आंबा खाण्याचे हे फायदे वाचा आणि प्रसन्न व्हा

आंबा खाण्यासाठी खरं तर निमित्तांची गरज नाही. लोक गेली कैक हजार वर्षं आंबा खातायत. छान पिकलेला आंबा दिसला, की त्याची सालपटं काढून तो अख्खा खाऊन टाकायचा, किंवा मस्तपैकी पिळून त्याचा आमरस करून गरमागरम फुलक्यांबरोबर खायचा हा आपला ठरलेला शिरस्ता असतो.

 

तरी पुढच्या वेळी आंबा खाताना मनाला आणखी प्रसन्न वाटावं म्हणून आंबा खाण्याचे काही फायदे इथे मांडतोय, वाचून घ्या.

 

पण आधीच सांगतो : इथे मांडलेली माहिती योग्य स्रोतांकडून गोळा करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असला, तरी तिच्या योग्यायोग्यतेची जबाबदारी बरणी स्वीकारत नाही. इथे मांडलेली आरोग्यविषयक माहिती केवळ सूचक स्वरूपात स्वीकारावी. ती कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय ठरू शकत नाही. अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

आंबा खाल्ल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते :

 

आंबा हे तसं पौष्टिक फळच वाटतं. आंबा खाऊन माणूस धष्टपुष्ट होत नसला तर नवलच, नाही का? पण खरंच आंबा खाऊन वजन कमी करायला मदत होते.

आंब्यामध्ये दर ग्रॅममागे फक्त ०.६ कॅलरी असतात. म्हणून आंबा कमी घनता असलेलं फळ मानलं जातं.

वाटीभर आंब्यामध्ये (साधारण १६५ ग्रॅम) मेद फक्त ०.६ ग्रॅम एवढंच असतं, तर तंतूंचं प्रमाण २.६ ग्रॅम एवढं असतं.

तंतूंचं प्रमाण जास्त असणं हेसुद्धा वजन कमी करण्यासाठी उत्तमच. कारण तंतूमय पदार्थ खाऊन पोट भरल्यासारखं वाटतं आणि स्निग्ध आणि कर्बोदकांचं शोषणही कमी होतं.

 

आंबा खा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा :

आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी क जीवनसत्त्व आवश्यक असतं. पांढऱ्या पेशी तयार करायला ते आपल्या शरीराला मदत करतं. पाण्यात विरघळणारं हे पोषक द्रव्य लोह शोषण्यास आपल्या शरीराला मदत करतं, शरीराच्या वाढीलाही मदत करतं.

एखादं पोषक द्रव्य निरोगी माणसानं दिवसातून किती प्रमाणात घ्यावं याबाबत काही सूचना केल्या जातात. प्रत्येक पदार्थाचं शरीराला आवश्यकतेनुसार एक साधारण प्रमाण ठरवलं जातं.

उदाहरणार्थ, धूम्रपान न करणाऱ्या प्रौढ पुरुषानं दिवसातून ९० मिग्रॅ एवढं क जीवनसत्त्व मिळवावं, तर स्त्रीनं ७५ मिग्रॅ एवढं क जीवनसत्त्व मिळवावं असं सुचवलं जातं. (गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांसाठी हा आकडा आणखीन जास्त असतो.)

वाटीभर (१६५ ग्रॅम) आंब्यातून क जीवनसत्त्वाची साधारण ६७% गरज पूर्ण होते.

आंब्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात : मँगिफेरिन, काटेचिन्स, क्वेरसेटिन, केम्पफेरॉल, ऱ्हाम्नेटिन, अँथोसायनिन्स, गॅलिक आणि इलॅजिक ॲसिड्स, प्रोपाइल आणि मिथाइल गॅलेट, बेन्झोइक ॲसिड, आणि प्रोटोकॅटेचुइक ॲसिड.

या तुमच्या लक्षात न राहणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे पेशींना अपाय होण्यापासून संरक्षण मिळतं. यातल्या मँगिफेरिनमुळे (किंवा मँजिफेरिन, जो उच्चार आवडेल तो) कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा प्रतिकार करायला मदत होऊ शकेल अशा आशा प्राण्यांवर केलेल्या अभ्यासांमधून व्यक्त होतायत.

 

आंबा ठरतोय हृदयाचा मित्र :

रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांमध्ये हृदयरोग बळावण्याची शक्यता बरीच असते.

एका अभ्यासात रजोनिवृत्ती झालेल्या २४ निरोगी स्त्रियांना सलग दोन आठवडे आंबे खायला दिले. त्यानंतर १३ दिवस त्यांच्यावर आंबा खाण्यावर निर्बंध आणले.

या काळातल्या त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांचा दर, रक्तदाब, यांच्या नोंदी आणि रक्ताचे नमुने, श्वासोच्छवासाचे नमुने घेतले गेले.

ज्या दोन आठवड्यांत या बायकांनी आंबे हादडले, त्या काळात त्यांचा सरासरी रक्तदाब आणि नाडीवरचा दाब कमी झालेला आढळला.

यामुळे आंबा खाणं हृदयाच्या तब्येतीसाठी खूप चांगलं ठरू शकतं हे दिसून आलं.

यात ब६ (किंवा बी६) जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची ठरते. ते रक्तातल्या होमोसेस्टिनाचं प्रमाण संतुलित ठेवतं आणि हृदयरोगाचा धोकाही कमी करतं.

 

पचनाला मदत आणि बद्धकोष्ठावर इलाज :

आंब्यामुळे आतड्याचं आरोग्य सुधारतं. आतड्याची जळजळ कमी व्हायला आंब्यामुळे मदत होते.

एका अभ्यासांतर्गत दीर्घकाळ बद्धकोष्ठ झालेल्या ३६ प्रौढांना चार आठवडे आंबे खायला दिले गेले. आणि काय सांगावे! तयांनी सुख अनुभविले!

 

आंबा त्वचेसाठी अतिउत्तम :

आंब्याचा रस, अर्क आणि अगदी सालसुद्धा त्वचेसाठी चांगली असते.

आंब्याचा गुठळ्या फोडलेला रस त्वचेवर चोळून पाच दहा मिनिटं तसाच ठेवा, मग धुवून काढा आणि त्वचा टिपून घ्या. मुरुमं आणि पुळ्या होणार नाहीत.

रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा रस – आत्ताच घरी मागवा

आंब्यात असलेली वेगवेगळी जीवनसत्त्वं – अ, ब, क, ई, के (C साठी क वापरल्यावर K साठी आणखी काय वापरावं हा प्रश्नच आहे), आणि तांबं, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, बीटा केरोटीन, हे सगळे आपल्या त्वचेसाठी चांगले असतात.

वर ज्या मँगिफेरिनचं कौतुक केलंय तेसुद्धा त्वचेसाठी खूप उत्तम असतं. आंबा खाल्ला की चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही फारशा वाढत नाहीत.

मऊ मुलायम त्वचेसाठी आंब्याचे फेस पॅक कसे करावे ते इथे वाचा (इंग्रजीत आहे).

 

सिलिका संपन्न फळ :

आंब्यात सिलिका हे खनिजद्रव्य मुबलक प्रमाणात असतं, जे केसांसाठी, स्नायूंसाठी, हाडांसाठी आणि दातांसाठी खूप चांगलं असतं. त्यांना ते रचनात्मक आधार देतं.

आहारातलं फक्त ४०% सिलिका शरीरात शोषलं जातं.

वय वाढतं तशी शरीराची सिलिका शोषण्याची क्षमता कमी कमी होत जाते. म्हणून आंब्यासारखे सिलिका संपन्न पदार्थ खाणं आणखीन आवश्यक होऊन बसतं.

 

पुढच्या वेळी फळांच्या या राजाचा आस्वाद घेत असाल, तेव्हा मनोमन कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका.

 

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *