आशियाई क्रीडा स्पर्धांचा इतिहास

१५ सुवर्ण २४ रौप्य आणि ३० कांस्य पदकं मिळवत २०१८ मध्ये भारतीय चमूने इंडोनेशियात आजवरची (भारताबाहेर भरवण्यात आलेल्या खेळात) सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय खेळाडूंबद्दल अनेक लेख आणि बातम्या पेपरांत छापून आल्या. तरूणाईमध्ये खेळाडूंबद्दल उत्कंठा निर्माण झाली. या खेळांत पदकं आणणाऱ्या खेळाडूंच्या इन्स्टा पेजेसना फॉलोअर्सही वाढले. हे सर्व चालू असताना आशियाई क्रीडा स्पर्धांबद्दल कुतूहल वाढलं. या खेळांची सुरुवात कशी झाली? पहिले खेळ कुठे सुरु झाले? आणि असे बरेच प्रश्न आपल्याला भेडसावू लागले. हे कुतूहल असंच तेवत ठेवूया, आणि या खेळांविषयीचा थोडा इतिहास जाणून घेऊया!

दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया खंडात मोठ्या प्रमाणावर निर्वसाहतीकरण झालं आणि त्यातून बरेच नवे देश उदयास आले. १९१२ मध्येच आशियात खेळ भरवण्याचे प्रयत्न झाले होते. जपानमध्ये भरवल्या गेलेल्या खेळांचं ‘फार ईस्टर्न चॅम्पियनशिप गेम्स’ असं नाव होतं. परंतु हे खेळ फारसे काही चालले नाहीत. त्यानंतर १९४८ लंडन ऑलिंपिक्समध्ये अशी कल्पना सुचवली गेली, की खास आशियातल्या देशांसाठी खेळांचं आयोजन का करू नये? चीन व फिलीपिन्सच्या अधिकाऱ्यांनी असा युक्तिवाद मांडला की फार ईस्टर्न चॅम्पियनशिप गेम्सचं पुनरुज्जीवन करावं. पण भारतीय अधिकारी गुरूदत्त सोंधी यांनी ईस्टर्न चॅम्पियनशिप गेम्सचं पुनरुज्जीवन आशियाई देशांच्या एकीकरणासाठी पुरेसं नाही असं म्हणत याला विरोध केला आणि नवीन खेळांचं आयोजन करावं असा प्रस्ताव मांडला.

भारतीय खेळाडू पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत संचलन करताना

१२-१३ फेब्रुवारी १९४९ रोजी भारताने फिलीपिन्स, म्यानमार, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि थायलंड इत्यादी देशांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी निमंत्रण पाठवलं. १३ फेब्रुवारी १९४९ ला एशियन ऍथलिटिक्स फेडरेशनची स्थापना झाली. नवी दिल्लीत स्थापन झालेल्या या फेडरेशनने नवी दिल्ली हेच शहर पहिलं यजमान शहर म्हणून घोषित केलं. ‘एवर ऑनवर्ड- ऑलवेज फॉरवर्ड’ असं घोषवाक्य ठरवण्यात आलं. अशा प्रकारे आशियाई खेळांचा उदय झाला. पहिले खेळ नवी दिल्लीत १९५० साली भरवण्याचं ठरलं. ऑलिंपिक्सप्रमाणे हे खेळही ४ वर्षांच्या अंतरानं भरवावेत, असं ठरवलं गेलं. किमान ११ आणि कमाल २० क्रीडाप्रकार असावेत असा नियम बनवण्यात आला. खेळांचं आयोजन १२-१६ दिवसांसाठीच करण्यात यावं असंही ठरलं.

१९५१, दिल्ली :

१९५१ मध्ये पहिले खेळ भरवण्यात आले. या खेळांचं उद्घाटन भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केलं. ११ देशांच्या (ऑलिंपिक्स संस्था असलेल्या) एकूण ४८९ खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. १२ प्रकारच्या खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. जपानने त्यावर्षी बाजी मारली. ते २४ सुवर्ण, २१ रौप्य आणि १५ कांस्य पदकांसह पदकतालिकेत प्रथम स्थानावर होते. यावेळी सहभाग न घेऊ शकलेला प्रमुख देश म्हणजे दक्षिण कोरिया. भारताला १५ सुवर्ण १६ रौप्य आणि २० कांस्य पदकं मिळाली आणि पदकतालिकेत द्वितीय स्थान !

मनिला, १९५४ :

फिलिपिन्सचं मुख्य शहर असलेलं मनिला इथे दुसऱ्या आशियाई खेळांचं आयोजन झालं. फिलिपिन्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांनी रिझाल मेमोरिअल मैदानात खेळांचं उद्घाटन केलं. ९७० खेळाडूंसह एकूण १९ ऑलिंपिक सदस्य देश सहभागी झाले होते. २१८ पदकांपैकी जपानने पुन्हा बाजी मारत ३८ सुवर्ण, ३६ रौप्य आणि २४ कांस्य पदकं मिळवली. ५ सुवर्ण घेत भारत ५व्या स्थानावर घसरला.

टोकियो, १९५८ :

जपानमध्ये प्रथमच आशियाई खेळांचं आयोजन झालं होतं. तब्बल १८२० खेळाडू १६ देशांतर्फे खेळले. १३ प्रकारच्या खेळांत ३०२ पदकं वितरीत केली गेली. जपानच्या राजाने नॅशनल स्टेडिअम मध्ये खेळांचं उद्घाटन केलं. यावेळी पहिल्यांदाच मशालीने खेळांचं उद्घाटन करण्यात आलं. ही मशाल रिझाल स्टेडिअमपासून पेटवली गेली आणि टोकियोमध्ये येऊन पोहोचली.

जकार्ता, १९६२ :

इंडोनेशियात भरवण्यात आलेल्या या खेळांचं हे चौथं वर्ष होतं. १३ क्रीडाप्रकारात ३८१ पदकांचा समावेश होता. १२ देशांचे एकूण १४६० खेळाडू जमले होते. ३८१ पदकांपैकी जपानने पुन्हा बाजी मारत ७३ सुवर्ण, ६५ रौप्य आणि २३ कांस्य पदकं मिळवली. भारत १० सुवर्ण १३ रजत आणि १० कांस्य पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. इंडोनेशियाने इस्राईल व तैवान या देशांच्या खेळाडूंना प्रवेश करण्यास मज्जाव केला होता म्हणून हे देश खेळाबाहेरच राहिले.

बॅंग्कॉक, १९६६ :

भूमिबोल अतुल्यतेज या थायलंडच्या राज्याने उद्घाटन केलेल्या या खेळांमध्ये १४ खेळ होते. १९४५ खेळांडूंनी १६ देशांतर्फे सहभाग घेतला होता. इस्राईल आणि तैवान या देशांनी पुन्हा प्रवेश घेतला होता. दरवेळीनुसार जपानने पदतालिकेवर वर्चस्व ठेवलं होते. ‘स्त्रियांचा व्हॉलिबॉल’ या खेळाने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला होता.

१९५८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा

बॅंग्कॉक, १९७० :

सिओल शहराने ऐनवेळी माघार घेतल्याने आशियाई क्रीडा स्पर्धा बॅंग्कॉकमध्येच परत झाल्या. १६ देशांच्या सुमारे २४०० खेळाडूंचा समावेश असलेल्या यावेळच्या खेळांमध्ये आयोजन थायलंडचे होते मात्र निधी हा दक्षिण कोरियाचा होता. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला करण्याची धमकी दिल्याने ऐनवेळी सगळी योजना बदलण्यात आली. एकूण ४२७ पदकं वाटण्यात आली आणि यातही जपाननेच बाजी मारली.

तेहरान, १९७४ :

तब्बल १९ देशांच्या ३०१० खेळाडूंचं यजमानपद भूषवण्यासाठी तेहरानमध्ये खास ‘आझादी स्पोर्ट्स कॉंप्लेक्स’ बांधण्यात आलं. मध्य-पूर्वेत प्रथमच या खेळांचं आयोजन झालं होतं. इराणचा शहा, मुहम्मद रझा पेहलवी याने या खेळांचं उद्घाटन केलं. तंत्रज्ञानाच्या आविष्काराने पुरेपूर असं हे आयोजन होतं. या खेळांच्या निमित्ताने राजकारणही बरंच झालं. तैवानला वगळून चीनला या स्पर्धांमध्ये स्थान देण्यात आलं होतं. एकूण ६०१ पदकं वितरीत करण्यात आली.

बॅंग्कॉक, १९७८ :

सिंगापुरला पैशाच्या कमतरतेमुळे यजमानपद न जमल्याने पुन्हा एकदा बॅंग्कॉकने ही जबाबदारी स्वीकारली. राजनैतिक वादविवादांमुळे इस्राईलला स्पर्धेतून बाहेर करण्यात आलं. ३८४२ खेळाडूंसह १९ देश १९ क्रीडाप्रकारांत सामील झाले होते. ७० सुवर्ण पदकांसह परत जपानच आघाडीवर राहीला.

१९६६ साली रौप्य पदक जिंकणारे कुस्तीपटू – बिश्वनाथ सिंह

नवी दिल्ली, १९८२ :

नवव्या वर्षी आशियाई खेळ भारतात परतले. ३४११ खेळाडूंच्या चमूसह २३ देश मैदानात उतरले होते. एशिअन गेम्स फेडरेशन जाऊन आता ‘एशिअन ऑलिंपिक्स काउंसिल ऑफ एशिया’ अंतर्गत खेळ भरवण्यात आले. यावेळी खेळांचं उद्घाटन राष्ट्रपती झैल सिंग यांनी केलं होतं. पी टी उषा हिने खेळाडूंची शपथ घेतली. चीनचा दबदबा या खेळांत वाढलेला दिसून आला. प्रथमच मॅस्कॉट्चा वापर करण्यात आला. ‘अप्पू’ हत्ती खूप लोकप्रिय ठरला.

सिओल, १९८६ :

‘हदोरी’ या बछड्याचं रूप घेतलेल्या मॅस्कॉटचा यावेळी वापर करण्यात आला. सप्टेंबर १९८६ मध्ये दक्षिण कोरियात एकूण २२ देशांचे ४८३९ खेळाडू जमले होते. पी टी उषाने ४ सुवर्ण आणि १ रजत पदक कमावत सर्वांचं लक्ष वेधलं. चीन ९४ सुवर्ण पदकं मिळवत प्रथमस्थानी आला.

बीजिंग, १९९०:

चीनचे राष्ट्राध्यक्ष यांग शांग कून यांनी खेळांचं उद्घाटन केले. पॅनपॅन पॅंडा या मॅस्कॉटने सुरु करण्यात आलेले खेळ प्रथमच चीनमध्ये भरवण्यात आले. ६१२२ खेळाडूंसह ३६ देश यांत सहभागी झाले होते. एकूण २७ क्रीडाप्रकारांत ९७६ पदकं वितरीत केली गेली.

हिरोशिमा १९९४ :

शांततेचा प्रसार करणाऱ्या या खेळांत तैवान सकट कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश होता तर इराकला या खेळांतून काढण्यात आलं होतं. पोप्पो आणि कूक्कू या बदकांचे मॅस्कॉट वापरण्यात आले. तब्बल १२५ सुवर्ण पदकं कमवत चीनने प्रथम स्थान कायम राखलं.

बॅंग्कॉक, १९९८ :

कबड्डीने या खेळांत पहिल्यांदा प्रवेश केला. तैपैई आणि जकार्ताला बिडींगमध्ये हरवत बॅंग्कॉकने पुन्हा बाजी मारली. बॅंग्कॉकमध्ये चौथ्यांदा हे खेळ आयोजित करण्यात आले होते. ४१ देशांतल्या ६५५४ खेळाडूंनी यांत सहभाग घेतला होता. चीन प्रथम क्रमांक पटवत १२९ सुवर्ण पदकांची कमाई करून गेला.

बुसान, २००२ :

आशियाई खेळांचं आयोजन करणारं बुसान हे सिओल नंतर दक्षिण कोरियाचं दुसरं शहर ठरलं. राष्ट्राध्यक्ष किम-दे-जुंग यांनी खेळांचं उद्घाटन केलं. प्रथमच उत्तर कोरियाचा समावेश होता, तसंच अफगाणिस्तानही स्पर्धेत परतला होता. याही वेळी तब्बल १५० सुवर्णपदकांसह चीनच आघाडीवर होता.

गोळाफेक पटू – बहादूर सिंह चौहान, १९७४

दोहा, २००६ :

१५व्या आवृत्तीत कतारची राजधानी दोहा इथे खेळ भरवले गेले. सर्वच्या सर्व ४५ आशियाई देशांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. तिकडचा ‘शेख हमाद बिल खलिफा अल थानी’ याने उद्घाटन केलं. मध्य-पूर्वेत आयोजन होणारी ही दुसरीच वेळ. ९५२० खेळाडूंनी यात भाग घेतला होता. १६६ सुवर्ण पदकांसह चीन प्रथमस्थानी अढळ होता.

ग्वांगझू, २०१० :

चीनमध्ये आशियाई खेळ आयोजित करणारं ग्वांगझू हे दुसरं शहर. ४५ देशांच्या ९७०४ खेळाडूंनी यांत सहभाग घेतला होता. अर्थातच १९९ सुवर्ण पदकांसह, यजमानपद भूषवणारा चीन प्रथम होता.

इंचिऑन, २०१४ :

४५ देशांच्या ९५०१ खेळाडूंसह ३६ खेळांचे प्रकार आयोजित केले गेले होते. दक्षिण कोरियामधलं हे तिसरं शहर होतं ज्यात आशियाई स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुन्हा १४५४ पदकांपैकी १५१ सुवर्ण पदकांनिशी चीन प्रथमस्थानी अभेद्य होता.

जकार्ता-पालेंबांग, २०१८ :

परत एकदा ४५ देशांनी मिळून तब्बल ११,७२० खेळाडू पाठवले होते. जकार्ता आणि पालेंबांग अशा दोन शहरांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘जोको विदोदो’ या इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. १३२ सुवर्ण पदकांसह चीन प्रथम तर ७५ सुवर्णांसह जपान दुसऱ्या क्रमांकावर होता. भारत १५ सुवर्णांसह आठव्या स्थानावर होता.

क्रीडाप्रकार कोणताही असो, किंवा सामना कोणाशीही असो, भारतीय खेळाडू नेहमीच जीव ओतून मेहनत घेतात. जे चीन आणि जपान सारख्या देशांना जमतं ते आपल्या खेळाडूंनाही सहज जमू शकतं. गरज आहे आपल्या पाठबळाची. जेवढा उत्साह क्रिकेटसाठी दाखवतो, तेवढाच इतर विविध खेळांमध्ये दाखवायला हवा. मग बघा, भारतीय खेळाडू नेहमी ढीगभर सुवर्णपदकं आणतील की नाही ते.

हा लेख इतरांना पाठवा

ओमकार बर्डे

सहसंपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *