अभिनंदन! चीनला ॲप झालंय!

भारतीयांनी उत्पादनासकट इतर अनेक क्षेत्रांमध्ये आता आत्मनिर्भर व्हायला हवं.

केवळ भारतच नव्हे, तर उर्वरित जगसुद्धा अनेक गोष्टींसाठी आजही चीनवर अवलंबून आहे.

चीनच्या मक्तेदारीला आव्हान देणं सोपं नव्हे.

चीनी मालाला भारतीय पर्याय उपलब्ध व्हायलाच हवेत.

तत्पूर्वी, नेमका चीनचा माल कोणता, हे तरी आपण ओळखायला हवं ना!

या लेखात आपण मोबाईल ॲपपुरतं बोलूया.

एखादं नवं ॲप लोकांना आवडू लागलं, तर सर्वप्रथम ते चीनी तर नाही ना, याची खातरी करून घ्यायला हवी.

असं करण्यामागे अनेक कारणं आहेत.

भारत चीनमधील तणावाचे संबंध हे एक प्रमुख तात्विक कारण तर आहेच, पण त्यासोबतच सुरक्षाविषयक प्रश्नही आहेत.

 

कोणे एके काळी ‘एकाहून जास्त पोरं होता कामा नये’ असे अचाट नियम काढणाऱ्या चीन देशात ॲप्स मात्र भसाभसा जन्माला येत राहतात.

खाली एक यादी देतोय, त्यात दिलेलं प्रत्येक ॲप चीनमध्ये जन्माला आलंय, आणि अजूनही चीनच्याच मालकीचं आहे.

या यादीत सतत भर पडत राहील, कारण चीनी ॲप्स अगणित आहेत.

 

टिकटॉक –

चीन टिकटॉक ॲप

टिकटॉक हे बाइटडान्स या चीनी कंपनीचं ॲप आहे.

अतिशय कमी वेळात जगभरात आणि विशेषत: भारतामध्ये लोकप्रिय झालेल्या ॲप्सपैकी टिकटॉक हे एक ॲप आहे.

या ॲपच्या निमित्ताने समाजात अनेक वाद आणि प्रश्न निर्माण झाले आहेत.

लहान वयांच्या मुलांकडे लैंगिकदृष्ट्या पाहणारे चमडी लोक टिकटॉकचा दुरुपयोग करतात, इथपासून ते चीनच्या कम्युनिस्ट सरकारवर टीका करणारे व्हिडिओ या ॲपमार्फत काढून टाकण्यात येतात इथपर्यंत अनेक प्रकारचे वाद टिकटॉकसंदर्भात पाहायला किंवा वाचायला मिळतात.

बाइटडान्स कंपनीचं दुसरं एक ॲप चीनच्या सरकारने स्वत:वरील टीका थांबवण्यासाठी बंद पाडलं आहे. तसं पुन्हा होऊ नये म्हणून टिकटॉकवर चीनच्या सरकारवर टीका करणारे व्हिडिओ टिकू दिले जात नाहीत.

या ॲपच्या माध्यमातून अनेक प्रकारचे मूर्खासारखे आणि क्वचित समाजविघातक ‘ट्रेंड्स’ उपटत असतात. टपोरी आणि छपरी लोकांना तर हे ॲप खूपच आवडतं.

हे ॲप का वापरू नये हे सविस्तार सांगणारा हा लेख वाचा

पबजी मोबाईल –

चीन ॲप पबजी

लहान मुलांपासून वीशीतल्या तरुणांपर्यंत सर्वांना अक्षरश: वेड लावून मोबाईलवर खिळवून ठेवणारं ॲप म्हणजे पबजी मोबाईल.

पबजी मोबाइल या खेळात शंभर खेळाडू एका ठिकाणी एकत्र येतात.

खेळाचं लक्ष्य हे की तुम्ही इतर नव्याण्णव जणांना टपकावून स्वत: शेवटपर्यंत जिवंत राहायचं.

एका विमानातून पॅराशूट घेऊन तुम्ही अमुक एखाद्या बेटावर उडी मारता. तुमच्याबरोबर आणखी नव्याण्णव लोकही उड्या मारतात.

मग तुम्ही शोधाशोध करून शस्त्रास्त्रं मिळवायचीत आणि एकमेकांना मारून त्यांच्याकडे असलेलं सामान लुटायचं असं एकूण या खेळाचं स्वरूप असतं.

या ॲपची निर्माती कंपनी टेन्सन्ट ही एक चीनी कंपनी आहे.

 

युसी ब्राऊझर –

चीन ॲप युसी ब्राऊझर

नाव वाचूनच लक्षात येतं की हा एक इंटरनेट ब्राऊझर आहे.

युसीवेब नावाच्या कंपनीने विकसित केलेला हा मोबाइल ब्राऊझर भारतात बऱ्यापैकी लोकप्रिय आहे आणि चांगलाच स्थिरस्थावर झालेला आहे.

फीचर फोन्सच्या जमान्यात डेटा वाचवणारा ब्राऊझर म्हणून युसी ब्राऊझर चटकन लोकांनी उचलून धरला. आजतागायत त्याची लोकप्रियता टिकून आहे.

युसी ब्राऊझरमध्ये सुरक्षेसंदर्भात आणि गोपनीयतेसंदर्भात अनेक समस्या आहेत.

त्याची रचना गूगल प्लेच्या धोरणांविरोधात आहे.

या समस्या अद्यापही तशाच ठेवलेल्या असूनही हा ब्राऊझर अजूनही गूगल प्लेमधून डाऊनलोड करता येऊ शकतो हे आश्चर्य!

 

हेलो

चीन ॲप हेलो

युट्युब किंवा इतर ॲप्सवर अधनं मधनं ज्या गलिच्छ जाहिराती दिसत असतात त्या या हेलो ॲपच्या.

फोटो, व्हिडिओ वगैरे शेअर करा, चॅट करा अशा नेहमीच्या सोयी या ॲपवर आहेत.

दहा कोटींहून जास्त लोकांनी डाऊनलोड केलेलं हे ॲप खास भारतीयांना डोक्यात ठेवून विकसित केलेलं आहे.

२०१९ मध्ये निवडणुकीच्या हंगामात, हेलो ॲपमार्फत फेसबुकवर ११००० हून जास्त राजकीय जाहिराती छापल्या गेल्या होत्या. फेसबुकने त्या सगळ्या काढून टाकल्या.

हे ॲपसुद्धा बाइटडान्स कंपनीचंच आहे.

 

शेअर इट

हे ॲप तुम्ही कधी ना कधीतरी वापरलेलं असेलच.

मित्राकडून लांबलचक व्हिडिओ घ्यायला, एखादं ॲप स्टोरवर सहज न मिळणारं ॲप घ्यायला शेअर इट तुम्ही वापरलं असेल.

कधी वापरलं नसलं तर समजून जा नावावरूनच.

छोटे मोठे व्हिडिओ, गाणी, जीआयएफ, ॲप्स असं काय वाट्टेल ते एका मोबाइलमधून जवळच्या दुसऱ्या मोबाइलवर पाठवता येतं.

त्यासाठी मोबाइल डेटा खर्च करायला नको.

हे ॲप चीनी आहे. शेअरइट टेक्नॉलॉजिस्‌ या चीनी कंपनीनं २०१३ साली हे ॲप सुरु केलं होतं.

सुरुवातीला तर हे ॲप खूप गाजलं. आता अंबानीकृपेमुळे भारतीयांसाठी डेटा म्हणजे कस्पटासमान होऊ लागलाय.

त्यामुळे हे ॲप किती काळ बाजारपेठेत टिकेल हा प्रश्नच आहे.

त्यात जाहिरातींचा भडिमार करून वापरणाऱ्यांचा रोष ओढावून घेणंही पथ्यावर पडणार नाहीये.

जर तुम्ही कधीकाळी शेअरइट घेऊन ठेवलं असेल पण आता फारसं वापरत नसाल तर कशाला फोनमधली जागा उगाच भरून ठेवताय!

 

कॅमस्कॅनर

तुमच्याकडे कॅमस्कॅनर ॲप असेल तर ते किती उपयोगी आहे याबद्दल कदाचित तुमचं दुमत नसेल.

कोणताही दस्तऐवज स्कॅन करायचा असेल तर झेरॉक्सवाल्याच्या दुकानात जाऊन किंवा घरातला स्कॅनर सुरु करून त्यात तो कागद घुसवून स्कॅन करत बसण्याची खटपट आता करायला नको.

कॅमस्कॅनर ॲप काहीही मस्त स्कॅन करतं.

पण अरेरे! एकतर हे ॲप चीनी आहे, दुसरं म्हणजे या ॲपमध्ये एक सुरक्षाविषयक घोळ होता. त्यामुळे हॅकरना तुमच्या फोनचा ताबा घेता येऊ शकायचा आणि फोन वापरताना वाटेल त्या जाहिराती उपटायच्या. गूगलने हे ॲप म्हणून प्ले स्टोरवरूनही काढलं होतं.

आता सप्टेंबर २०१९ मध्ये प्रसृत केलेल्या नवीन आवृत्तीत म्हणे हा घोळ निस्तरलाय.

पण नवे घोळ उपटणार नाहीत याची काय शाश्वती? शेवटी चीनी मालाचा काय भरवसा!

अडोबे स्कॅन हा कॅमस्कॅनरला एक पर्याय आहे.

 

ही यादी संपलेली नाही. या लेखात सतत अद्यतन होत राहील. तुमच्या माहितीतही जी जी चीनी ॲप्स असतील, त्यांच्याविषयी आम्हाला नक्की कळवा.

चीनबद्दलचे इतर लेख वाचा :

ड्रॅगन सर्व संस्कृतींमध्ये असूनही चीनमध्ये ड्रॅगनला एवढा भाव का आहे?

चीनमधली डुकरं मेल्याने हेपॅरिनचा तुटवडा

चीनच्या इतिहासात नोंदवलेलं पहिलं युद्ध

चीनची आणखी एक भव्य भिंत

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *