दारू पिणे : जगाला भेडसावणारी एक गंभीर समस्या

दारू पिणं वाईट हे तर आपण सतत ऐकत असतो. पण लक्षात कोण घेतो?

२०१८ साली जागतिक आरोग्य संस्थेने प्रसृत केलेल्या अहवालानुसार २०१६ साली ३० लाखांहून अधिक माणसं दारुच्या अतिरेकी वापरामुळे मरण पावली.

हा आकडा एकूण मृत्युंच्या ५ टक्के एवढा भरतो.

मृत्यु पावणाऱ्यांपैकी तीन चतुर्थांश पुरुष होते.

२००९ साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं होतं, की एकूणच दारू पिण्याची सवय आणि एकावेळी भरपूर दारू पिणं या बाबी स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त दिसून येतात.

आयुष्यात दारू अजिबात न पिणाऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांहून जास्त आहे.

एवढंच नव्हे, तर दारू पिणं थांबवणाऱ्यांमध्येही स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे.

 

रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये दारु पिऊन गाडी चालवल्याने होणाऱ्या अपघातांचं प्रमाण भरपूर आहे.

एकट्या युरोपात दरवर्षी १०,००० लोक दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे मृत्यु पावतात.

अमेरिकेत रस्त्यावरचे ३१% अपघाती मृत्यु कोणीतरी दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे उद्भवतात.

भारतात २००७ साली रस्त्यांवर झालेल्या अपघातांत सुमारे लाखभर लोक मृत्यु पावले, तर साडे ४ लाख लोक जखमी झाले. २०१४ साली मृतांचा आकडा १३०,००० वर गेला.

जगाच्या तुलनेत आपल्याकडे सर्वाधिक मृत्यु होतात.

याबाबतीत चीनला आपण २००६ सालीच मागे टाकलं. एका अभ्यासातून असं लक्षात आलं की यांपैकी जखमींपैकी २ ते ३३ टक्के जणांनी आणि मृतांपैकी ६ ते ४८ टक्के जणांनी दारू प्यायली होती, किंवा अंमली पदार्थांचं सेवन केलेलं होतं.

एकट्या दिल्ली शहरात, रस्त्यांतल्या अपघातांमध्ये मृत्यु पावणाऱ्यांपैकी ७०% अपघात दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे उद्भवतात.

दिल्लीत रस्त्यांवरील अपघातांत दरवर्षी १५०० ते १७०० जण मृत्यू पावतात.

दारुचा वाहन चालनावर होणारा परिणाम  

एका नियंत्रित प्रयोगातून विविध प्रमाणात दारू पाजलेल्या २५ वाहन चालकांच्या कामगिरीची माहिती गोळा केली गेली.

त्यामध्ये असं दिसून आलं की रक्तात दारूचं प्रमाण जेवढं जास्त होतं तेवढा चालकाच्या आविर्भावावर, अंतर आणि खोलीच्या अंदाजांवर, सावधपणावर, जाणिवेवर, प्रतिक्रियेवर आणि नियंत्रणावर अधिकाधिक परिणाम होत जातो.

रक्तात दारू जेवढी जास्त, तेवढा अपघाताचा दरसुद्धा वाढतो. चालक दारुच्या धुंदीत गाडीचा सरासरी वेग वाढवत नेतो.

अगदी कमी प्रमाणात दारू प्यायल्यावरही चालकाच्या दृष्टीवर, ब्रेक दाबण्याच्या वर्तनावर आणि सावधपणावर परिणाम होतो. रक्तात ०.०३५% दारू असली की वाहन चालनावर परिणाम होऊ लागतो.

 

दारू पिऊन वाहन चालवण्यावरील निर्बंध

भारतात कायद्याने तुमच्या रक्तात ०.०३% दारू असलेली चालते. म्हणजे दर १०० मिली रक्तामध्ये जास्तीत जास्त ३० मायक्रोग्रॅम दारू असेल तर चालेल.

स्वीडन आणि चीनमध्ये यासाठीची मर्यादा ०.०२% आहे; इस्राईल, दक्षिण कोरीया आणि ऑस्ट्रेलियामध्ये ०.०५% तर कॅनडा, इंग्लंड, मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये ही मर्यादा ०.०८% आहे.

 

दारूच्या सेवनामुळे इतर व्याधी बळावतात  

२०१८ च्या अहवालानुसार दारूमुळे वर्षभरात २३ लाख पुरुष मृत्यु पावले तर ७ लाख स्त्रिया मृत्यु पावल्या.

दारुमुळे आयुर्मानावर होणारा परिणामसुद्धा पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो.

दारू प्यायल्याने जगातल्या ८.६% (२३ कोटी ७० लाख) प्रौढ पुरुषांमध्ये आणि १.७% (४ कोटी ६० लाख) प्रौढ स्त्रियांमध्ये आजार बळावले.

लोकांनी जर तंबाखू आणि दारूचं सेवन बंद केलं, निरोगी आहार घेतला आणि पुरेसा व्यायाम केला, तर कर्करोगाची ३०% प्रकरणं कमी होऊ शकतात.

 

ऑस्ट्रेलियात सुमारे १५% गर्भधारणेची प्रकरणं दारूच्या अंमलाखाली उद्भवतात

तुम्ही दारू पिता, त्याचे परिणाम तुमची मुलं भोगतात

गरोदरपणात दारू पिणाऱ्यांचं प्रमाण ९.८% आहे.

आईवडिलांच्या दारु पिण्याच्या सवयींमुळे उपजत विकार घेऊन जन्माला येणाऱ्यांचं प्रमाण १० हजारांमध्ये ७७.३ एवढं आहे.

अमेरिकेत आणि युरोपात हे प्रमाण सर्वाधिक आहे.

जोडीला इतर व्याधींमध्येही भर पडते ती वेगळीच. यामध्ये जन्मदोष, सर्वसाधारण वाढीत व्यत्यय, मतिमंदत्व, वागण्या बोलण्यात अडचणी, बघण्यात आणि ऐकण्यात उद्भवणाऱ्या समस्या, हृदयविकार अशा सगळ्या व्याधींचा समावेश होतो.

दारू पिणाऱ्या पालकांच्या मुलांमध्ये सतत भावनिक समस्या, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव आणि एकांगीपणा दिसून येतो.

जे पालक भरपूर दारू पितात त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीवर त्याचा परिणाम दिसून येतो; अशी मुलं अनेकदा अंमली पदार्थांच्या आहारी जातात; त्यांच्या वागण्यात खूप बदल होतो आणि ती गुन्हेगारीकडेही वळू शकतात.

पालकांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे मुलांना प्रौढपणात नैराश्य येण्याची शक्यता खूप बळावते.

 

दारू अजिबात न पिणाऱ्यांत पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे

दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय

जागतिक आरोग्य संस्थेच्या २०१४ सालच्या अहवालानुसार, कधीही दारू न प्यायलेल्यांची जागतिक टक्केवारी ४८% होती.

२०१८ सालच्या अहवालानुसार ही टक्केवारी ४४.५% वर घसरली आहे (या टक्केवारीत १५ वर्षांहून जास्त वय असणारी माणसं मोजली जातात).

ही बाब चिंतेची आहे. दारू हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा नाही.

दारू पिणं हे सामाजिक स्तरावर स्वीकारार्ह होणं ही चांगली गोष्ट नाही. दारूबाबतीत आपला आविर्भाव बदलायला हवा.

आपण स्वत:ला आणि आपल्या ओळखीच्या लोकांनाही दारू पिण्यापासून परावृत्त करायला हवं.

नाहीतर येणाऱ्या पिढ्यांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढतच राहील, आणि त्याचा त्यांच्या कलागुणांवर आणि पुढे संपूर्ण आयुष्यावर परिणाम होत राहील.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *