संबंधित प्राणी मानला जातो.

आफ्रिकेतल्या मोठाल्या मगरी पोहत पोहत युरोपापर्यंत पोहोचल्या असतील, आणि तिथे जर त्यांनी काही गरीब बिचाऱ्या माणसांना (किंवा आधी मेंढ्यांना) गिळून टाकलं असेल, तर अशा घटनांमधून ड्रॅगनविषयीच्या दंतकथा अवतरणं फारसं कठीण नाही.

भलेमोठे देवमासे अख्खं आयुष्य समुद्रामध्ये जगतात आणि त्यामुळे जिवंतपणी तरी त्यांचा जमिनीवर राहणाऱ्या अजाण मानवाशी फारसा संपर्क येण्याचं विशेष काही कारण नसतं.

विशेषत: जर तुम्ही अशा काळात राहात असाल जेव्हा देवमाशांवर काही संशोधन झालंच नव्हतं, आणि त्यातच कोणाला त्यांचे सांगाडे मिळाले, तर हा असा प्राणी नेमका राहतो कुठे आणि खातो काय, याविषयीच्या अनंत कल्पना लोकांच्या मनात उमटू शकतात.

ड्रॅगनचं सापाशी असलेलं साधर्म्य बरंच काही सांगून जातं.

माणसाचा मेंदू वर्षानुवर्षांच्या उत्क्रांतीमुळे असा काही घडवला गेलाय, की साप आणि पालीसारखे वळवळणारे, सरपटणारे प्राणी समोर आले की बहुतेकांची टराटरा फाटते.

खरं तर बिचारा साप आपल्या वाटेने जात असतो. तो उंदीर-घुशी खातो म्हणून त्याला शेतकऱ्यांचा मित्रही म्हणतात.

पण तरीही साप म्हटला की मनात आपसूकच एक नकारात्मक प्रतिमा उमटते.

तिचा आपल्यावर एवढा खोलवर परिणाम झालेला असतो की दिसला साप की ठेचा त्याला, अशी वृत्ती बहुतेकांमध्ये दिसून येते.

सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल असलेली ही भीती, आणि जोडीला अतिशयोक्ती अलंकार वापरण्याची खुमखुमी.

लहान मुलांना गोष्टी सांगायला एवढा कच्चा माल पुरेसा असतो.

पण या आधारावर रचलेल्या गोष्टी कैकदा इतक्या शक्तिशाली असतात, त्यांत योजलेली रूपकं इतकी चपखल असतात, की या गोष्टी अमर होतात; आणि त्यांतली पात्रंसुद्धा वर्षानुवर्षं लोकांना भेडसावत राहतात.

ड्रॅगन हे असंच एक पात्र आहे. ते एका अर्थी एक रूपकच आहे. कोणासाठी ते सुखकारी, कोणासाठी ते प्रलयकारी.

आपण कोणती बाजू निवडावी, हे आपण ठरवायचं आहे.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *