सोन्यासारखी भावंडं – आपटा आणि कांचन । वनी वसे ते…

दसरा म्हटलं की आपल्याला आठवतात ती झेंडूची फुलं, आंब्याची पानं, धुवून पुसून ठेवलेल्या गाड्या, सरस्वती आणि शस्त्रास्त्र पूजा आणि अर्थात, आपट्याची पानं. हीच पानं का ह्याबद्दल एक पौराणिक गोष्ट आहे. कौत्स्य नावाच्या एका विद्वानाला त्याच्या गुरूंना गुरुदक्षिणा देता यावी यासाठी कुबेराने आपट्याच्या हजारो पानांचं सोन्यात रूपांतर केलं. त्या विद्वानाने त्याला हवी तेवढी पानं घेतली आणि उरलेली अयोध्येच्या प्रजेत वाटून टाकली. हे ज्या दिवशी झालं तो दसऱ्याचा दिवस होता.

आपट्याचं पानindiabiodiversity.org

आपट्याची पानं लहानशी, खरखरीत, गोलाकार अशी Bauhinia racemosa ह्या प्रजातीची. हे झाड डोंगराळ, शुष्क प्रदेशात सापडतं. एवढी वर्षं ह्या झाडाची पानं ओरबाडून वापरून त्याची संख्या कमी झाली आहे. झाड सहज सापडेनासं झालं आहे. तर ह्यावर उपाय म्हणून शहरांच्या सुशोभीकरणासाठी बागांमध्ये, रस्त्याच्या कडेला लावलेली कांचनवृक्षाची पानं! ही पानं आपट्यासारखीच दिसतात, केवळ त्यांची टोकं निमुळती आणि पोत खरखरीत नसून नाजूक, मऊ असतो. पुढच्या वेळी ‘सोनं’ विकत घ्याल तेव्हा ह्याकडे नक्की लक्ष द्या!

ओळख

आपटा आणि कांचन दोघेही Bauhinia ह्या genus आणि Caesalpiniaceae (गुलमोहर, बहावा) ह्या familyतले आहेत. आपट्याचं नाव Bauhinia racemosa, तर आपल्याकडे सर्वत्र दिसणारा कांचन Bauhinia variegata आणि रक्तकांचन Bauhinia purpurea आहे. आपट्यासारखी पानं असलेली पण वेगळ्या रंगाची फुलं असणारी अजून दोन झाडं काही ठिकाणी दिसतात. बुटका, पांढऱ्या फुलांचा Bauhinia acuminata (Dwarf white Orchid Tree) आणि पिवळ्या फुलांचा, केसाळ पानांचा Bauhinia tomentosa (Yellow Orchid Tree). आपट्यासारखीच पण अवाढव्य पानांची, पांढऱ्या फुलांची महाप्रचंड कांचनलताही आहे, ती म्हणजे Bauhinia vahlii. असा हा आपल्याकडचा कांचनवर्ग!

ह्यात पिवळा कांचन सोडल्यास इतर सगळे फक्त भारतातलेच. पिवळा कांचन भारताबरोबरच पूर्व आफ्रिका आणि श्रीलंकेतही सापडतो.

कांचनाचं फूल | श्रेय : गौरव पाटील

यांतले रक्तकांचन आणि कांचन हे वृक्ष आहेत, पांढरा व पिवळा कांचन आणि आपटा ही छोटी झाडं आहेत, तर कांचनलता जाड खोडाची प्रचंड मोठी वेल आहे. ह्या सर्वांची पानं गाईच्या खुरांच्या आकाराची आहेत. फुलं ५ पाकळ्यांची, विविध रंगांची आणि आकारांची आहेत. आपट्याची फुलं अगदी लहान तर इतर कांचनाची लक्ष वेधून घेतील एवढी मोठी. रक्तकांचनाला सप्टेंबर ते नोव्हेंबर सुबक सुवासिक गुलाबी फुलांचा बहर येतो. ह्या सगळ्यांना फुलांनंतर लहान मोठ्या आकाराच्या शेंगा येतात.

कुठेही सहज येणारी आणि भरपूर वाढणारी ही झाडं फुलांमुळे आणि अर्थात पानांमुळे लोकप्रिय आहेत. ह्या सर्व प्रजाती भारतातल्याच असल्याने शहरात सुशोभीकरणासाठी त्यांची निवड होणं अगदी उत्तम आहे.

उपयोग

आपट्याचा उपयोग फक्त पुराणातल्या गोष्टीमुळे होतो असं नाही. त्यात अनेक औषधी गुणही आहेत. त्याचे सर्व अवयव विविध विकार बरे करण्यासाठी वापरले जातात. मुळांचा काढा पोटदुखीवर, खोडाच्या सालीचा त्वचेचे आजार आणि जखमांवर, पानांचा काढा दमा आणि आंतरिक रक्तस्रावाच्या वेदनांवर, फुलांचा सर्दी खोकल्यावर उपयोग आहे. आपट्याची पानं विड्या वळायला वापरतात.

रक्तकांचनही खूप औषधी आहे. त्यात कर्करोगावर आळा घालण्याची क्षमता आहे. दमा, त्वचेचे रोग, पोटाचे विकार, सर्दी-खोकला ह्यांवर रक्तकांचन गुणकारी आहेच, ह्याशिवाय झाडाच्या कळ्या मूळव्याधावर उपयुक्त आहेत. स्त्रियांना मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होत असेल तर रक्तकांचनाने आराम मिळतो. औषधी उपयोगासोबतच झाडापासून मिळणारा डिंक, लाकूडदेखील उपयोगी आहेत. रक्तचंदनाचं गुलाबी-पांढरं लाकूड हवा लागली की लालसर आणि टिकाऊ होतं. त्याचा बांधकामात आणि सुताकरकामात वापर होतो. खोडापासून मिळणाऱ्या तंतूंच्या भक्कम दोऱ्याही तयार करतात. सुंदर फुलांमुळे रक्तकांचन शहरात घरांसमोर, रस्त्यालगत, बागांमध्ये लावतात.

कांचनाचे औषधी उपयोग रक्तकांचनासारखेच आहेत. हा सर्पदंशावरही उपयोगी आहे. त्याच्या कळ्यांची आणि पानांची भाजी करून खातात. शेंगांचं लोणचं केलं जातं. कांचनाचं लाकूड घराच्या बांधकामात आणि शेतीची अवजारं बनवण्यासाठी वापरतात. त्यापासून तपकिरी रंग तयार करतात. बियांपासून उपयोगी तेल मिळतं. कांचनाचं लाकूड ज्वलनशील असल्याने जळणासाठी उत्कृष्ट आहे.

पांढऱ्या कांचनाच्या छोट्या झाडाचं कुंपण सुंदर दिसतं. त्याची फुलंही सुगंधी असतात. पानं, मुळं आणि फुलांचा औषधी वापरही आहे.

पिवळ्या कांचनाचे अनेक उपयोग आहेत. पानांच्या काढ्याने गुळण्या केल्याने खोकला जातो. औषधी बिया खाल्ल्या जातात. विषारी प्राणी चावला तर त्यावर बियांचे वाटण लावतात. ह्या पानांपासून पिवळा रंग मिळतो. खोडाच्या सालीपासून दोऱ्या आणि खोडापासून जळणासाठी लाकूड मिळतं.

कांचनलतेचे बरेच उपयोग आहेत. बिया कच्च्या किंवा भाजून खातात. झाडाच्या सालीपासून उत्तम दर्जाच्या दोऱ्या बनवल्या जातात. मोठी पानं छप्पर, छत्र्या, पत्रावळ्या, द्रोण, तात्पुरते आच्छादन, इरल्या (Eco-friendly raincoat) ह्यासाठी वापरतात. वेलीपासून टॅनिन्स मिळवायला अवघड पण सर्वोत्कृष्ट असतात. त्यांचा चामड्याच्या वस्तू, दारू, इ. बनवण्यात वापर होतो. हे मानवी उपयोग झाले. ह्या वेलीची मोठी पानं गळून जमिनीवर पांघरूण घालतात व तिची धूप होण्यापासून वाचवतात. म्हणूनच डोंगरउतारांवर त्यांची लागवड करणं रास्त आहे. पण ह्या वेलीला वाढायला दुसऱ्या मोठ्या झाडाचा आधार लागतो. तिच्या वजनाने अनेकदा ते झाड दगावतंही! त्यामुळे ही वेल बऱ्याचदा तोडून टाकली जाते.

एवढं उपयोगी असूनही आपट्याच्या झाडाचा केवळ दसऱ्याच्या दिवशी विचार केला जातो. झाडाची पानं मिळवायची असतील तर ते झाडही लावायला हवं हा विचार मात्र होत नाही. आपट्याच्या सोन्याला मागणी आहे म्हणून जवळपासच्या आपट्यांना साफ करून बाजारांत पानं विकायला येतात. झाडावर एकही पान न उरल्याने झाड मात्र जीवानिशी जातं. ही पानं संपली म्हणून कांचनांवरही हल्ला होतो. एवढ्या पानांची, त्यांसाठीच्या विध्वंसाची खरंच गरज आहे का? दसऱ्याच्या निमित्ताने एकमेकांना भेट देऊन मोठ्यांना सोनं न देता केवळ आशीर्वाद घेणं पुरेसं नाही का? किंवा हवीच असतील आपट्याची पानं तर त्याची लागवड, संगोपन करणं ही आपली जबाबदारी नाही का? आपण आताच हा विचार नाही केला तर कुबेराचा सोन्याचा आपटा खऱ्या सोन्याएवढा महाग आणि दुर्मीळ होऊन जाईल!

हा लेख इतरांना पाठवा

सई गिरधारी

वनस्पतीशास्त्र पदवीधर आणि अभ्यासक.

4 thoughts on “सोन्यासारखी भावंडं – आपटा आणि कांचन । वनी वसे ते…

 • April 8, 2019 at 9:42 pm
  Permalink

  आमच्याकडे पिवळा कांचन होता. आईने कळशीने पाणी आणून जगवलेला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता तर पाहायला ही मिळत नाही कांचन. पुण्यात कुठे असेल तर सांगा.

  Reply
  • April 9, 2019 at 6:13 pm
   Permalink

   तुमची आठवण share केल्याबद्दल धन्यवाद, ऐकून छान वाटलं!
   पुण्यात माझ्या पाहण्यात तरी आला नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्हीही लावू शकता. बिया किंवा रोप मिळायला हरकत नाही 🙂

   Reply
 • November 30, 2019 at 10:09 pm
  Permalink

  आमच्या परिसरात अनेक कांचन झाडे आहेत, त्याला तुरे असणारी निळी फुले येतात. या झाडाच्या औषधी गुणांबद्दल बऱ्याच दिवसापासून उत्सुकता होती. तुम्ही अतिशय छान माहिती दिली, धन्यवाद…☺

  Reply
 • June 25, 2020 at 8:07 am
  Permalink

  खूप छान सविस्तर माहिती

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *