शुद्ध भाषा म्हणजे काय रे भावा?

शुद्ध भाषेत पोळी शुद्ध आणि चपाती अशुद्ध असं नसतं. पोळी आणि चपाती हे दोन्ही शब्द शुद्धच आहेत.

पण…

पोली,

शूध्द,

चपाति

हे नक्कीच अशुद्ध मानलं जातं. शुद्ध भाषा शब्दांवर आक्षेप घेतेच असं नव्हे. तर शब्दांच्या योग्य उच्चारांसाठी आणि त्या योग्य उच्चारानुसार अचूक लेखनासाठी आग्रह धरते.

उकार, वेलांटी कुठे ऱ्हस्व द्यावी, कुठे दीर्घ, याचे नियम पाळायचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. सगळे कुठे ना कुठे तरी चुकत असतात. कधी नजरचुकीने, कधी अज्ञानामुळे किंवा कधी ठाम गैरसमजुतीमुळे. आपली चूक लक्षात आली किंवा इतर कोणी आपल्या लक्षात आणून दिली तर ती सुधारावी आणि पुढे जावं. यात स्वाभिमान/भावना दुखावून घेण्यासारखं काहीही नाही.

अशा चुका दाखवून देण्याच्या बाबतीत मी आग्रही आहे (चावरा आहे). दुसऱ्याला त्याची चूक दाखवून देताना मला आसुरी आनंद होत नाही. तसं असतं तर समोरच्याला न दुखावता त्याची चूक कशी सांगता येईल याचा विचार करून दरवेळी मनातल्या मनात मी सौम्य वाक्यं रचत बसलो नसतो. पण मी हे असं करतो हे समोरच्याला कसं कळायचं? म्हणून चुका काढताना मला आसुरी आनंद होतोच असा माझ्या अगदी जवळच्या मित्रांचाही समज असतो. मग मी कधी बोलता बोलता स्वतः चुकलो तर माझी चूक दाखवून देताना समोरचे अक्षरशः उड्या मारायचे बाकी राहतात. कोणीकोणी ‘आता कसं वाटतं? हं?’ असंही विचारतात. मी हसतो, माझी चूक मान्य करतो, आणि परत परत सांगत राहतो की मला चुका काढताना आसुरी आनंद होत नाही. पण मित्रांचा आसुरी आनंद मात्र गगनात मावेनासा झालेला असतो. समोरच्याशी एखाद्या विषयावर संवाद चालू असताना तो सारखा चुकत असेल, तर माझं त्याच्या बोलण्याकडे लक्ष राहात नाही. असं चालू विषयावरनं माझं लक्ष उडालेलं मला का बरं आवडेल?

तुम्ही काही उदाहरणं पाहिली असतील, एखादा माणूस काहीतरी अचाट करून दाखवतो. त्याच्या मुलाखती घेतल्या जातात. इंग्रजीचं फारसं शिक्षण नसल्याने तो तोडकं मोडकं इंग्रजी बोलतो. त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर निश्चितच कमी होत नाही, पण जागोजागी तो कुठे कुठे चुकला त्याची आपसूक मनात नोंद होत राहते. मग आपण स्वतःला समजावतो, ‘हरकत नाही. एवढं मोठं काम केलं ते काय कमी आहे? इंग्रजी कशाला यायला हवंय?’ पण अशी स्वतःची समजुत घालताना आपण हे तर मान्य करत असतो की त्याला इंग्रजी येत नाही. भाषा नीट येत नसली तर फारसं बिघडत नसतं. पण जर नीट आली तर त्या भाषेच्या माध्यमातनं जो संदेश द्यायचा असतो त्याकडे ऐकणाऱ्या माणसाला पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं.

न्यूनगंड असला तर त्यावर मात करायची की आपल्याला न्यूनगंड आहे हेच नाकारत बसून कोल्ह्याला द्राक्षं आंबट या न्यायाने भाषेच्या नियमांनाच दोष देत बसायचं?

इंग्रजीचा न्यूनगंड घालवण्यासाठी लोक ती भाषा शिकतात किंवा स्वतःच्या मुलांनी ती शिकावी यासाठी प्रयत्न करतात. मराठीत शुद्धलेखन जमत नसल्याचा न्यूनगंड घालवण्यासाठी मात्र नेमका उलटा नियम लावतात. शुद्धलेखनालाच नावं ठेवतात. त्यासाठी काहीही निमित्त देतात. काय साध्य होतं अशाने? फारतर तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही असं म्हणून लोक तुमच्या चुका तोंडावर काढणं बंद करतील, पण तुमच्या मागे तुमच्यावर हसतील किंवा निराशेने मान हलवतील.

समोरचा माणूस आसुरी आनंदाच्या हेतुने चूक सुधारतो, की त्याला स्वतःला ती चूक खटकते आणि प्रामाणिकपणे सुधारावीशी वाटते म्हणून तुमची चूक सुधारतो, हा त्या माणसाचा प्रश्न आहे. आपण चूक झाली हे लक्षात आणून दिल्याबद्दल नेहमी समोरच्याचे आभार मानावेत. असं केलं तर समोरच्याला आसुरी आनंद मिळूच शकत नाही. आणि तो प्रामाणिक असेल तर त्यालाही बरं वाटेल.

तेव्हा दोस्तहो, शुद्धभाषेबाबत मनमोकळेपणे आग्रही असा, आणि स्वतःच्या चुका सुधारण्याचा चिकाटीनं प्रयत्न करत राहा.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

2 thoughts on “शुद्ध भाषा म्हणजे काय रे भावा?

 • December 11, 2018 at 8:34 am
  Permalink

  स्तुत्य!

  Reply
 • December 13, 2018 at 3:31 am
  Permalink

  अगदी योग्य!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *