शंभर फुटांचा प्रवास – चित्रपट अभिप्राय

दोन वेगवेगळे देश, त्यातल्या लोकांच्या मानसिकता आणि चालीरीतीही वेगवेगळ्या. पहिल्या देशाची संस्कृती जो येईल त्याला सामावून घेणारी, तरी असहिष्णुतेचा शिक्का सहन करणारी. दुसऱ्या देशाच्या राष्ट्रगीतातच रक्तपाताचं उदात्तीकरण, तरी अवघ्या जगाला सवंग सहिष्णुता शिकवायची हौस. अशा वेळी कथानकाचं यजमानपद दुसऱ्या देशाकडे आलं तर काय घडेल? या कथेचा, आणि तिच्या सादरीकरणाचा हा विरोधाभासच म्हणायचा, की हिंसेची झालर असतानाही प्रसन्न आणि टवटवीत वातावरणात कथा आकार घेत जाते. द हंड्रेड फूट जर्नी ही कथा म्हटली तर एकाची, म्हटली तर अनेकांची आहे.

फोटो श्रेय : Francois Duhamel – © DreamWorks II Distribution Co., LLC.

गुणश्रेष्ठत्वाची घमेंड असलेल्या व्यक्तीला तोडीस तोड आव्हान मिळालं की तिची चलबिचल सुरु होते, आणि आव्हान देणाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी ती जिद्दीने कंबर कसते. आपल्या ‘स्पर्धात्मक’ स्वभावामुळे आपण कशा प्रवृत्तीला उत्तेजन दिलं याची जाणीव झाल्यावर तेवढ्याच जिद्दीने प्रायश्चित्त भोगायला ती सुरुवात करते. ज्या गुणांना आव्हान मानलं, त्यांचाच प्रामाणिकपणे उपयोग करून घेऊन त्यांना पुढची प्रगतीची वाट दाखवायचा मोकळेपणा दाखवते. त्याचं फळ तिला मिळून संघर्ष नाहीसा होतो, आणि ज्यांना एकेकाळी शत्रू मानलं त्यांच्यासोबत एकोप्याने राहू लागते.

गुणकौशल्यं विकसित करायची तर त्यांना अमुक एका संस्कृतीची मर्यादा घालून चालत नाही. सतत शिकत राहावं लागतं. वारशात मिळालेला हा दृष्टिकोन जपणारा माणूसच संघर्ष टाळण्याचा समजुतदारपणा दाखवतो. कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याच्या शत्रुलाही गुरूस्थान देऊ शकतो. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत वेगाने भरारी घेऊ शकतो. पण शेवटी त्याच्याही जिज्ञासेला मर्यादा असतात, आणि आप्तेष्टांपासून दूर नेणारं कौशल्य नकोसं व्हायच्या आत त्याला पावलं उचलावी लागतात. मुशाफिरी करत आयुष्य नेईल तिथे जायचं, की जिथे राहायची खरीखुरी उर्मी आहे तिथेच राहून नवनवीन संधी निर्माण करायच्या, हे त्याला ठरवावं लागतं. कारण यश दोघांमध्येही मिळू शकतं. पण सुख नेमकं कशात आहे हे ज्यानं त्यानं जोखायचं असतं.

फोटो श्रेय : Francois Duhamel – © DreamWorks II Distribution Co., LLC.

आपण चांगल्या हेतुने मदत करायला जावं, आणि समोरच्याने आपला गैरफायदा घ्यावा, ही भावना कोणत्याही नात्यासाठी मारक असते. गैरफायदा घेतलाच असेल, तर असं नातं टिकायलाही नको. पण जेव्हा असं काहीच नसतं, तेव्हा या गैरसमजुतीचं काय करावं? विश्वास उडाला की तो परत बसणं महामुश्कील असतं. शब्द कितीही सढळपणे वापरा, ते पुरत नाहीत. अशा वेळी आपला खरेपणा समोरच्याला कृतीतूनच सिद्ध करून द्यावा लागतो. आणि त्याने तसा तो सिद्ध केला, की आपली चूक मान्य करण्याचा मोठेपणा आपल्यात लागतो. तरच ते नातं टिकतं, बहरतं.

आयुष्यात आलेली आगंतुक माणसं आपल्यासाठी काय घेऊन येतील हे सांगता येत नाही. चांगला असो वा वाईट, पण ही माणसं आपल्यासाठी ‘बदल’ घेऊन येत असतात, आणि बदलाची भीती सगळ्यांच्याच मनात कमी अधिक प्रमाणात बसलेली असते. या भीतीवर हळूहळू मात करत बदलाशी जुळवून घ्यायला जो शिकतो, तो सुखी राहतो. मग तो आगंतुक असो, की यजमान.

फोटो श्रेय : Francois Duhamel – © DreamWorks II Distribution Co., LLC.

चित्रपटाचं कथानक आणि कथानकाचं सादरीकरण सुंदर आहे. कुठेही अति भडक चित्रण केल्यासारखं वाटत नाही. कोणताही प्रसंग जास्त ताणलेला नाही. अधून मधून फ्रेंच आणि हिंदी संभाषणं आहेत. आपापल्या पात्राला अनुसरून प्रत्येक कलाकाराने चांगलं काम केलेलं आहे. दोन अतिभिन्न संस्कृतींचा परस्पर संपर्क कसा होतो, हे पाहण्यास उत्सुक असणाऱ्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा.

चित्रपटाचा दुवा

चित्रपटातील दृश्यांच्या सर्व प्रतिमांचा वापर अभिप्राय देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला आहे.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

One thought on “शंभर फुटांचा प्रवास – चित्रपट अभिप्राय

  • February 21, 2019 at 12:37 pm
    Permalink

    चित्रपटाचं नांव ?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *