॥ देशकालोच्चारण ॥

हल्ली कानावर पडलेला एखादा मंत्रघोष मनात बरंच काही जागवून जातो. नाना आजोबा घरच्या देवांची रोजची पूजा किमान पंचोपचार पद्धतीने तरी करायचेच. सणावारांना षोडशोपचार व्हायचे. लहानपणी बाकी उद्योग काहीच नसल्याने मी त्यांच्या अवतीभवती घुटमळत असायचो. पूजेच्या सुरुवातीचे विधी, आचमन्, प्राणायाम, देवता ध्यान वगैरे झाले की यायचा संकल्प आणि तो त्यातल्या नादमयी शब्दांमुळे पुढचा बराच वेळ माझ्या मनामध्ये घुटमळत राहायचा. माझी मुंज झाली तसे ते मला पूजा करायला बसवू लागले. स्वतः मागे बसून ते पूजा सांगायचे आणि मी करीत जायचो. देशकालोच्चारण व संकल्प ही आता जास्तच आवडायला लागलेली गोष्ट झालेली होती… संपूर्ण अर्थ माहीत नसतानाही ते शब्दोच्चारण भलतंच मोहवायचं.

संकल्प का करायचा असतो ते ठाऊक होतं पण त्याचा नीट अर्थ सांगेल अशी व्यक्ती भेटता भेटेना. नाना तर आता देवाघरी गेलेले. हे एक त्यांना विचारायचं राहूनच गेलं याचं वैषम्य कायम वाटत राहिलं. अगदी अलिकडे आंतरजालावर शोध घेतला आणि विखुरलेल्या, तुकड्यातुकड्यांनी का होईना पण ते कोडं अलगद उलगडत गेलं. संकल्प म्हणजे एका अर्थाने आपण आपल्या चेतनेला ब्रह्मांडाशी जोडणं. त्या अनादी शक्तीशी जोडलं जाऊन अविरत धावणाऱ्या आपल्या मनाला वर्तमान क्षणात आणणं आणि त्यानंतर आपल्या मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करणं.

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आयुष्यात कधी ना कधी पूजाअर्चा करताना संकल्पाचं पाणी सोडलेलं असतं पण आता त्या मंत्राचा नक्की अर्थही आपल्याला कळावा म्हणून हा लेख.

हिंदू धर्माच्या परंपरेनुसार कुठलंही चांगलं काम करण्याच्या आधी संकल्प सोडण्याची पद्धत आहे. संकल्प या शब्दाचा अर्थच मुळी सम् म्हणजे चांगलं आणि कल्प म्हणजे वैदिक शास्त्र असा होतो. वैदिक शास्त्राला धरुन आपण स्वतःसाठी व आपल्यामध्ये वसणाऱ्या परब्रह्मासाठी केलेली घोषणा म्हणजे संकल्प. जगाची निर्मिती हा श्री विष्णूंचा संकल्प होता असं वेदांमध्ये सांगितलेलं आहे. ढोबळ अर्थ घ्यायचा तर अमुक एक काम (पूजा) कितीही विघ्नं मध्ये आली तरीही मी तडीस नेईनच असा स्वतःशीच केलेला निग्रही ठराव वा घेतलेली शपथ म्हणजेच संकल्प. कुठल्याही पूजेच्या, पाठाच्या वा अनुष्ठानाच्या आधी संकल्प केला नाही तर त्या पूजेचं फलित इंद्राच्या खाती जमा होतं असं सांगितलं जातं.

संकल्प ही एक धारणा शक्ति आहे. वैदिक पद्धतीने पूजेचा संकल्प करताना देवासमोर पद्मासनात बसावं. उजव्या हाताचा तळवा डाव्या तळव्यावर घट्ट पकडावा. ही हस्तमुद्रा उजव्या मांडीवर गुडघ्याच्या जराशी वर स्थिर करावी. संकल्प मंत्र म्हणून झाल्यावर उजव्या हातात एखादं फूल व अक्षता घेऊन पाण्याबरोबर त्या अर्घ्यपात्रात सोडाव्यात. नुसतं पाणी सोडलं तरी चालतं. वैदिक संकल्पाच्या आधी देशकालोच्चारण असतं. त्यामध्ये वेळ, स्थान, पंचांगामधले वेगवेगळे घटक, वंशावळ, पूजेचा हेतू, यजमानाची इच्छा, ज्या देवतेची पूजा आहे त्याचं नाव इत्यादी घटक येतात. साधारणतः देशकालोच्चारण पुढीलप्रमाणे होतं…

ॐ श्री विष्णुर्विष्णुर्विष्णुः॥

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे, वैवस्वतमन्वंतरे, अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे, प्रथमचरणे, भरतवर्षे, भरतखंडे, जंबुद्वीपे, बौद्धावतारे श्रीरामक्षेत्रे, दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे अमुकदेशे, अमुकग्रामे, शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने, अमुकनाम संवत्सरे, अमुकअयने, अमुकऋतौ, अमुकमासे, अमुकपक्षे, अमुकतिथौ, अमुकवासरे, अमुकदिवसनक्षत्रे, अमुकयोगे, अमुककरणे, अमुकस्थिते वर्तमाने चंद्रे, अमुकस्थिते श्रीसूर्ये, अमुकस्थिते श्रीदेवगुरौ, शेषेषु ग्रहेषु, यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवंगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ –

या उच्चारणामधला वेळेचा घटक हा साक्षात ब्रह्मदेवाच्या वेळेशी सांगड घालणारा आहे. म्हणजे, वेदमानानुसार आजच्या तारखेचा ब्रह्मदेवाच्या जन्मवेळेशी संबंध दाखवणारा आहे. “अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे…” म्हणजे आत्ताच्या ब्रह्माचं अर्धं आयुष्य पार पडलेलं आहे आणि आपण आता त्यांच्या आयुष्याच्या द्वितीय परार्धात (भागात) आहोत. म्हणजेच ब्रह्मदेव आता एक्कावन्न वर्षांचे आहेत. ब्रह्माच्या आयुष्याची पन्नास वर्षं म्हणजे आपल्या मानव कालगणनेनुसार १५५.५२ दशखर्व वर्षं. दशखर्व म्हणजे दहाचा बारावा घात. इंग्लिशमध्ये सांगायचं तर, ट्रिलीयन. आपल्या कालगणनेनुसार ब्रह्मदेवाचं १५५.५२ ट्रिलीयन वर्षांचं आयुष्य संपलेलं आहे. “श्वेतवाराहकल्पे” म्हणजे ब्रह्मदेवाच्या एक्कावन्नाव्या वर्षाचा हा पहिला दिवस सुरु आहे. हा तोच कल्प (दिवस) आहे ज्या दिवशी विष्णूने वराह अवतार घेतला होता.

वैवस्वतमन्वंतरे” म्हणजे एकूण चौदा मन्वतरांपैकीचं हे सातवं मन्वंतर सुरु आहे. वैवस्वत हे त्याचं नाव. काळसंधीची गणितं सोडवायचीच तर गेल्या सहा मन्वंतरात आपण १८५.२४ करोड मानव वर्षं मागे टाकलेली आहेत. “अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे, प्रथमचरणे..” आत्ताच्या वैवस्वत मन्वंतरात आपण एकाहत्तर पैकी सत्तावीस महायुगं पार केलेली आहेत. अठ्ठाविसावं महायुग सुरु आहे. परत ह्या महायुगामधली कृतयुग किंवा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग ही तीन युगं मागे पडलेली आहेत. आता आपण ख्रि.पू. ३१०२ मध्ये सुरुवात झालेल्या कलियुगाच्या पहिल्या तिमाहीत आहोत. हा लेख लिहिताना मार्च २०१९ मध्ये कलियुगाची ५१२० वर्षं पूर्ण झालेली आहेत आणि तरीही या युगाचा फक्त प्रथम भागच (चरण) सुरु आहे. एकूणच ब्रह्मदेवाचं घड्याळ त्याला कोणी बनवून दिलं आणि ते कसं चालतं हे समजून घेणं हा पुढच्या लेखाचा विषय ठेवावा असं वाटतंय!

तर, देशकालोच्चरणातला वेळेचा घटक संपला की स्थानोच्चार येतो. आपण पूजा करायला नक्की कुठे बसलोय याचं उच्चारण करावं लागतं. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्या स्थानाप्रमाणे हे उच्चारण बदलत जातं, किंवा खरं तर बदलत जायला हवं. “भरतवर्षे, भरतखंडे, जंबुद्वीपे, बौद्धावतारे श्रीरामक्षेत्रे, दंडकारण्ये देशे” याचा अर्थ असा – जगात एकूण नऊ ‘वर्ष’ आहेत. त्यातल्या मेरुपर्वताच्या दक्षिण भागातल्या भरतवर्षात आपण रहातो. महाराजाधिराज भरताची ही भूमी – भरतखंड, जी आसेतुहिमाचल पसरलेली आहे. जगामधल्या सात द्विपांपैकी जंबुद्विपावर आपण राहतो. भगवान विष्णूंचा बुद्धावतार इथेच झाला व श्रीरामाची भूमी व त्यांचं दंडकारण्यसुद्धा आमच्या इथेच होतं.

गोदावर्या: दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे अमुकदेशे, अमुकग्रामे” – गोदावरी नदीच्या दक्षिणेला तर कृष्णा व वेण्णेच्या उत्तर तीरावर वसलेल्या अमुक राज्यात अमुक अशा या गावी शालिवाहन शकानुसार मी वर्तमान काळाचा उल्लेख करतोय. “शालिवाहनशके” म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी शालिवाहन (मूळ: साळीहन हे प्राकृत भाषेतलं नाव, म्हणजेच सातवाहन घराणं) या महापराक्रमी राजाने सुरु केलेला ‘शक’ (म्हणजेच संवत अशा अर्थाची एक कालगणना) सद्ध्या सुरु आहे. आपण रोज वापरतो ती इंग्लिश दिनदर्शिका हा ख्रिस्त शक आहे. तसंच हल्लीचं हिंदू दिनमान हे शालिवाहनांनी इ.स. ७८ मध्ये सुरु केलं. युधिष्ठिर शक व विक्रम शकानंतरचा महत्वाचा असा हा शालिवाहन शक आहे. यानंतर पंचागाप्रमाणे त्या वर्तमान दिवसाच्या दिनमानाचा उच्चार येतो.

संवत्सर हा सहा वर्षांचा समूह चक्रीय पद्धतीने परत परत येत असतो. पहिलं असतं प्रभाव तर शेवटचं अक्षय. उत्तरायण आणि दक्षिणायन हे वर्षाचे दोन भाग करतं; त्याप्रमाणे अयनाचा उच्चार होतो. वर्षातल्या सहा ऋतुंपैकी जो सुरु असेल त्याचा उच्चार. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर हे ते सहा ऋतु. प्रत्येक ऋतु दोन महिन्याचा असतो. नंतर येतो तो हिंदू मास म्हणजे महिना. पक्ष, शुक्ल अथवा कृष्ण. त्यानंतर चंद्रमानानुसार त्या दिवसाची तिथी. मग दिवसांच्या सात नावांपैकी त्या दिवसाचं नाव. दिवसाचं नक्षत्र. सत्तावीस योगांपैकी संकल्प वेळेला सुरु असणारा योग. हे उच्चारण फक्त “शुभ योगे” असंही चालतं. एकूण अकरा करणं असतात पण त्याचा उच्चारही बरेचदा “शुभ करणे” असाच केला जातो. पंचागाप्रमाणे चंद्र, सूर्य व गुरु हे आपल्या सूर्यमालेचे तीन मुख्य घटक कुठल्या राशीत येतात त्याचा उच्चार. देशकालोच्चारण इथे संपतं.

या नंतर येतो तो मुख्य संकल्प. “मम” म्हणून पुढची सुरुवात होते. तुम्ही स्वतः पूजा करत नसलात, गुरुजी किंवा पुरोहित तुम्हाला ती सांगत असले तरीही तुम्ही इथे ‘मम’ म्हणून त्या पूजाकार्याशी स्वतःला जोडून घेत असता. एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते, हिंदू धर्म (खरं तर हा धर्म असा नसून एक जीवनपद्धती आहे) सोडला तर दुसऱ्या कुठल्याही धर्मामध्ये इतक्या बारकाईने पाडलेले दिनमानाचे भाग व त्यांचं उच्चारण आढळत नाही हे आपल्यासाठी एक अभिमानास्पद विशेष आहे.

असो तर, आता कुठल्याही पूजेला बसून पाणी सोडताना वा ती ऐकताना तुम्हाला या देशकालोच्चारणाचा पूर्ण अर्थ नक्की माहिती असेल. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार फलप्राप्ती होवो अशी मंगल मनोकामना व्यक्त करुन हा लेख संपवतो.

॥शुभम् भवतु॥

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *