अनुस्वाराचा उच्चार नेहमी सारखाच होतो का? अनुनासिक म्हणजे काय?

लहानपणी बाराखडी शिकताना ङ आणि ञ ही अक्षरं बहुतेक तक्त्यांत दाखवतच नसत. कित्येक शिक्षकांना त्यांचा नीट उच्चारही करता येत नसे.

आजही अनेकांना या दोन अक्षरांचा उच्चार नेमका कसा होतो, आणि नेमकं त्यांचं आपल्या मराठी भाषेतल्या रोजच्या वापराशी असं काय देणं-घेणं आहे, याची काहीही कल्पना नसते.

ङ आणि ञ ही दोन्ही अनुनासिकं आहेत. पण ही दोनच अनुनासिकं नव्हेत, तर ण, न, आणि म ही सुद्धा अनुनासिकं आहेत.

अनुनासिकं म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याआधी ङ आणि ञ चा निकाल लावणं महत्त्वाचं आहे.

आपण त्यांचा उच्चार कसा करावा हे समजून घेऊया.

बहुतेकांसाठी ङ या अक्षराची ओळख ‘ड वर टिंब’ अशी असते. कोणी याचा उच्चार ‘ड्य’ असा करतं, तर कोणी ञ सारखा उच्चार करतं.
ङ चा नेमका उच्चार कसा करावा?*
कधी गायीगुरं हंबरताना ऐकली आहेत का? ती हंबरतात तेव्हा त्यांच्या तोंडाकडे बघा. तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या हंबरण्याचा आवाज त्यांच्या शरीराच्या आतनं कुठून तरी सुरु होतोय, आणि तोंडातून तो नुसता बाहेर पडतोय.
क, ख, ग, घ, ङ या अक्षरांचा आवाज सुद्धा असाच, आपल्या शरीराच्या आतनं, म्हणजे घशातनं सुरु होतो, आणि तोंडातून तो नुसता बाहेर पडतो.
त्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला ओठ मिटावे लागत नाहीत, दात एकमेकांवर घासावे लागत नाहीत किंवा जीभ उलटी पालटी करावी लागत नाही.
थोडक्यात, तोंडाचा कोणताही भाग क, ख, ग, घ, आणि ङ चा उच्चार करण्यात भर पाडत नाही. तोंड नुसतं उघडं ठेवून, आतून येणारा आवाज बाहेर पडण्यासाठी वाट मोकळी करून द्यायची असते.
तर ङ चा उच्चार करण्यासाठी, तुम्हाला थोडंसं हंबरायचं आहे.
हंबरणारी गाय ‘ग’ चा उच्चार कसा करेल, याची कल्पना करा, आणि तसं हंबरून बघा.
यातून तुमच्याच्याने ङ चा बरोबर उच्चार होईलच याची मी खातरी देत नाही, कारण गाय कशी हंबरते, याबद्दलच्या प्रत्येकाच्या कल्पनेत आणि त्या आवाजाच्या नकलेत फरक असणारच.
पण तरी तुम्हाला साधारण कल्पना येईल. तरी समजा नाहीच आली नेमकी कल्पना, तर ङ चा योग्य उच्चार करण्यासाठी संदर्भ म्हणून इथे एक ध्वनीफित जोडलेली आहे :

 

आता ञ ची पाळी – या साहेबांची खरोखर दया येते मला. खूपच अन्याय होतो त्यांच्यावर.

ञ चा योग्य उच्चार करण्यासाठी य अक्षर नाकात उच्चारायचं* असतं, बास!

पण लोक मात्र ञ हे अक्षर त्र लिहिण्याचा शॉर्टकट समजून वापरतात. आणि मग मिञ, पञ, असे बोबडे शब्द लिहून ठेवतात.

आता या दोन अनुनासिकांचा उच्चार समजल्यानंतर त्यांचा आणि इतर अनुनासिकांचा नेमका वापर कसा होतो ते समजून घेऊया.

अक्षरांचे वर्ग आणि अनुस्वाराचा उच्चार

 

कोणत्याही अक्षराच्या डोक्यावर आपण जे अनुस्वार नावाचं टिंब देतो, त्याचा उच्चार नेहमीच ‘अर्धा न’ असा होत असल्याचा एक समज दिसून येतो.

पण अनुस्वार ज्या अक्षरावर देतोय, त्याच्या पुढचं अक्षर (खरं तर व्यंजन) कोणत्या वर्गातलं आहे, आणि त्या वर्गाचं अनुनासिक कोणतं आहे, यानुसार अनुस्वाराचा उच्चार ठरत असतो.

तर आधी आपण व्यंजनांचे वर्ग कोणते ते समजून घेऊ.

 

क वर्ग : क् ख् ग् घ् ङ्

 

च वर्ग : च् छ् ज् झ् ञ्

 

ट वर्ग : ट् ठ् ड् ढ् ण्

 

त वर्ग : त् थ् द् ध् न्

 

प वर्ग : प् फ् ब् भ् म्

 

य् र् ल् व् श् ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् या व्यंजनांना वर्ग नाही.

शाळेतल्या वर्गाबाहेर पायाची बोटं पकडून उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांसारखी बिचारी कायमची बाहेर असतात.

कोणी त्यांना वर्गात घ्यायलाच तयार होत नाही.

या वर्गांची मांडणी नेमकी अशी का, हे आपण दुसऱ्या लेखामध्ये समजून घेऊ.

तूर्तास अनुस्वारापुरतं बोलू.

 

आता वर दिलेल्या पाच वर्गांपैकी, प्रत्येक वर्गातलं शेवटचं व्यंजन हे त्या त्या वर्गाचं अनुनासिक असतं.

आणि जेव्हा त्या वर्गातल्या कोणत्याही व्यंजनाच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार येतो, तेव्हा त्या वर्गातल्या अनुनासिकाचा उच्चार करायचा असतो.

उदा. ‘अंक’ या शब्दाचा उच्चार ‘अन्क’ असा होत नसतो. तो अङ्क असा होतो.

कारण क् हे क वर्गातलं व्यंजन आहे. आणि क वर्गाचं अनुनासिक ङ आहे.

 

याच नियमाने, पंख, अंग, जांघ या शब्दांचा उच्चार पङ्ख, अङ्ग, जाङ्घ असा होतो. (वाङ्मय हा शब्द उच्चार सारखा वाटल्यामुळे खूप जण वांग्मय असा लिहितात, जे चुकीचं आहे).

 

च वर्गासाठी या लेखात इतक्यांदा वापरलेल्या ‘व्यंजन’ या शब्दाचंच उदाहरण घेऊ.

ज् हे च वर्गातलं व्यंजन असल्याने त्याच्या आधीच्या अनुस्वाराचा उच्चार ञ् असा होतो.

म्हणूनच व्यंजन शब्दाचा उच्चार व्यञ्जन असा होतो.

 

ट वर्गातल्या कोणत्याही व्यंजनाच्या आधी अनुस्वार आला, की त्याचा उच्चार ण् असा होतो.

उदा. ‘भांडण’ या शब्दाचा उच्चार भाण्डण असा होतो (कारण ड् हे ट वर्गातलं व्यंजन आहे).

 

त वर्गाचं अनुनासिक न् आहे. त्यामुळे अनुस्वारानंतर त्, थ्, द्, ध् किंवा न् यांपैकी कोणतंही व्यंजन आलं तर अनुस्वाराचा उच्चार न् होतो. उदा. अंतर, दंत, बंद, धांदल या शब्दांचा उच्चार अनुक्रमे अन्तर, दन्त, बन्द, धान्दल असा होतो.

 

प वर्गातल्या कोणत्याही व्यंजनाआधी अनुस्वार आला, की त्याचा उच्चार म् असा होतो. उदा. संप हा शब्द सम्प असा उच्चारला जातो. त्याचप्रमाणे बंब हा शब्द बम्ब असा उच्चारला जातो. दंभ हा शब्द दम्भ असा उच्चारला जातो.वर्गात बसून मजा मारणारे झाले. आता ओसाडवाडीतल्या व्यंजनांकडे वळूया. ही व्यंजनं म्हटली तर स्वतंत्र आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी अनुस्वाराचा वेगवेगळा उच्चार होतो. खालची उदाहरणं पाहा :

संयम (सय्यम – य् नाकात / सैयम – सै नाकात)

संरक्षण (सौरक्षण – सौ नाकात)

संलक्षण (सौलक्षण – सौ नाकात)

संवत्सर (सौवत्सर – सौ नाकात)

अंश, दंश (औश, दौश – औ, दौ नाकात)

दंष्ट्रा (दौष्ट्रा – दौ नाकात)

कंस (कौस – कौ नाकात)

संहार (सौहार – सौ नाकात)

सिंह (सिउह / सिव्व्ह)‍

खंळ (खौळ – खौ नाकात)

संक्षिप्त (क्ष हे जोडाक्षर क् + ष असं तयार झालेलं असल्याने इथे अनुस्वाराच्या जागी ङ् चा उच्चार होतो.)

संज्ञा (सौज्ञा – सौ नाकात)

 

बोलीभाषेत लिखाण करताना मात्रेच्या जागी टिंब देण्याची पद्धत रूढ आहे. या टिंबाला शीर्षबिंदू किंवा शिरोबिंदू म्हणतात. याची उदाहरणं या लेखातच पुष्कळ मिळतील, तरी काही स्वतंत्रपणे देऊया :

खरेच = खरंच

तुझे = तुझं

लिहिणे = लिहिणं

 

इथे हा शिरोबिंदू अनुस्वार म्हणून नव्हे, तर अवग्रहाला, म्हणजेच ऽ या चिह्नाला पर्याय म्हणून येतो.
‘खरंच’ या शब्दाचा उच्चार खरञ्च असा होत नाही. तो ‘खरऽच’ असा होतो.

 

अनुस्वाराचे असे निरनिराळ्या प्रकारे उच्चार होत असतात. आपण बोलताना नीट उच्चार जरी करत असलो, तरी त्यांची आपल्याला ठळकपणे जाणीव असतेच असं नाही. ही जाणीव आहे की नाही, हे लिहिताना, किंवा एखादा नवा शब्द वाचताना उघड होतं. अशा वेळी आपल्या हातून चुका होऊ नयेत, यासाठी अनुनासिकांसाठीचे हे सोपे नियम लक्षात ठेवा म्हणजे झालं.

 

*ङ आणि ञ या अक्षरांचा अचूक उच्चार कसा करावा हे लेखी स्वरूपात अधिक स्पष्टपणे कोणाला समजावून देता येत असेल तर आम्हाला नक्की कळवा.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *