गूगल ग्लासेस – जगाकडे पाहण्याची नवी दृष्टि देणारा चष्मा

मानवाने लावलेल्या अगणित शोधांमध्ये चष्मा हा निश्चितच एक अतिमहत्त्वाचा शोध ठरतो. इतिहासात नोंदवल्याप्रमाणे रोमन साम्राज्यापासून चष्म्याच्या वापराची सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने चष्म्यात सुधारणा होत गेल्या. यातच पुढे इंडस्ट्री ४.० च्या प्रक्रियेचा भाग म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने गूगल कंपनीने ‘स्मार्ट ग्लासेस’ या आधुनिक चष्म्याची निर्मिती केली आहे. या लेखात आपण या आगळ्यावेगळ्या चष्म्याबद्दल जाणून घेऊया.

गूगल ग्लासेस हा साधासुधा चष्म्याचा प्रकार नाही. हे चष्मे फक्त दृष्टिदोष सुधारण्याचं काम करत नाहीत; तर इतरही अनेक कामं करतात. त्यामुळे भविष्यात चष्मा हा फक्त दृष्टिदोष सुधारण्यासाठी वापरण्यात येणार नसून त्याचा दैनंदिन जीवनात इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी वापर केला जाईल. याबद्दल माहिती काढली असता असं कळतं की जवळजवळ सगळ्यांच उद्योगक्षेत्रांत याचा वापर केला जाऊ शकतो. ” गूगल ग्लास म्हणजे आत्ता आपण घालत असलेल्या चष्म्याचं स्मार्ट व्हर्जन ” अशी काहीशी व्याख्या जग करत आहे.

गूगल या कंपनीने याचे महत्त्वाचे तीन फीचर्स दिलेले आहेत. या चष्म्याचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा चष्मा लावून तुम्ही तुमच्या कामावरची एकाग्रता कायम राखू शकता. काम करत असताना दृष्टीत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला गूगल ग्लास हा चष्मा दूर लोटतो. तसंच यामधील व्हॉईस कमांड वापरून तुम्ही हवं ते ॲप्लिकेशन कधीही सुरू करू शकता. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गूगल ग्लास वापरून तुमची अचूकता तुम्ही वाढवू शकता. उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या फॅक्टरीमध्ये एखादा कामगार त्याच्या मशीनवर काम करत असताना जर त्याला त्याच्या कामात काहीही अडथळा आला तर लगेचच गूगल ग्लासच्या स्क्रीनवर तो ट्रेनिंग व्हिडिओ बघू शकतो किंवा एखाद मार्गदर्शक पुस्तक उघडून त्याच्या गूगल गलासच्या स्क्रीनवर वाचू शकतो आणि तिथल्या तिथेच त्याच्या प्रश्नाचे समाधान करवून घेऊ शकतो. या सर्वाचा फायदा म्हणजे यामुळे अचूकतेमध्ये आणि कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगारांचा अमूल्य वेळही वाचेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही काम करता करता इतर कामगारांशी बोलू शकता. फक्त फोनच्या माध्यमातूनच नव्हे, तर तुम्ही स्वत: जे बघत आहात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इतरांनाही दाखवू शकता. अगदी तुम्ही जे पाहत आहात त्याच अँगलमधून (दृष्टिकोनातून) इतरांनाही दिसेल. यामुळे तुमच्या पुढ्यातली समस्या इतरांना चटकन कळून येतील आणि त्या समस्येचं निराकरण करणं सोप्पं जाईल. गूगल ग्लास या सर्व सोयीसुविधा देणार आहे.

गूगल ग्लासेस आजवर अनेक उद्योग क्षेत्रांत वापरले गेलेले आहेत. सध्यातरी त्यांचा वापर प्रामुख्याने अमेरिका, जर्मनी या सारख्या फक्त विकसित देशांत होत आहे. हळूहळू इतरत्रही यांचा वापर वाढू लागेल. उत्पादन क्षेत्रामध्ये गूगल ग्लासचा सर्वाधिक फायदा होत आहे. पण भविष्यात या चष्म्यांचा वापर शिक्षण, वैद्यकीय, औषधोत्पादन, बॉटनी, आणि अशा अनेक क्षेत्रांत केला जाऊ शकतो. अनेक नामवंत कंपन्यांनी हे ग्लास वापरण्यासाठी गूगल सोबत करार केलेला आहे. दुसरं महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे आरोग्यसेवा. या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर गूगल ग्लासचा वापर केला जातोय.

Google Glass with frame

गूगल ग्लास वापरून अनेक कंपन्या समाधानी असल्याचं चित्र समोर आलेलं आहे. त्यांच्या कामगारांसाठी हे वरदान ठरत आहे. कल्पना करा, तुम्ही एका ऑटोमोबाईल कंपनीच्या असेंबली लाईनवर काम करायला लावलं. तुम्हाला कसलीच माहिती नाही आणि जर तुम्हाला तुमच्या चष्म्यावर सगळी माहिती उपलब्ध करवून दिली तर? त्यात छोट्या छोट्या पार्टच्या नावासकट तुमच्या कामाची क्रमाक्रमाने सगळी माहिती पुरवली गेली तर? नक्कीच तुम्हाला सोप्पं जाईल ना? हा चष्मा काहीसा असाच आहे. म्हणजे एखादा अननुभवी व्यक्तीही गूगल ग्लास घालून पटापट काम करू शकतो.

आता समजा तुम्ही डॉक्टर आहात. तुमच्याकडे डोळ्यांचा त्रास घेऊन एक पेशंट आला आहे. त्याला सांगता येत नाहीये की त्याला नक्की काय होतंय. त्याची जितकी दृष्टी आहे त्यावरून तो ठरवू शकत नाहीये की त्याला नीट दिसतंय की नाही ते. अशावेळी जर तुम्हाला त्याच्या दृष्टिकोनातून पाहता आलं तर? काही सोप्या हालचाली करवून घेऊन त्यावरून तुम्हाला समजणं सोप्प होईल की तुमच्या पेशंटला नीट दिसतंय की नाही! आणि हे करता करता तुम्हाला स्क्रीनवर त्या पेशंटची भूतकाळातली माहिती मिळाली तर? सोप्पं ना? आता याच पेशंटच्या जागी इतर कोणताही पेशंट घ्या. तुमचं काम सुकर झालेलं आहे.

आत्ता आपण डिझायनर होऊया. तुम्ही एखाद्या पार्टचं डिझाईन करत आहात. आणि कुठेतरी कोणतीतरी रेषा तुमच्या झकास डिझाईनमध्ये अडथळा होऊन बसली आहे. काय कराल? एखाद्या एक्स्पर्टला फोन करून त्याला तुमची अडचण समजावत बसाल की गूगल ग्लास घालून परदेशातल्या त्या एक्सपर्टला आपल्या दृष्टिकोनातून आपलं डिझाईन “व्हिडीओ स्ट्रीम” कराल?

सोप्पं ना? त्याला तुमची अडचण पटकन कळेल आणि तोही तुम्हाला तिथल्या तिथे ती रेषा कुठे सरकवून त्या जागी दुसरी गोष्ट आखून तुमचा “बेस्ट डिझायनर ऑफ द इअर” होण्याचा रस्ता मोकळा करून देईल!

अशा या जग बदलणाऱ्या भन्नाट आविष्कारामुळे इंडस्ट्रीला खूप मोठा फायदा होत आहे. ३०% पर्यंत प्रक्रियेचा काळ वाचतोय आणि प्रशिक्षण काळ सरळसरळ निम्म्यावर आलाय! डॉक्टरांना आता त्यांच्या पेशंटच्या भूतकाळाचा २-२ तास अभ्यास करत बसण्याची गरज नाही. थेट जाऊन त्यांच्या गूगल ग्लासवरूनच त्यांना हवी ती माहिती मिळत आहे आणि रोगाचं निदान करण्यातही खूप मोठी मदत होत आहे.

आरोग्यसेवा, उत्पादनक्षेत्रासोबतच सोबतच लॉजिस्टिक्स, फोटोग्राफी, डायमंड टेस्टिंग अशा क्षेत्रांतही या गूगल ग्लासेसचा वापर वाढत जाणार आहे. “ग्राहकाच्या मागणीनुसार आम्ही गूगल ग्लासेस सानुकूल करतो” असं गूगल कंपनीच्या ग्लासेस विभागाचे प्रमुख, जय कोठारी यांचं म्हणण आहे. त्यामुळे एकसारखेच दिसणारे गूगल ग्लासेस प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतात.

बरं हे सगळं झालं इंटरप्राइज या विभागातल्या ग्लासेसचं. सामान्य ( किरकोळ ) ग्राहकांना या गूगल ग्लासचा वापर मोबाईलची स्क्रीन म्हणून करता येऊ शकतो. त्यामुळे गूगल शोध किंवा maps सारखे ॲप्स तुम्ही नजर न वळवता फक्त मुखाने आज्ञा देऊनही वापरत राहू शकता.
यामार्फत तुम्ही पुस्तक वाचन, फोटोग्राफी, ग्लासेसमध्ये दिसत असलेल्या शब्दांचं / वाक्यांचं तुमच्या मातृभाषेत किंवा तुम्हाला हव्या त्या भाषेत भाषांतर करून घेणं अशी वेगवेगळी कामं सहज करू शकता.

या ग्लासेसचं उत्पादन?
काही वृत्तांच्या मते, गूगल कंपनीने Foxconn technology group या चीनी कंपनीला हे चष्मे बनवण्याचं कंत्राट दिलं होतं आणि काही वृत्तांच्या मते यांच्या उत्पादनाची किंमत प्रत्येक मॉडेलमागे $८० होती. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका वृत्तानुसार यांच्या उत्पादनाची किंमत $१५२ इतकी होती. या उत्पादन किंमतीचा मोठा भाग हार्डवेअरवर खर्च करण्यात आला आहे असं दिसतं.

गूगल ग्लास enterprise 2 या शृंखलेची खास वैशिष्ट्यं :

हे ग्लासेस अँड्रॉइड प्रणालीवर चालतात.

वायफाय, ब्लूटूथ अशा सुविधा यावर उपलब्ध आहेत.

यामध्ये वापरण्यात येणारा कॅमेरा सध्या तरी ८ मेगा पिक्सेल क्षमतेचा आहे. पण कालौघात या कॅमेऱ्याच्या क्षमतेत वाढ होत जाईल. कॅमेरा विकसित केला जाईल.

या गलासच्या फ्रेमच्या बाजूंवर टचपॅड आहेत जे तुमचे gesture ओळखतात.

या शृंखलेमध्ये सध्या ८२० मिली अँप अवरची छोटेखानी बॅटरी आहे.

या श्रृंखलेमध्ये ऑन हेड डिटेक्शन सेंसर्स, आय ऑन स्क्रीन सेन्सर अशी पॉवर सेव्हिंग फीचर्स आहेत.

हा लेख इतरांना पाठवा

ओमकार बर्डे

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *