दर्पण : समाचार मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राचा

सकाळचे मुखमार्जनादी विधी झाले की दिवसातल्या पहिल्या चहा-कॉफीसोबत अनेकजण वृत्तपत्र चाळायला घेतात. आजकालची मुलं मात्र हे करत नाहीत कारण त्यांच्या माहितीचे स्रोत हल्ली ‘डिजीटल’ झालेले आहेत. बहुसंख्य वृत्तपत्रांनीदेखील आधुनिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वतःचे ई-अंक काढलेले दिसतात. बाहेरगावी, परदेशी राहणाऱ्यांची त्यामुळे भलती उत्तम सोय होते. मोबाईल वा टॅबलेटवर वृत्तपत्र वाचायला सोपं जरी असलं तरी वाचनाची ‘ती’ मजा त्यावर काही येत नाही. आजकाल सर्व भारतीय भाषांमधली वृत्तपत्रं ‘ऑनलाईन’ वाचता येतात. मार्च २०१८ पर्यंत भारतामध्ये एक लाखांहून अधिक वृत्तपत्रांची नोंदणी झालेली आहे तर प्रतिदिनी विकल्या जाणाऱ्या दैनिक प्रतींची संख्या दोनशे चाळीस दशलक्ष इतकी महाप्रचंड आहे. आजघडीला वृत्तपत्रांची भारतीय बाजारपेठ जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ म्हणूनही नावाजली जाते.

सन १८१८ मध्ये पंतप्रधान पेशव्यांचा पाडाव करून छत्रपति शिवरायांनी स्थापलेलं हिंदवी स्वराज्य ब्रिटीशांनी घशात घातलं. स्वराज्य खालसा होण्याबरोबरच प्रचंड मोठा मुलुख ब्रिटीशांच्या ताब्यात आलेला होता. जिकडेतिकडे गोऱ्यांनी उच्छाद मांडायला सुरुवात केलेली होती. समाजमनाला बसलेला हा सर्वांत मोठा सामूहिक धक्का होता. निर्नायकी अवस्थेकडून केंद्रशासित सरकारी अवस्थेमध्ये होत असलेलं स्थित्यंतर पचनी पडणं ही सोपी गोष्ट नव्हती. असंख्य जुन्या रूढी, कल्पना, चालीरीती, परंपरा, कर्मकांड, दारिद्र्य वगैरे गोष्टींचा पगडा आणि त्याचा अदृश्य फास समाजाभोवती करकचून आवळला गेलेला होता. समाजाचा ऱ्हास होण्याआधी तो सावरला जाणं फार महत्त्वाचं होतं. राजाच नाही तर प्रजा नक्की कशी सावरली जाणार हेच बहुसंख्यांना समजत नव्हतं.

 

भिरभिरलेल्या प्रजेच्या मनावर राज्य गाजवू शकणाऱ्या कुणाची तरी गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली होती. ६ जानेवारी १८१२ रोजी कोंकणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभु्र्ले गावी जन्मलेल्या बाळशास्त्री जांभेकर नामक अतिशय हुशार व विद्वान माणसाने या समस्येवर त्या काळातला सर्वोत्तम तोडगा शोधला. फक्त वीस वर्षांचं वय असताना त्यांनी एक वृत्तपत्र काढलं. ‘दर्पण’ हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरु करण्याचा मान याच श्री. बाळशास्त्री जांभेकरांकडे जातो. स्वतःच्या वाढदिवशी, ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र त्यांनी जन्माला घातलं; मराठी पत्रकारितेची पायाभरणी केली, मराठी जनतेला तोपर्यंत ठाऊक नसलेलं नवं माध्यम अस्तित्वात आणलं. आजही ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

‘काय करावं’ हे आपल्याला तिसरं कुणी तरी सांगू शकतं आणि कुठल्याही जुलूम जबरदस्तीशिवाय, आपल्याला ते पटलं, तर आपण तो विचार आचरणातही आणू शकतो हा नवा विश्वास लोकांच्या मनात रुजला. मुद्रित माध्यमं वापरून जुलमी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात आवाज उठवता येईल हा जांभेकरांचा विचार पुढे जाऊन कालांतराने अतिशय क्रांतिकारक ठरला. स्वातंत्र्य लढ्यामधलं वृत्तपत्रांचं स्थान व योगदान पुढची शे-दीडशे वर्षं वाढतच गेलं, सतत अग्रणी स्वरूपाचं राहिलं, जनजागृती करत राहिलं. हा विचार पूर्णतः आवरणं मग्रूर ब्रिटीश सत्तेलाही फार अवघड गेलं. लोकांचा आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायांचा मुक्त आवाज ही स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सर्वच भारतीय वृत्तपत्रं वा दैनिकांची जागतिक स्तरावरची महत्त्वाची ओळख होती.

‘दर्पण’चा जन्म हा बाळशास्त्री जांभेकरांची देशभक्ती आणि समाजभान या दोन्हींमधून झालेला होता. आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी हे वृत्तपत्र काढलं. आज दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं-वहिलं पाक्षिक/ वृत्तपत्र म्हणून जरी ओळखलं जात असलं तरी गंमत म्हणजे त्यात दोन भाषांचा समावेश होता. वार्तापत्राचा एक स्तंभ आम जनतेसाठी म्हणून मराठीत छापला जायचा तर दुसरा स्तंभ ब्रिटीशांनाही समजावं म्हणून त्यांच्या भाषेत, म्हणजे चक्क इंग्लिशमध्ये छापला जायचा. वार्तापत्राची एकूणच कल्पना नवी असल्याने सुरुवातीच्या काळात ‘दर्पण’चे वर्गणीदार फार नव्हते पण हळूहळू ही संकल्पना लोकांच्या गळी पडली, त्यात व्यक्त होणारे विचार जनतेला आवडू लागले आणि वृत्तपत्राचे कायमस्वरूपी वर्गणीदार बऱ्यापैकी वाढले. वार्तापत्राच्या पहिल्या वर्धापनदिनी वर्गणीदारांची संख्या त्रिशतकी होती. इतक्या जुन्या काळीसुद्धा ‘दर्पण’ची किंमत तब्बल एक रूपया इतकी मोठी होती.

दर्पण वृत्तपत्राचा अंक

न शिकलेल्या, शिक्षणाचं महत्व न समजलेल्या भारतीय समाजाचा उत्कर्ष व्हायचा असेल तर तो फक्त विज्ञाननिष्ठ विचारांनीच होऊ शकतो यावर बाळशास्त्री ठाम होते. ‘दर्पण’च्या मार्फत त्यांनी अनेक घातक परंपरांवर व रूढींवर प्रहार केले. विधवा पुनर्विवाहासारख्या ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने लिहून त्याचा पाठपुरावा केला. अशिक्षित समाजात त्यामुळे खळबळ उडाली. अनेक सभा व ग्रामसभांमधून हा विषय खूप वेळा चर्चिला गेला. शेवटी त्यामधूनच विधवा पुनर्विवाह चळवळ उभी राहिली.

कुठलंही ज्ञान हे समाजात सतत झिरपत राहिलं पाहिजे हा जांभेकरांचा विचार त्या वेळच्या काळाच्या बराच पुढे होता. वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून आणि सामाजिक समस्यांबाबत तर्कशुद्ध दृष्टीकोन ठेवूनच देश प्रगती करू शकेल हे या द्रष्ट्याने इतक्या वर्षांपूर्वी जाणलेलं होतं. त्यासाठी ‘दर्पण’सारख्या माध्यमाचा त्यांनी यथोचित वापर केला. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली सामाजिक एकजूट व सशक्त भारतीय समाज उभा करणं हे त्यांचं स्वप्नं होतं.
सर्वसामान्यांमध्ये उपयुक्त आणि निरोगी जाणिवा निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करणारे आणि अशिक्षितांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करणारे बाळशास्त्री जांभेकर हे तत्कालीन थोर सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत होते.

त्यांच्या विलक्षण प्रतिभेमुळे आणि समाजासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतभरातील एक प्रतिष्ठित समाजसुधारक आणि पत्रकार म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलं गेलं. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केलं. १८४० मध्ये त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस’ म्हणून गौरवण्यात आलं होतं. गणित, ज्योतिष व खगोल शास्त्रावरील प्रभुत्वामुळे कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं. मुंबईचे शिल्पकार दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे शिष्य!

सार्वजनिक ग्रंथालयाचं महत्त्व ओळखून त्यांनी ‘बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ची स्थापना केली. ‘एशियाटिक सोसायटी’च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनीच १८४५ साली काढली. त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये ‘नीतिकथा’, ‘इंग्लंड देशाची बखर’, ‘इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप’, ‘हिंदुस्थानचा इतिहास’, ‘शून्यलब्धिगणित’, इत्यादी ग्रंथांचा समावेश आहे. ‘दर्पण’ हे तर बाळशास्त्रींच्या हातातलं एक लोकशिक्षणाचं माध्यम होतं आणि त्यांनी समाज प्रबोधनासाठी त्याचा उत्तम वापर करून घेतला. दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतलं पहिलं मासिक ‘दिग्दर्शन’ हे ही त्यांनी सन १८४० मध्ये सुरू केलं. ‘दिग्दर्शन’ मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसंच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत.

हे सगळे जमेचे मुद्दे असूनही दर्पण फक्त साडेआठ वर्षं चाललं. जुलै १८४० मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. पुढे सन १८४६ मध्ये १८ मे रोजी मामुली आजाराने बाळशास्त्रींचं निधन झालं. उण्यापुऱ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात देशाची व या महाराष्ट्राची भरभरून सेवा करणाऱ्या या ‘दर्पण’काराला हा लेख सविनय अर्पण!

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *