पुस्तक परिचय – कालागढच्या अभयारण्यात

वाचनाची आवड मला लहानपणापासूनच. पण अंगात प्रचंड आळस मुरलेला असल्याने लहानपणी व्हायला हवं तितकं वाचन झालं नाही. आता सहज हाताला लागलं ते पुस्तक वाचायला घेतलं आणि नेमकी लहान मुलांची गोष्ट निघाली. म्हटलं काय हरकत आहे? पुन्हा लहान होऊन वाचूया.

लहान असताना एका गोष्टीचा राग यायचा. मोठ्या माणसांसाठीच्या पुस्तकांत अक्षरं छोटी आणि गिचमिडीत लिहिलेली असतात. प्राथमिक शाळेत आमच्या बाई एका ओळीत पाचच शब्द यायला हवेत असं म्हणायच्या. लिहिताना एवढे नियम मग छापताना एवढी गर्दी का? आणखी एक न आवडणारी गोष्ट म्हणजे मोठ्यांच्या पुस्तकांत मुखपृष्ठ सोडलं तर आत चित्रंच नसतात. नुसती शब्दांची लांबच लांब रांग लागलेली असते. लहान मुलांसाठीची पुस्तकं कशी, मोठ्या अक्षरांची, सुटसुटीत अंतर राखणाऱ्या शब्दांची आणि भरपूर चित्रांची असतात. कोणतंही पुस्तक उघडलं, की आधी ते चाळून त्यामध्ये चित्रं किती आहेत हे पाहायची माझी सवय होती. मोठा झाल्यावर ती सवय मोडली. फारच पकाऊ ठरतोय हा ‘मोठेपणा’!

प्रतिमा – ज्योत्स्ना प्रकाशन

दॅट समर अॅट कालागढ’ या रणजित लाल यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद ज्योत्स्ना प्रकाशनानं २००३ साली पहिल्यांदा छापला. ‘कालागढच्या अभयारण्यात असं छान नाव दिलं. अनुवाद कोणी केला त्याचं मात्र नाव पुस्तकावर दिसत नाही. इंटरनेटवर शोधून पाहिलं तरी मिळेना. एवढी सुरेख अनुवादशैली असणाऱ्या लेखकाचं नाव कळू नये याचं मला खूप वाईट वाटलं. समजायला अतिशय सोपे असणारे, म्हटलं तर साधेसुधे आणि नेहमीचे वाटणारे, पण गेल्या कित्येक वर्षांत मी न म्हटलेले किंवा ऐकलेले कितीतरी शब्द या लहान मुलांसाठीच्या पुस्तकात मला वाचायला मिळाले. गोष्टीतली क्रियापदं, विशेषणं ज्या पद्धतीनं वापरली आहेत, ती अनुभवून हा अनुवाद नव्हेच, अशीच मी स्वतःची समजूत करून देत होतो.

गोष्ट आहे चार मुलांची. खरं तर, त्या चार मुलांमधल्या बारा वर्षांच्या एका जाडजूड मुलीची. या मुलीला हत्तींबद्दल असणाऱ्या विशेष ओढीची. सुरुवातीला लहान मुलांची मस्ती आणि त्यांना येणाऱ्या थरारक अनुभवांची ही मजेशीर गोष्ट असावी, असं वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात मोठ्या माणसालाही जमणं अवघड असणाऱ्या कृती रंजक गोष्टींमध्ये लहान मुलं खूपदा करताना दिसतात. तसे या गोष्टीत त्यांना येणारे अनुभव थरारकच असतात, पण निव्वळ एकशे दोन पानांची ही गोष्ट संपता संपता जे वळण घेते ते वाचून गोष्टीचा अख्खा सूर पालटतो, आणि आपण या इटुकल्या पिटुकल्या गोष्टीच्या प्रेमात पडतो.

या अभयारण्यात ही मुलं सहलीसाठी येतात. सहल सुरु असताना आजुबाजूच्या परिसरात पूर्ण गुंग होऊन जातात. बाकी पूर्ण वेळ एकमेकांच्या खोड्या काढण्यात घालवतात. ही गोष्ट २००३ ची. आज जर अशीच गोष्ट लिहायची वेळ आली, तर ती खरी वाटावी यासाठी घरातून निघताना सेल्फी, जंगलात पोहोचल्यावर सेल्फी, झऱ्याजवळ आल्यावर सेल्फी, हत्तीवर बसल्यावर सेल्फी असे सगळे चाळे केल्याशिवाय ती गोष्ट ‘वास्तववादी’ वाटायची नाही.

एखादा क्षण टिपण्यात वेळ दवडून तो जगायचं विसरून जाणारी पिढी आपली. असं नाही की आपल्याला मजा करता येत नाही, पण काळाच्या ओघात विसरतो आपण. जगावं कसं, हे पुन्हा पहिल्यापासून शिकून घ्यायची गरज आहे आपल्याला. आणि या शिक्षणाचा श्रीगणेशा ‘कालागढच्या अभयारण्यात’ या पुस्तकापासून करायला काहीच हरकत नाही.

हे पुस्तक इथे विकत मिळेल.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *