लाल मंगळावरचा निळा सूर्यास्त

पृथ्वीवरच्या मानव नावाच्या प्राण्याने भरमसाट द्राविडी प्राणायाम करून अवकाशात पाठवलेल्या यंत्रांमुळे आपल्याला अवकाशाबद्दल बरीच नवनवीन माहिती मिळत राहते. त्यात पृथ्वीच्या जवळच असलेल्या मंगळ ग्रहाविषयी तर माणसाला कोण कौतुक!! अगदी लहानपणापासूनच मंगळावर राहणाऱ्या विचित्र तोंडाच्या एलियनच्या गोष्टी ऐकता ऐकता मनात या ग्रहाबद्दल बरंच औत्सुक्य घर करून बसलेलं असतं. रात्री बोट दाखवून आकाशातले ग्रह तारे ओळखायचे झाले की जो ग्रह सगळ्यांत तेजस्वी दिसतो तो शुक्र आणि जो लालबुंद ठिपका असतो तो म्हणजे मंगळ हे मनावर पक्कं बिंबवलेलं असतं. मंगळ ग्रहावरच्या खडकांमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर आहे. हे लोह गंजून त्याचे कण वातावरणात विखुरतात. वादळवारा, ज्वालामुखी आणि अलिकडच्या पुराव्यानुसार मंगळावर पूर्वी असलेल्या पाण्यामुळे हे कण मंगळ ग्रहावर सर्वदूर पसरलेले आहेत. सुकलेल्या ज्वालारसात बेसॉल्टचं प्रमाण भरपूर आहे. जवळ जाऊन पाहिलं, तर मोजक्या ठिकाणच्या खनिजांमुळे मंगळाच्या बऱ्याच पृष्ठभागांवर सोनेरी, तपकिरी आणि हिरवट छटाही दिसून येतात. पण दादागिरी म्हणावी तर लाल रंगाचीच आहे.

साम्राज्यवादी मानवाला पृथ्वी पुरेना म्हणून एक दिवस या मंगळावर जाऊन वसाहती करायचा आपला बेत आहे. यासाठी अमेरिका, भारत, चीन, रशिया असे विविध देश आणि स्पेस एक्स सारख्या खासगी कंपन्या आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. स्पेस एक्स कंपनी २०२४ साली, तर नासा २०३० साली माणसाला मंगळावर पाठवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. भारताने तर २०२२ सालीच मंगळावर माणूस पाठवण्याची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या उपक्रमाचं नेतृत्व व्ही. आर. ललितांबिका यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे.

फोटो स्रोत : pixabay.com

बरं मंगळावर माणूस सुखरूप पोहोचला, तरी तिथे राहणं सोपं असेल का? अजिबात नाही!! HI-SEAS (Hawaii Space Exploration Analog and Simulation) या उपक्रमाअंतर्गत हवाईमधील मौना लोआ या सुप्त ज्वालामुखीलगत २०१५ साली सहाजण जाऊन मंगळावरील परिस्थितीसदृश अवस्थेत वर्षभर राहून आले. मंगळ ग्रहावर असताना त्यांच्यावर ज्या ज्या मर्यादा येतील, तशा सर्व प्रकारच्या मर्यादांमध्ये त्यांना राहावं लागलं होतं. बाहेरच्या जगाशी फक्त ईमेलद्वारेच संपर्क साधायचा, आणि हे ईमेल इच्छित माणसाला २० मिनिटं उशिरा पोहोचणार अशी व्यवस्था करून ठेवली होती (कारण मंगळ ग्रहावरून पाठवलेला संदेश पृथ्वीवर पोहोचायला तेवढाच वेळ लागेल). त्यांना तिथे जगायला जे काही हवं ते स्वत:सोबत आणायचं होतं. अगदी थातूर मातूर गोष्टीसुद्धा. अन्नपाणीसुद्धा मर्यादित होतं. ते ज्या तंबूत राहात होते, त्यातून बाहेर पडायचं असेल तर अंतराळवीराच्या जड पोशाखातच बाहेर पडावं लागायचं. मंगळावर राहात असताना अचानक काहीतरी गडबड होऊन ज्या ज्या प्रकारची संकटं किंवा गैरसोयी उद्भवू शकतात, तशी शक्य तितकी संकटं मुद्दामहून तयार केली गेली. अर्थातच प्रत्यक्ष मंगळ ग्रहावरची परिस्थिती याहूनही भयानक असेल.

पण या आणि अशा सगळ्या अडचणींवर मात करून जर माणूस भविष्यात खरोखर मंगळावर राहायला लागला, तर त्याने अनुभवण्यासारखी एक सुंदर आणि आल्हाददायी गोष्ट असेल, ती म्हणजे मंगळावरचा सूर्यास्त.

 

फोटो श्रेय: NASA/JPL-Caltech/MSSS/Texas A&M Univ.

नासाने २०११ साली गाडीच्या आकाराचा क्युरिऑसिटी रोव्हर मंगळावर पाठवलेला आहे. सुरुवातीला २ वर्षांपुरता पाठवलेला क्युरिऑसिटी रोव्हर अजूनही मंगळावर माहिती गोळा करत असतो. तिथल्या गेल कुंडावर राहणाऱ्या या रोव्हरने जी सूर्यास्ताची क्षणचित्रं टिपली, त्यातून दिसून आलं की मंगळावर सूर्यास्त होताना मावळत्या सूर्यासकट त्यासभोवतालचं आकाश केशरी दिसण्याऐवजी निळसर दिसतं. आणि गंमत अशी, की हे फोटो काढणाऱ्या रोव्हरच्या कॅमेऱ्याला माणसाच्या डोळ्याच्या तुलनेत निळा रंग जरा कमीच दिसतो. म्हणजे आपण जर हा सूर्यास्त याची देही याची डोळा पाहू शकलो, तर तो आपल्याला जास्त निळा आणि त्यामुळेच जास्त भन्नाट दिसेल.

पण मंगळावरचा सूर्यास्त निळा का दिसतो?

मंगळावरच्या हवेतल्या धुळीत एवढे अति बारीक बारीक कण असतात की मंगळाच्या वातावरणातून निळा रंग जास्त सहजपणे आत शिरू शकतो. कारण निळ्या रंगाची तरंगलांबी (व्हेवलेंग्थ) इतर रंगांपेक्षा, विशेषत: लाल आणि पिवळ्या रंगांपेक्षा खूप कमी असते. कणांचे आकार जेवढे लहान, तेवढं ते छोट्या तरंगलांबीच्या रंगांचं जास्त विकिरण करतात. ठरावीक कण प्रकाशाच्या विशिष्ट तरंगलांबीचं विकिरण जास्त प्रभावीपणे करू शकतात तेव्हा त्याला ‘विशिष्ट विकिरण’ किंवा ‘रेली विकिरण’ म्हणतात. पृथ्वीवरही ऑक्सिजन आणि नायट्रोजनसारखे लहान आकाराचे रेणू हवेत असल्याने दिवसा आपल्याला आकाश निळं दिसत असतं. मंगळावर धुळीचे कण एवढे बारीक असतात की भर दिवसा सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाचा निळा रंग सूर्याजवळ जास्त दिसतो, आणि लाल आणि पिवळा हे रंग उर्वरित आकाशात पसरलेले असतात. तर सूर्यास्ताच्या वेळी सूर्याजवळचा भाग जास्तच निळाशार दिसतो.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *