चीनची आणखी एक भव्य भिंत

चीन देश हा नेहमी काहीतरी अतरंगी आणि अचाट उचापत्या करण्यासाठी नावाजला जातो. विशेषत: त्यांच्या वेगवेगळ्या इमारती आणि बांधकामं तर खूपच फूटेज खातात. ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’, म्हणजेच ‘चीनची भव्य भिंत’ हा त्यातलाच एक, आणि अगदी जुना नमुना! कोणी म्हणे ही भिंत अगदी अवकाशातूनही दिसते (जे खरं नाहीये). ही भिंत मुळात मंगोल टोळ्यांपासून स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी म्हणून बांधण्यात आली होती.

फोटो स्रोत : pixabay.com

पण नुसती एक भलीमोठी भिंत बांधून स्वस्थ बसले तर ते चीनी कसले! म्हणून आता ते आणखी एक भिंत बांधतायत. पण यावेळी ही भिंत मंगोलांपासून बचाव करण्यासाठी नाही. ती आहे वाळवंटांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी. झालंय काय, की चीनच्या उत्तरेला गोबी नावाचं वाळवंट पसरलंय. १३ लाख चौरस किलोमीटर व्यापलेलं हे विस्तीर्ण वाळवंट जगातलं पाचवं सगळ्यांत मोठं वाळवंट आहे. या वाळवंटाचा स्वभावही बाकी वाळवंटांसारखाच आहे – उठता बसता धुळीची वादळं उठत असतात. आणि त्यात ते चीनचं वाळवंट असल्याने त्यांच्याचसारखं विस्तारवादी सुद्धा आहे. चीनच्या शक्य तेवढ्या जमिनीला व्यापून टाकायचा या वाळवंटाने चंगच बांधलाय. दरवर्षी धुळीची वादळं ३,६०० चौरस किलोमीटर भाग नव्याने व्यापून टाकतात. त्यात आधीपासून चीनने शेती आणि खाणकामासाठी झाडतोड केल्याने या वाळवंटाचं चांगलंच फावतंय.

झिनजिआंग प्रांतातील वाळवंट
फोटो स्रोत : pixabay.com

हे वाळवंट असं वाढत जाणं फक्त चीनच्याच नव्हे, तर एकूणच आशियाच्या दृष्टीने पंचाईत ठरण्यासारखं आहे. या वाळवंटामुळे गरमागरम वारे वाहून तापमानात नसती भर पडत असते. त्यामुळे त्याला आटोक्यात आणणं आवश्यक आहे. आणि चीनी लोकांनी आपल्या स्वभावाला जागून एक भव्यदिव्य उपाय अंमलात आणायला सुरुवात केलेली आहे.

हा उपाय म्हणजे – ‘द ग्रेट ग्रीन वॉल ऑफ चायना’, मराठीत ‘चीनची भव्य हिरवी भिंत’. आणि हा उपक्रम काही नवा नव्हे. १९७८ मध्ये चीन सरकारने हा हाती घेतलाय. तर ही हिरवी भिंत उभारायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर वाळवंटाच्या ४,५०० किमीच्या क्षेत्रफळात १०० अब्ज झाडं लावायची.

१०० अब्ज म्हणजे काय खाऊ झाला? पण चीनला काहीच अशक्य नसतं बुवा! एव्हाना त्यांची ६६ अब्ज झाडं लावून झालेली आहेत. साधारण अडतीस-चाळीस वर्षांच्या अवधीत ६६ अब्ज झाडं म्हणजे वर्षाला सरासरी १ अब्ज आणि ७०-७५ कोटी झाली की! हे कसं बरं साध्य केलं चीनने? झाडं-झुडुपं लावणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसं दिली.

एका अभ्यासातून असं पुढे आलंय की या द्राविडी प्राणायामाचे चांगले सकारात्मक परिणाम पुढे येतायत. बीजिंगमधील ‘भौगोलिक विज्ञान व नैसर्गिक संसाधन संशोधन संस्थेच्या’ मिंगहाँग टॅन यांनी हा अभ्यास केलाय आणि ते तर समाधानी आहेत. ते म्हणतात की हिरवळ वाढलीये, आणि इतर प्रदेशांच्या तुलनेत भव्य हिरवी भिंत बांधलेल्या परिसरांत धुळीच्या वादळांचं प्रमाण कमी झालंय. २००९ साली चीनचं एकूण वनक्षेत्र १२% वरून १८% वर गेलं.

पण लिउ तुओ, किंवा जो काही त्यांच्या नावाचा उच्चार असेल तो, यांचं वाळवंटाने खाऊन टाकलेला भाग परत मिळवण्यातल्या देशाच्या प्रयत्नांनी समाधान झालेलं नाही. हे महाशय म्हणतात की ज्या दरानं काम चालू आहे, त्याने तर ३०० वर्षं लागतील गेलेला भाग परत मिळवायला!

ऐकून-वाचून जामच भारी वाटतं ना आपल्याला? पण गोष्टी एवढ्या सोप्या नसतात. गंमत अशी झाली, की जसे प्रत्येक बदलाच्या नावाने नाकं मुरडणारे असतात तसे याही बद्दल बोलणारे निघाले. आणि जसं आपल्याला इच्छा नसूनही त्यांचं म्हणणं विचारात घ्यावं लागतं तसं या नाकं मुरडणाऱ्यांचंही विचारात घेण्यासारखं आहे. कारण बिकट समस्येवर सरसकट साधासोपा वाटणारा उपाय काढला की नसत्या अडचणी निर्माण होतात.

अलाबामा विद्यापीठाचे डेव्हिड शंकमन यांच्या म्हणण्यानुसार ही झाडं टिकतील याची काहीच खातरी नाही. धपाधप लावत सुटलेत झाडं पण त्यांचा मृत्युदर काय आहे? मेल्यावर काय होतं त्यांच? आणि या नव्या झाडांमुळे तिथल्या मूळच्या गवतावर आणि झुडुपांवर काय परिणाम होतो? कारण ती खरी त्या परिस्थितीत दुष्काळात टिकणारी, आणि मातीची धूप जास्त प्रभावीपणे रोखू शकणारी असतात.

बीजिंग फॉरेस्ट्री विद्यापीठाचे चाओ शीझिअँग यांच्या अनुमानानुसार, १९४९ पासून चीनच्या कोरड्या प्रदेशांत लावलेल्या झाडातली फक्त १५% च टिकून आहेत, आणि बहुतेक झाडं वय वाढून मरतात.

२००९ साली ५३,००० हेक्टरवर लावलेल्या झाडांमधली एक चतुर्थांश मेली. त्याआधी २००८ मध्ये हिवाळ्यातल्या वादळांमुळे आणखी १०% नष्ट झाली होती. शेवटी जागतिक बँक चीनला म्हणाली, भाऊ, जरा आरामात, संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्यावं माणसानं (बघा, ‘चायना माला’चा बरावाईट अनुभव आलेल्यांच्या दु:खाला वाचा फुटली ती अशी!)

बरं नुसती झाडं मेल्याने लोचा होणार नव्हता, ती जगली तरीही लफडी होणारच होती. आधीच तो प्रदेश एवढा नापीक, त्यात तिथे नव्याने लावलेल्या झाडांनी मुळं धरली तर भूजल पातळी आहे त्याहून जास्त खालवणार – आणि ती खालवलीच! प्रकल्प १९७८ पासून सुरु आहे, त्यामुळे आत्तापर्यंत १२ ते १९ मीटरपर्यंत भूजल पातळी खालावलेली आहे. झाले ना तिथल्या लोकांचे वांदे!

एकूण काय, तर एवढे अपार कष्ट घेऊन वर चीन शिव्याच जास्त खातोय. कोण म्हणतं घाई करा, जास्त झाडं लावा, कोणी म्हणतं घाई करू नका! कोणी संपूर्ण प्रकल्पालाच मोडीत काढतं.

असो. आपण यातून काय बरं बोध घ्यावा?

‘अति घाई संकटात नेई!’

‘प्रकल्प अचाट आहे म्हणजे चांगलाच निपजेल असं काही नाही – बिग बजेट सिनेमे फ्लॉप जातातच की!’

‘झाडं लावली तर ती टिकवायलाही हवीत.’

‘कोणती झाडं कुठे कशी लावायची याचा नीट अभ्यास करावा.’

हे सगळं लक्षात न घेता कामं केली की ‘करायला गेलो एक…’ अशी परिस्थिती उद्भवते.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *