रंग आणि त्यांच्या छटा सांगणारे मराठी शब्द

चित्रकलेत लुडबूड करताना किंवा चित्रांविषयी वाचताना विविध रंगांच्या छटांनी मोहित होणं स्वाभाविक आहे. बर्ण्ट सिएन्ना, कॅनरी यलो, ऍक्वा मरीन ब्लू अशा रंगछटा भेटीला येत तेव्हा मराठीतून अशा प्रमाणित रंगछटा का वर्णिल्या जाऊ नयेत असे मला वाटत असे.

मराठीत असे नेमकेपणाने लिहिण्याबोलण्याची प्रवृत्ती (मुळातून मराठीमध्येच लिहिण्याबोलण्याची प्रवृत्ती) कमी होत असताना हा प्रश्न अधिकच सतावू लागला आहे. आपल्या भाषेच्या ह्या सुंदर अंगाकडे आपण दुर्लक्ष करून सुखद शब्दांचा खजिना गमावतो आहोत असे वाटते. मित्रांकडे आणि ओळखीच्या चित्रकारांकडे मी नेहमी हा प्रश्न काढतो.

जाहिरातीची एक क्लृप्ती म्हणून अलिकडे गाड्यांना दिल्या जाणाऱ्या रंगांसाठी नवे अनवट शब्द “कॉइन’ झालेले कानावर पडतात. स्त्रियांच्या साड्यांच्या वेडामुळे रंगछटांचे काही शब्द मात्र आवर्जून मराठीत वापरले जाताना दिसतात. सामान्यतः फुलांच्या, पदार्थांच्या, पशुपक्ष्यांच्या नावांचा वापर नेमक्या रंगछटांचे वर्णन करण्यासाठी केलेला आहे. 

श्री. मारुती चितमपल्ली ह्यांनी त्यांच्या आईच्या वापरातील शब्दसंपत्तीसंबंधी आपल्या “चकवा-चांदणं’ ह्या आत्मचरित्रात लिहिले आहे ते माझ्या आईने नुकतेच माझ्या निदर्शनाला आणले;

डाळिंबी, मनुका, कथ्या, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, मेंदी, गव्हाळी, जांभा, पोवळा, शरबती या तांबड्या रंगाच्या छटा; जिलेबी, लिंबू,सायी, चांदणी, सोनेरी, केशरी, केतकी ह्या पिवळ्या रंगाच्या छटा. लिंबोळी, पोपटी, शेवाळी ह्या हिरव्या रंगाच्या छटा. अस्मानी आणि आनंदी ह्या निळ्या रंगाच्या छटा. निळ्या रंगाला ‘आनंदी’ हा किती अपरूप शब्द. अंजिरी, बैंगणी आणि मावा ह्या जांभळ्या रंगाच्या छटा. काळा करवंदी, बुक्का रंग, शिसवी, चंद्रकळा ह्या काळ्या रंगाच्या छटा. दुधिया, मोतिया आणि चांदी ह्या पांढऱ्या रंगाच्या छटा. गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली ही रंगांची मिश्रणं…

त्यानंतर आमच्या घरात काही काळ सगळ्यांना असे शब्द शोधण्याचे वेडच लागले. माझे मुलगे माझी पत्नी आणि सून सगळेजण कामाला लागले. आम्हाला फारशी मजल गाठता आली नसली तरी जे काही शब्द जमा झाले त्यांची यादी ही अशी आहे :

राखाडी

विटकरी

तपकिरी

हळदी

मोरपिशी

लिंबू

पारवा

आकाशी

अंजिरी

कुसुंबी

वांगी

लाल

किरमिजी

तांबडा

शेंदरी

नारिंगी

अबोली

केशरी

कोनफळी

दुधी

मोतिया

सोनेरी

रुपेरी

चंदेरी

जास्वंदी

डाळिंबी

पोपटी

राणी

करडा

भुरा

कबरा

पिवळा

निळा

बदामी

गुलबाक्षी

जांभळा

हिरवा

शेवाळी

गुलाबी

मेंदी

चटणी

खाकी

भगवा

पिस्ता

अबिरी

गव्हाळी

पांढरा

पिरोजी

आणखी एक महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे ह्या रंगांच्या प्रत्यक्ष छटा आणि शब्द ह्यांच्या जोड्या जुळवण्याचे. तो खरा दस्तऐवज होईल. ह्या आणि  ह्या संकेतस्थळावर इंग्लिशसाठी असे काम केलेले दिसेल. मराठीसाठी असा प्रयत्न ह्या संकेतस्थळावर केलेला आढळतो पण त्यासाठी जाणकार मराठी भाषकांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे . अर्थात संगणकीय प्रणालींच्या मर्यादा विचारात घेता ह्या छटा किती नेमकेपणाने दिसतात हा प्रश्न आहेच. रंगछटांचे वर्णन करणारे शब्द कसे तयार होतात आणि त्यांचे अर्थ कसे होतात ह्याचे विवेचन जिज्ञासूंना ह्या संकेतस्थळावर पाहता येईल.

 

संपादक : जग रंगांनी भरलेलं आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात दिसणारी शहरी दृश्यं आणि त्यांना जिवंतपणा देणारे रंग कागदावर कसे उतरवावे हे सोप्या प्रात्यक्षिकासह शिकायचं असेल तर इथे क्लिक करा.

हा लेख इतरांना पाठवा

अनिल पेंढारकर

मी एक शब्दमजूर आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये मी लेखन करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *