परग्रहवासी आहेत कुठे? – ‘फर्मी’चा विरोधाभास

हे विश्व नेमकं किती मोठं आहे? आणि ते इतकं मोठं आहे तरी कशासाठी? एवढा अवाढव्य पसारा मांडून ठेवण्यामागचा उद्देश काय आहे? या विश्वाच्या अडगळीतल्या एका कोपऱ्यात आपण अतिसूक्ष्म आकाराचे जीव रोज का आलतू फालतू गोष्टींसाठी सगळीकडे तडमडत असतो? त्यातून साध्य काय होणार आहे?

मित्र-मित्र गच्चीत जमून रात्री ग्रहताऱ्यांनी सजलेलं आकाश पाहताना हे आणि असे तात्विक प्रश्न सुचत राहतात. अर्थात्, त्याआधी ‘‘मंगळ ग्रह कोणता?’’ आणि ‘‘शुक्र तारा कोणता?’’ – ‘‘तारा नव्हे, तो तर ग्रह आहे!’’ – ‘‘मग ते शुक्र तारा मंद वारा असं गाणं आहे त्याचं काय?’’ ‘‘ते सप्तर्षी-सप्तर्षी म्हणतात ते कुठले म्हणायचे?’’ आणि ‘‘ते हरीण, पारधी आणि बाणाच्या आकाराचे तारे कोणते?’’ ‘‘पूर्वीच्या लोकांना कसं जमत असेल ना हे सगळं?’’ वगैरे प्रश्नांवर मित्रांबरोबर बरंच चर्वितचर्वण झालेलं असतं. आणि कोणालाच धड माहिती नसल्याने कोणीतरी दिडशहाणा मनाला येतील त्या थापा मारून स्वत: मोठा ‘विद्वान’ असल्यासारखा वागत असतो. एकजण ग्रहतारे ओळखणारं नवं ‘ॲप’ हुडकून काढतो. पण ते ॲप नीट चालत नाही किंवा आपल्या जीपीएसचा आणि त्या ॲपचा ताळमेळ जुळत नाही. शेवटी सगळे कंटाळून गप्प होतात. डीएसएलआर आणि त्याचे त्रिपाद घेऊन आलेला मित्र कॅमेरा ‘लाँग एक्स्पोझर’ वर ठेवून बसलेला असतो. पूर्व पश्चिम प्रवास करणाऱ्या ताऱ्यांचं टाईम लॅप्स काढायचं त्याचं स्वप्न एकदाचं पूर्ण होणार असतं. त्याचीच काय ती अधनंमधनं चुळबूळ सुरु राहते. बाकी सगळे अंतर्मुख होतात. अंतर्मुख होणं म्हणजे फक्त विचारात पडणं नव्हे हं. आधुनिक काळात त्याचे अनेक प्रकार असतात. कोणी मोबाईलमध्ये तोंड खुपसतो, कोणी पडल्या पडल्या झोपा काढतो.कोणी आवडत्या मुलीच्या कल्पना रंगवत बसतो. आणि एखाद-दुसरा कोणीतरी वर मांडलेले प्रश्न स्वत:ला विचारत बसतो. जेव्हा स्वत:ला विचारून उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा इतरांना सतावणं क्रमप्राप्त असतं.

आधी बाजूलाच पडलेल्या मित्राला –
‘‘तुला काय वाटतं रे? एलियन असतील का?’’
‘‘हं.’’
‘‘हं काय चोंग्या बोल ना.’’
‘‘उद्या सांगतो आत्ता झोपू दे.’’

मग थोडंसं डोकं उचलून त्याच्याही पलिकडे मोबाईलमध्ये घुसलेल्याला पुन्हा तोच प्रश्न.
‘‘मला विचारून काय उपयोग? फर्मीला विचार.’’
‘‘ही फर्मी कोण आता? तुझी नवी आयटम?’’
‘‘फिजिसिस्ट होता. एनरिको फर्मी. जगातला पहिला न्युक्लिअर रिॲक्टर त्याने तयार केला होता.’’
‘‘मग आईनस्टाईनने काय केलं होतं?’’
‘‘तू कॉमर्सवाला ना? मग बरोबरे.’’ झोपलेला मधला मित्र टोमणा मारण्यापुरता जागा होतो.
‘‘आईनस्टाईनने समीकरण मांडलं होतं. E = mc2. फर्मीने ते वापरलं.’’
‘‘बरं पण त्याचा एलियनशी काय संबंध?’’
‘‘त्यानेही तुझ्याच सारखे प्रश्न विचारले होते. की एलियन असतील तर नेमके आहेत कुठे?’’
‘‘बरं मग?’’
‘‘काही नाही तेवढंच.’’
‘‘सांगतोयस तर नीट सांग ना.’’
मग आपला हा खराखुरा विद्वान मित्र उठून बसतो. एक दीर्घ श्वास घेतो आणि त्याचं व्याख्यान सुरु करतो.
‘‘आपल्या जगात, म्हणजे – विश्वात, तारे किती असतील? विश्वात सोड. नुसत्या आपल्या आकाशगंगेत किती असतील? साधारण २००-४०० अब्ज धर. आता, पृथ्वीवरून आपण जेवढं अवकाश पाहू शकतो, त्याला म्हणतात ऑब्झरवेबल युनिव्हर्स. या आपण पाहू शकणाऱ्या अवकाशात साधारण २००-४०० अब्ज गॅलॅक्सीज् आहेत. मराठीत दीर्घिका म्हणतो आपण त्यांना. म्हणजे आपल्या आकाशगंगेतल्या प्रत्येक ताऱ्यासाठी बाहेर एक अख्खी गॅलॅक्सी आहे.’’
‘‘पुरुष-स्त्री गुणोत्तर एवढं असायला हवं होतं. मजा आली असती.’’
‘‘तू झोप रे. तर आता एवढ्या भरमसाट गॅलॅक्स्या, आणि त्या प्रत्येक गॅलॅक्सीत भरमसाट तारे, म्हणजे विचार कर किती असतील?’’
अशा विषयांमुळे भल्याभल्यांची झोप उडते, आणि मग तेही मध्ये मध्ये तोंड मारत राहतात.
‘‘मी कुठेतरी वाचलं होतं की आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्या चौपाट्यांवरची वाळू एकत्र केली, तर त्या वाळूतल्या प्रत्येक कणामागे विश्वात दहा हज्जार तारे आहेत.’’
‘‘हां, आता एवढे तारे आहेत तर त्यातले बरेचसे सूर्यासारखेही असणारच. त्यांच्या स्वत:च्या सूर्यमाला असणार, त्यात ग्रह असणार. आता बरेचसे तारे म्हणजे किती? तू फक्त ५% असतील असं जरी म्हणालास, तरी ते किती होतात! ५०० अब्ज अब्ज. दोनदा अब्ज! पाचावर वीस शून्य! एवढे तारे सूर्यासारखे. त्यांच्या सूर्यमालेत पृथ्वीसारखे ग्रह असणारच ना कितीतरी! प्रत्येक ताऱ्याभोवती नसतील समज, तरी अंदाजे वीसेक टक्के धरायला काय हरकते? म्हणजे किती झाले?५०० चे वीस टक्के, म्हणजे १०० अब्ज अब्ज! एवढे पृथ्वीसारखे ग्रह असतील विश्वात, हमखास!’’
‘‘मी हे सुद्धा वाचलं होतं, की जगातल्या प्रत्येक वाळूच्या कणामागे १०० ग्रह आहेत पृथ्वीसारखे.’’
‘‘तुला वाळू एवढी का आवडते रे?’’
‘‘पण म्हणजे एलियन असायलाच हवेत ना रे निदान कुठेतरी?’’
‘‘तेच तर. पण म्हणजे नेमके आहेत ते कुठे आहेत? त्या पृथ्वीसारख्या १% ग्रहांवर जरी असले तरी खूप झाले. १% ग्रह म्हणजे १० वर अठरा-एकोणीस शून्य तरी सहज होतील.’’
‘‘तू एवढी मोठी गणितं इथे बसल्या बसल्या करतोयस की टेपा लावतोयस?’’
‘‘मी सुद्धा कुठेतरी वाचलं होतं ते आठवून सांगतोय ना रे बाळा! नसेल विश्वास बसत तर शोध नेटवर.’’
‘‘माझी बॅटरी लो आहे, उद्या शोधेन.’’
‘‘पण मग त्या फर्मीचं काय?’’
‘‘त्याला अजून अवकाश आहे. म्हणजे, ते वालं अवकाश नाही हां. हा-हा.’’ पण बाकी कोणीच हसत नाही म्हटल्यावर विद्वान घसा खाकरतो. ‘‘तर, फक्त आपली आकाशगंगा घे. तिच्यावरच पृथ्वीसारखे १ अब्ज तरी ग्रह असतील, आणि त्यांच्यापैकी डोकेबाज लोक असणारे निदान १० लाख ग्रह तरी असायला हवेत.’’
‘‘डोकेबाज लोक?’’
‘‘हां म्हणजे आपल्यासारखे. इंटेलिजेंट लाइफ.’’
‘‘पण मग कुठे आहेत ते?’’
‘‘तेच फर्मीने विचारलं. कसंय, की आपला सूर्य तसा नवा आहे. त्याच्या आधीपासून बरेच तारे अस्तित्वात आहेत आणि त्यांच्याभोवती फिरणारे खूप जुने ग्रह सुद्धा आहेत. मग त्या ग्रहांवर जर आपल्यासारखे बुद्धिमान जीव उगवले असतील, आणि पृथ्वीवर आपली जेवढी तंत्रज्ञानाची प्रगती झालेली आहे, तेवढी त्यांची समजा आधीच झालेली असेल, तर फार फार तर ५० लाख वर्षांत, किंवा चल ५ कोटी वर्षांत अख्खी आकाशगंगा ते सहज व्यापू शकतात. पण म्हणजे ते पृथ्वीवरही येऊन गेलेले असू शकतात. का नाही आलेत अजून? आणि जर आलेत तर पुरावे का मिळत नाहीत आपल्याला? पृथ्वीवर नाही तर किमान सूर्यमालेत तरी?’’
‘‘मिळतात ना, ते हिस्टरी चॅनेलवर वगैरे दाखवतात की.’’
‘‘ते सोड रे ते येडे आहेत ते काहीही बरळत असतात.’’
‘‘पण पुरावे म्हणजे काय नेमकं? एलियनचं शरीर, की यान वगैरे?’’
‘‘ते मिळालं तर चांगलंच आहे. पण प्रोब्ज वगैरे पाठवतात, किंवा खाणकाम केलेलं असू शकतं. त्याचे तरी पुरावे मिळायला हवेत.’’
‘‘ए पूर्वी मंगळावर पाणी असायचं म्हणे. आटलेले नद्यांचे प्रवाह दिसतात आता. तिथे असतील का एलियन?’’
‘‘असेल काय माहिती. तो एलॉन मस्क तिथे जाऊन आला की विचारू त्याला.’’
‘‘एक संस्था आहे, ‘सेटी’ नावाची.’’ डीएसएलआर वालासुद्धा किती वेळ गप्प बसणार!
‘‘हो. सर्च फॉर एक्स्ट्राटेरिस्टेरिअल इंटेलिजन्स.’’
‘‘एक्स्ट्राटूरिस्ट म्हणजे काय?’’
‘‘एक्स्ट्रा-टेरिस्टे-रिअल! पृथ्वीच्या बाहेरचं. टेरिस्टेरिअल म्हणजे पृथ्वीवरचं. तेही खरं तर जमिनीवरचंच. बरं, तू काय त्या संस्थेचं काय म्हणत होतास?’’
डीएसएलआरवाला मित्र कॅमेरा बंद करून लोळणाऱ्या मित्रांच्या बाजूला मांडी ठोकून बसतो.
‘‘ते लोक रेडिओ सिग्नल्स शोधत असतात. तेच काम आहे त्यांचं. जर विश्वात आपल्याहून थोर लोक असतील, म्हणजे हा म्हणतो तसे १० लाख ग्रहांवर समजा… आणि त्यांना त्यांच्या ग्रहावरच्या आयटम पुरत नाहीत म्हणून दुसरीकडे शोधत असतील (यावर बाकीचे जरासे हसतात. इतका वेळ आधी बोलत होता तो विद्वान मनातल्या मनात चरफडतो.), तर त्यांच्यापैकी जे कोणी रेडिओ व्हेव्ज वगैरे पाठवत असतील त्या या ‘सेटी’च्या लोकांनी पकडायला हव्यात ना! पण एकही मिळाली नाहीये अजून.’’
‘‘मिळाली असणार, आपल्याला सांगत नसतील बघ.’’
‘‘ए, तू ते ट्रान्सफॉर्मर्स वगैरे हॉलीवूडचे पिक्चर कमी बघत जा जरा. असं काही मिळालं ना तर कोणी गप्प बसणार नाही. दवंड्या पिटतील जगभर. त्यांचं फंडिंग वाढवायला निमित्त मिळेल त्यांना, का सोडतील ते?’’
‘‘हा पण लोकांना कशाला सांगायला हवं ते? ते आणि सरकार बघून घेतील ना आपापसांत. तुला आणि मला का सांगतील?’’
‘‘आपल्या इस्रोने मंगलयान पाठवलं एवढ्या स्वस्तात, तरी लगेच ‘देशात एवढी गरिबी असताना एवढे पैसे कशाला खर्च करता’ वगैरे बोलणं सुरु होतं. अवकाशात कोणतेही उद्योग करायचे झाले तर पैसा लागतो, तो पैसा सरकार देतं, आणि एवढा पैसा ओतायचा तर कर देणाऱ्या लोकांचा विश्वास असावा लागतो की बाबा, आपल्या पैशाचा काहीतरी चांगला उपयोग करतायत हे लोक!’’
आपल्या मूळ विद्वानाला इतका वेळ गप्प बसायची सवय नसते.
‘‘असो ते काय असेल ते. एक कार्डाशेव्ह स्केल नावाची गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे, काय म्हणूया आपण, एक पद्धत आहे – माणसाहून प्रगत असणारी संस्कृती, नेमकी किती जास्त प्रगत आहे हे मोजण्याची.’’
‘‘पण अजून मिळालीच नाही तर कुठून मोजणार?’’
‘‘पण गणितं करून अंदाज आणि आडाखे बांधता येतात ना रे. तर त्यात अशा संस्कृतींचे तीन प्रकार पाडलेत. पहिल्या प्रकारातल्या संस्कृतीचा तिच्या मूळ ग्रहावरच्या नैसर्गिक संसाधनांवर पूर्ण ताबा असतो.’’
‘‘म्हणजे आपल्यासारखं?’’
‘‘आपला आहे असं नाही म्हणता येणार. आपण कसेही वेड्यासारखे वापरतोय आपली संसाधनं. आपले हेच साहेब बघ – माहितीये, की ती मुलगी याला कधीही रिप्लाय देणार नाहीये, तरी तिला मेसेज करून करून स्वत:ची बॅटरी घालवतोय.’’
‘‘तुला काय करायचंय? तू ते कार्डाशेव्हचं सांग.’’
‘‘हां. तर, आपण शंभर दोनशे वर्षांत येऊ कदाचित पहिल्या प्रकारात. जर नीट शिस्तीत वागलो तर. दुसऱ्या प्रकारात ती संस्कृती मोडते, जिचा तिच्या सूर्यमालेवर पूर्ण ताबा असतो. म्हणजे त्यात सूर्यसुद्धा आला. सूर्याच्या सगळ्या शक्तीचा पूरेपूर वापर करता यायला हवा. ते जमायला आपल्याला काही हजार वर्षं तरी लागतील बहुतेक.’’
‘‘आणि तिसरी संस्कृती काय अख्खी गॅलॅक्सी व्यापते?’’
‘‘येस्स! ते करायला खूप वेळे आपल्याला. तोवर एकमेकांवर अणु बॉम्ब टाकून सगळा खेळ खल्लास केलेला नसला म्हणजे मिळवलं.’’
‘‘तरी पण म्हणजे किती वर्षं लागू शकतील?’’
‘‘कदाचित एक लाख, कदाचित दहा लाख!.’’
‘‘एवढी?’’
‘‘मग काय खाऊ वाटला काय अख्खी आकाशगंगा व्यापायची म्हणजे? व्यापायची म्हणजे नुसती फिरून यायची नाहीये. जेवढा निसर्गातला सगळा खजिना पडलाय ना अस्ताव्यस्त, त्या सगळ्यावर नियंत्रण मिळवून ते वापरता आलं पाहिजे. वेळ तर लागणारच ना त्यासाठी.’’
‘‘पण दहा लाख वर्षांत जर कोणी अख्खी गॅलॅक्सी काबीज करू शकत असेल – आणि जर आपल्या आकाशगंगेत तू म्हणतोस तसे – ‘‘डोकेबाज लोक’’ असतील – दहा लाख ग्रहांवर – आणि जर त्यातले बहुतेक ग्रह आपल्या पृथ्वीहून खूप जुने असतील, तर एव्हाना कोणी आकाशगंगा काबीज का केली नाहीये?’’ – आपला कॉमर्सचा विद्यार्थी बरोब्बर डोकं चालवतो.
‘‘नशीब समजा केली नाहीये ते. समजा केली असती काबीज तर आपलं काय? आपल्याला सुखासुखी जिवंत सोडलं असतं त्यांनी?’’
‘‘थॅनोस! फुल गेम!’’
‘‘या सुपरहीरोंच्या कल्पनेपेक्षा वास्तवातलं जग कितीतरी जास्त भारी आहे. आपलं नशीब चांगलंय की आपल्याहून कितीतरी डोकेबाज माणसं मरमर मेहनत घेऊन एवढ्या सगळ्या गोष्टी शोधून काढतायत. कित्येकांचं तर अख्खं आयुष्य निघून जातं, पण तरी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ जिवंतपणी पाहायला मिळत नाही. ते तीन चार पिढ्यांनंतर दिसतं. नाहीतर आपण, बसलोय तंगड्या पसरून!’’
‘‘नाही ते ठीके,’’ नैतिक सल्ले देणारी प्रवचनं अशीच उडवून लावायची असतात, ‘‘पण तरी प्रश्न उरतोच ना? आले कसे नाहीत एलियन्स अजून?’’
‘‘त्याच्या बऱ्याच शक्यता आहेत. पहिली अशी की डोकेबाज लोक उगवण्यासाठी जी प्रक्रिया व्हावी लागते, ती होत नाही. निर्जीव पदार्थांमधनं सजीव उगवणं हेच मुळात किती कठीण असतं. त्याला ‘एबायोजेनेसिस’ म्हणतात. मराठीत आणखी सोपं असेल काहीतरी, शोधूया थांब – हं. अजीवजनन, जडोत्पत्तिवाद. बापरे. अजीवजनन सोप्पंय. तर हे अजीवजननच होता होता वांदे होतात बहुतेक ठिकाणी, आणि कार्डाशेव्ह स्केलच्या तीन प्रकारांमध्ये येऊ शकतील एवढे डोकेबाज लोकच उगवत नाहीत.’’
‘‘द ग्रेट फिल्टर!’’ अचानक एक जण ओरडतो.
‘‘काय?’’
‘‘ही जी तू प्रक्रिया समजावलीस ना, की बहुतेक ग्रहांवर हवं तेवढं एबायोजेनेसिस होतच नाही, त्यामुळे पुरेसे डोकेबाज लोक येत नाहीत. त्या प्रक्रियेला द ग्रेट फिल्टर म्हणतात, मोजकेच ग्रहया फिल्टरमधून पुढे जाऊ शकतात. हे बघ इथे लिहिलंय.’’ असं म्हणून तो आपल्या फोनवर उघडलेली माहिती दाखवतो.
‘‘तुझी तर बॅटरी लो होती ना रे?’’
‘‘पॉवर बँक झिंदाबाद!’’
‘‘मग आपण गेलोय का द ग्रेट फिल्टरमधून पुढे?’’ डीएसएलआर वाला विचारतो.

‘‘असं काही सांगता येत नाही. कदाचित आपल्याएवढ्याच प्रगत संस्कृती असतीलही बऱ्याच आणि आपण सगळेच अंधारात चाचपडत असू. द ग्रेट फिल्टर अजून यायचा असेल. आणि तो यायच्या आधीच काहीतरी भयानक घडून बहुतेक संस्कृती नष्ट होत असतील. आपण चुकून त्यातून सहीसलामत सुटलो, तर आपण कार्डाशेव्ह स्केलच्या पहिल्या प्रकारात मोडू.’’ विद्वान एक शक्यता मांडतो.

‘‘हो असं होऊ शकतं. म्हणजे बघ, आज जगात सात-आठ अब्ज लोक आहेत, पण शंभर वर्षांहून जास्त जगणारी माणसं कमी असतात खूप. तीन चार लाख, फारफार तर. म्हणजे एक टक्का लोक सुद्धा नाहीत. तुम्ही कितीही व्यायाम करा आणि निरोगी राहा, पण काही ना काहीतरी योगायोग घडून येतो आणि तुम्ही शंभरी गाठायच्या आतच टपकता. तर या सगळ्या ग्रहांवरच्या संस्कृतींबाबतही असं होऊ शकतं.’’ दुसरा त्याला दुजोरा देतो.

‘‘मग जर मंगळावर कधी पुरावे मिळाले, जीवन असण्याचे, तर याचा अर्थ तिथे आधी डोकेबाज लोक असतील, पण त्यांची शंभरी गाठायच्या आतच बूच लागली. आणि तशीच आपलीही लागू शकते. म्हणजे ग्रेट फिल्टर अजून यायचंय. निक बॉस्ट्रॉम नावाचा एक तत्त्वज्ञ आहे. तो म्हणतो की मंगळावर पूर्वी किंवा आत्ता जीवन असल्याबद्दल जर काही माहिती मिळाली तर ती आपल्यासाठी वाईटाचाच इशारा असणार.’’

‘‘पण तरी… शंभरी ओलांडणारे लोक कमी असले तरी आहेत ना? एखाद-दुसरा नाहीये, लाखांमध्ये आहेत. कॅल्सि उघड रे फोनवर. सात अब्जांवर तीन लाखांची टक्केवारी काढ. ०.००४२ % ना? आणि डोकेबाज लोक असणारे ग्रह किती असायला हवे, दहा लाख ना? दहा लाखाचे ०.००४२% किती? ४२. फक्त बेचाळीस? आयला खूपच कमी आहेत. पण तरी आहेत ना? इथे आपण एकच दिसतोय. बाकीचे एक्केचाळीस ग्रहसुद्धा असतील ना कुठेतरी?आणि आपण दुसरे असे ग्रह का शोधतोय? कारण आपला आपल्या संसाधनांवर ताबा नाहीये, आधीच मर्यादित आहेत त्यात आपण वाटेल तसे उडवतोय. समजा पहिल्या किंवा दुसऱ्या प्रकारांत मोडणाऱ्या संस्कृती असतील बाहेर, त्यांचा पूर्ण ताबा आहे त्यांच्या संसाधनांवर, किंवा अख्ख्या सूर्यमालेवर – तर गरज काय आहे त्यांना बाहेर रेडिओ व्हेव्ज पाठवायची? उगाच एखादी विस्तारवादी संस्कृती असायची, चीनसारखी, आणि हे इथे आहेत कळल्यावर त्यांच्यावर हल्ला करायची. कशाला कोणी ‘आ बैल मुझे मार’ करेल?’’

‘‘किंवा दुसरी एक शक्यता अशी आहे, की आपण अजून कुठेतरी आडगावात राहतो, आकाशगंगेच्या एका थुकरट कोपऱ्यात, आणि त्या प्रगत संस्कृतींना माहितीये की आपण आहोत पण त्यांना पडलेली नाहीये आपली. म्हणजे बघ ना, जगात आज अशी ठिकाणं आहेत जिथे सगळ्या सुखसोयी आहेत, आणि अशीही ठिकाणं आहेत जिथे लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. जे लोक सुखी आहेत, ते उगाच कशाला मरायला जातील नको तिकडे?’’

‘‘किडे असतात ना रे अंगात. ‘डिस्कव्हरी’चे.’’

‘‘हो पण ते आपल्यात असतात. आपण आपल्याहून शहाण्या आणि प्रगत संस्कृतीबद्दल बोलतोय. त्यांना माहिती असेलही आपली, पण पडलेली नसेल. तर कशाला येतील?’’
‘‘पण कुतूहल असेलच ना? अगदीच पडलेली नसेल असं होणार नाही. फक्त ते आपल्याला त्रास देत नसतील एवढंच. कदाचित त्यांचं तंत्रज्ञान एवढं प्रगत असेल, की ते आपल्या सगळ्या उचापत्या बघत असतील. आपण झू मध्ये जाऊन प्राण्यांना बघतो तसे.’’
‘‘किंवा कदाचित ते आपल्याला सांगायचा प्रयत्नही करत असतील, की आम्ही आहोत. पण आपण इतके गधडे असू की अजून आपल्याला समजत नसेल. म्हणजे रेडिओ व्हेव्ज नाही, पण दुसऱ्या एखाद्या माध्यमातून ते आपल्याशी संपर्क साधत असावेत. पण आपण अजून ते समजून घेता येण्याएवढे उत्क्रांत झालो नसू. आता तू जर उंदीर पाळलास आणि त्याला मराठी भाषा शिकवायला गेलास तर त्याला ती कळणार आहे का?’’
‘‘मला इंटरस्टेलार सिनेमा आठवतोय सारखा.’’
‘‘हो मलाही. कदाचित यातलं काहीही नसेल. आपल्याला जे वास्तव वाटतंय तो सगळा भ्रमही असू शकेल. प्रत्यक्ष वास्तव वेगळंच असेल.’’
‘‘ए आता तू तत्त्वज्ञानात घुसतोयस हां. नाही, पुरे आता मला खरंच झोप आलीये. कळला तो फर्मीचा विरोधाभास कळला. ‘सगळी गणितं मांडून पाहिली तर एलियन कमी जास्त का असेनात पण असायला हवेत; प्रत्यक्षात मात्र ते आपल्याला दिसत नाहीत.’ एवढंच ना?किती कीस पाडला आपण, तो फर्मीसुद्धा त्याच्या कबरीत वळवळत असेल. झोपूया आता.’’ असा एखादा क्वचित वैतागतो, पण बाकी सगळ्यांच्या डोक्यात विचारचक्रं सुरु झालेली असतात.

थोडीशी माहिती आणि तर्काच्या आधारावर साध्यासुध्या बुद्धिमत्तेची माणसंसुद्धा एकेकभन्नाट कल्पना रंगवू शकतात. अशाच वेडसर वाटणाऱ्या कल्पनांना शास्त्रीय आधार मिळू लागला की एकेक चमत्कार उलगडत जातात. म्हणून कधी आपल्या वेड्या मित्रांसोबत ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली झोपायची संधी मिळाली, तर शहाण्या माणसानं ती चुकवू नये.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

One thought on “परग्रहवासी आहेत कुठे? – ‘फर्मी’चा विरोधाभास

  • October 30, 2019 at 8:01 pm
    Permalink

    I like reading a new scientific research

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *